मराठी रंगभूमीवर येणार विनोदाची नवी लाट : ‘लाडकी विहीण योजना’

28 Feb 2026 13:35:13
Laadki Vihin Yojana
 
मराठी रंगभूमीवर लवकरच एक विनोदी नाटक रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शासनाच्या योजना जनतेसाठी असतात; मात्र ही रंगभूमीवरची योजना थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडणार आहे. अभिनेत्री निर्मिती सावंत मराठी रसिकांसाठी घेऊन येत आहेत ‘लाडकी विहीण योजना.’ हसवण्याची, मन हलकं करण्याची आणि रोजच्या ताणतणावापासून क्षणभर विरंगुळा देणारी खास मनोरंजन योजना. या योजनेचा उद्देश एकच, भरपूर हशा आणि खळखळून हास्यविनोद!
 
नावात ‘योजना’ असली, तरी यात कुठलीही कागदपत्रं, अटी-शर्ती नाहीत; आहे, फक्त खुसखुशीत विनोद, मिश्किल संवाद आणि मराठी माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील गमती-जमतींचं जिवंत चित्रण. कौटुंबिक वास्तवावर हलक्या-फुलक्या शैलीत भाष्य करत ही योजना प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करणार आहे. ही कोणतीही शासकीय योजना नाही; ही पूर्णपणे रसिकांसाठीची ‘मनोरंजन योजना’ आहे, नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत कलाकारांनी याबाबत माहिती दिली. ‘अष्टविनायक’ आणि ‘पंचशील एंटरटेन्मेंट’निर्मित ‘लाडकी विहीण योजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या नाटकाचे लेखन प्रथमेश शिवलकर यांनी केले असून दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे आहे.
 
यावेळी मराठी सिनेसृष्टीतील दोन लाडके कलाकारदेखील या नाटकाची निर्मिती करत आहेत. ते म्हणजे, अभिनेता स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक. यावेळी प्रसाद ओक यांनी बोलताना सांगितले की, "अष्टविनायक संस्थे’चे निर्माते दिलीप जाधव यांच्यासोबत नाटक करताना अनेक वेळा त्यांच्याकडे दिग्दर्शन आणि निर्मितीची इच्छा व्यक्त केली होती. ‘योग्य वेळी तुला संधी देईन,’ असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. आज या नाटकाच्या निमित्ताने मला ही संधी दिली; त्यासाठी मनापासून आभार मानतो,” असं सांगत अभिनेता प्रसाद ओक यांनी "लाडकी विहीण योजना’ हे नाटक रसिकांना दिलखुलास आनंद देईल,” असा विश्वास व्यक्त केला.
"निर्माता म्हणून हा आनंदाचा आणि समाधानाचा क्षण आहे. या नाटकाच्या निमित्ताने ‘पंचशील एंटरटेन्मेंट’ ‘अष्टविनायक संस्थे’शी जोडली जातेय, याचा आनंद आहे,” असे मत अभिनेता स्वप्नील जोशीने व्यक्त केले.
 
"मी नेहमी वेगवेगळ्या गोष्टी शोधत असतो. नाटक चालू शकेल, यापेक्षा ते ‘वर्क’ होईल, अशी आत्मविश्वास देणारी संहिता जेव्हा माझ्याकडे येते. तेव्हा मी त्यासाठी आवर्जून पुढाकार घेतो. या नाटकाची संहिता मला दमदार वाटली. मी खात्रीने सांगू शकतो की, १५० हून अधिक प्रयोगाची मजल हे नाटक मारेल,” असा विश्वास निर्माते दिलीप जाधव यांनी व्यक्त केला. "पहिलं सगळं नेहमीच खास असतं. एवढ्या सगळ्या मातब्बर मंडळींसोबत माझं पाहिलं व्यावसायिक नाटक येतंय, याहून ‘स्पेशल’ काही असू शकत नाही,” अशी भावना लेखक प्रथमेश शिवलकर यांनी बोलून दाखविली.
 
"प्रेक्षकांच्या चेहर्‍यावर हास्य उमटलं, तर तोच माझा खरा लाभ,” असं सांगताना निर्मिती सावंत यांनी माहेरी परतल्याचा आनंद बोलून दाखविला. "नाटक म्हणजे माझं माहेर. मधल्या काळात चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना नाटक करायला मिळत नव्हतं. आता या नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवर परत काम करायला मिळतंय, याचा आनंद आहे. आजवर मी फक्त ‘अष्टविनायक संस्थे’सोबत काम केलं आहे. आमचे हे ऋणानुबंध खूप वर्षांपासून असून आम्ही हा बंध जपला आहे. या नाटकाच्या निमित्ताने प्रसाद आणि स्वप्नीलसारखी हुशार कलाकार मंडळी जोडली गेली आहेत. कलाकार आणि तंत्रज्ञ यांची उत्तम भट्टी आणि ‘मॅडनेस’ यामुळे ‘लाडकी विहीण योजना’ रसिकांना नक्कीच खुश करेल,” असं अभिनेत्री निर्मिती सावंत म्हणाल्या.
 
या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग दि. ५ मार्चपासून सुरू होत आहेत. निर्मिती सावंत यांच्यासोबत स्नेहा रायकर, पुर्णिमा अहिरे-केंडे, अधोक्षज कर्‍हाडे, सुनील जाधव, मुकेश जाधव आदी कलाकार मंडळी यात आहेत. ‘लाडकी विहीण योजना’ नाटकाचे निर्माते दिलीप जाधव, प्रसाद ओक असून सहनिर्माते स्वप्नील जोशी, मंजिरी ओक, तृप्ती पाटील, संजय मेमाणे आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये, तर संगीत अजित परब यांचे आहे. प्रकाशयोजना सुनील जाधव यांनी केली असून गीते क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली आहेत. गायिका राधिका भिडे यांचा स्वरसाज आहे. वेशभूषा पूर्णिमा ओक, तर रंगभूषा मदन गायकवाड यांची आहे. सूत्रधार प्रणित बोडके आहेत.
 
 
- अपर्णा कड
 
 
 
Powered By Sangraha 9.0