मुंबई : कायदेनिर्मिती आणि राजकीय चर्चा यांसाठी ओळखले जाणारे महाराष्ट्र विधिमंडळ आता ग्रंथसंपदेच्या समृद्ध उपक्रमांमुळे चर्चेत आले आहे. विधान भवनाचे जनसंपर्क अधिकारी तथा वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले असून, त्यामुळे विधान भवन हे अक्षरशः ग्रंथ संपदेचे माहेरघर बनले आहे.
नुकतेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राद्वारे संकलित आणि संपादित 'लोकसेवेचा लोकजागर' या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यापूर्वीही विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने वेगवेगळे ग्रंथ प्रकाशित करण्यात आले. यात अजातशत्रू, भूमिपुत्र, लोकप्रतिनिधींसाठी लोकसंपर्क-स्वीय सहायकांची जबाबदारी आणि कर्तव्ये, संस्मरणपुष्प अशा विविध ग्रंथांचा समावेश आहे.
हा केवळ एक औपचारिक उपक्रम नसून वाचन संस्कृतीला चालना देण्याचा एक प्रयत्न म्हणावा लागेल. शासनाच्या धोरणांपासून ते ऐतिहासिक संदर्भांपर्यंत आणि संसदीय परंपरांपासून ते सामाजिक विषयांपर्यंत विविध विषयांवरील ग्रंथ प्रकाशित करून विधिमंडळाने ज्ञानसंपदा जपण्याची आणि वाढवण्याची भूमिका बजावली आहे. विधान भवनात प्रकाशित होणारे ग्रंथ हे केवळ माहितीपर नसून लोकशाही प्रक्रियेचा दस्तावेज आहेत.