अमेरिकेमध्ये जाणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत ४५ टक्क्याची घट, नेमकं कारण काय?

28 Feb 2026 13:23:56

मुंबई : अमेरिकेमध्ये शिकायला जाणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत असतानाच, भारतात शिकण्यासाठी येणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे वास्तव एका अहवालातून समोर आले आहे. अहवालानुसार गेल्यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये अमेरिकेत जाणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये 45 टक्के घट झाली असून, त्याचकालावधीमध्ये भारतात व्यवस्थापन कौशल्याचे शिक्षण घेण्यासाठी येणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत 25 टक्के वाढ झाली आहे.

एकेकाळी अमेरिका आणि कॅनडासारख्या देशांमध्ये जाण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येई. पालक देखील या देशांमध्ये जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी फार आग्रही असत. मात्र, सध्या या देशांमध्ये जाण्याचा भारतीय विद्यार्थ्यांचा कल घटत असून, व्हिजा नियमांमधील अनियमितता, शिक्षण क्षेत्राचा वाढता खर्च ही कारणे यामागे असल्याचे या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. 2025 मध्ये आशिया - प्रशांत क्षेत्रामध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतातील 54 टक्के संस्थामधील परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, त्याचवेळी अमेरिका आणि कॅनडासारख्या देशांमधील देशांकडे भारतीय विद्यार्थ्यी पाठ फिरवत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक कारण हे व्हिजा नियमांमधील अनियमितता हेच असून, 90 टक्के अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण शुल्क भरल्यावर फक्त व्हिजा न मिळाल्याने त्यांना प्रवेश घेता न आल्याचे समोर आले आहे. अमेरिकेत शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या 2019 मध्ये 57% होती, त्यामध्ये घट होऊन 2025 मध्ये ती 42% पर्यंत कमी झाली. याउलट, पश्चिम युरोपची लोकप्रियता मात्र 63% वर स्थिर राहिल्याचे चित्र अहवालातून समोर आले आहे.

अमेरिकेबरोबरच कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशांवरही परिणाम झाल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. 2024 मध्ये कॅनडाने आंतरराष्ट्रीय अभ्यास परवान्यावर मर्यादा लादल्यामुळे, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे अर्ज आणि प्रवेश दोन्हींमध्ये घट दिसून आली. तर ब्रिटनमध्ये, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवरील निर्बंध कडक केल्याने आणि अभ्यासानंतरच्या कामाचा कालावधी कमी केल्याने 2024 मध्ये विद्यार्थी व्हिसामध्ये 12% घट झाल्याचे आढळून आले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियामध्येही, राष्ट्रीय नियोजन पातळीच्या अंमलबजावणीमुळे 2025 च्या पहिल्या सहामाहीमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशातही 16% घट झाल्याचे अहवालातून समोर आले आहे.


Powered By Sangraha 9.0