श्री गुरू तेग बहादूर यांनी संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेले महान बलिदान व्यर्थ जाऊ नये. तसेच येणाऱ्या पिढीला त्या बलिदानाची आणि इतिहासाची जाणीव व्हावी, राष्ट्रीय एकात्मता दृढ व्हावी आणि युवा पिढीत देशभक्तीची मूल्ये रुजावीत, हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले, त्यांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने देशातील विविध पंथांच्या भाविकांचा एकात्मतेचा राज्यातील हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला आहे.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शीख, सिकलीगर, लबाणा, बंजारा, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीनः तसेच भगत नामदेव (वारकरी संप्रदाय) यासारख्या विविध समुदायांच्या सांस्कृतिक योगदानाची समाजाला ओळख व्हावी हा आहे.
त्याग करणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे. या उदात्त भावनेतून महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या शहिदी समागम अंतर्गत राज्यव्यापी कार्यक्रमाचा मुख्य सोहळा नागपूर व नांदेड येथे यशस्वीरीत्या झाल्यानंतर नवी मुंबई येथे समारोप कार्यक्रम भव्य स्वरूपात होत आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा, सांस्कृतिक समन्वयाचा आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी मूल्यांचा अमूल्य ठेवा राज्य तसेच देशातून आलेल्या भविकांनी या कार्यक्रमानिमित्त जपला आहे.
तसेच, परस्पर आदर, ऐक्य आणि बंधुतेची भावना अधिक दृढ करणे, तरुण पिढीमध्ये त्याग, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेचे संस्कार रुजवणे हा आहे. या निमित्ताने राज्यभर व्याख्याने, प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, शौर्यगाथांचे सादरीकरण, ग्रंथप्रदर्शन; तसेच शालेय महाविद्यालयीन व समाज प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्याक विकास व औकाफ विभाग अल्पसंख्याक समुदायाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी विविध योजना आणि धोरणे राबवितात. याबरोबरच अल्पसंख्याक समुदायाचे सांस्कृतिक संरक्षण, सामाजिक समन्वय आणि राष्ट्रीय एकात्मता वाढविणे, यासाठीही विविध उपक्रम राबविण्यात येतात.
'हिंद दी चादर' हा कार्यक्रम आजच्या काळात विशेष समर्पक ठरत आहे. श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांची शहादत ही केवळ एका समाजाची नव्हे, तर संपूर्ण देशाचा सामूहिक वारसा आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा हा शहिदीच्या स्मरणाचा कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मतेचा, सांस्कृतिक समन्वयाचा आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी मूल्यांचा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात (NCERT) शीख परंपरेचा इतिहास व गुरूनानक यांची शिकवण समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा नुकतीच केली आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याने प्रथमच शीख धर्मातील 'आनंद कारज' या विवाह पद्धतीला अधिकृत कायदेशीर मान्यता दिली आहे. अशा विविध निर्णयांद्वारे 'हिंद दी चादर' अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून देशासह राज्यात सामाजिक सलोखा, सांस्कृतिक समृद्धी आणि राष्ट्रीय ऐक्य वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
भारताचा इतिहास हा केवळ राजसत्ता, युद्धे आणि साम्राज्यांचा इतिहास नाही, तर तो संस्कृती, स्वातंत्र्य, मानवता आणि आत्मसन्मानासाठी दिलेल्या बलिदानांचा तेजस्वी इतिहास आहे. यामध्ये शीख गुरूंचे आणि त्यांच्या अनुयायांचे योगदान अतुलनीय आहे. गुरुनानक देवजींनी पेरलेले समता, सत्य आणि निर्भयतेचे बीज गुरू गोविंद सिंगजींनी एका पंथाच्या रूपाने जनमानसात पोहोचविले.
श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांची शहादत हा केवळ शीख समुदायाचा इतिहास नाही, तर संपूर्ण भारतीय इतिहासातील संस्कृतीच्या संरक्षणाचा एक अध्याय आहे. देशवासीयांवरील अत्याचार थांबवण्यासाठी त्यांनी बलिदान दिले आणि 'हिंद दी चादर' हे नाव इतिहासात अजरामर झाले. भाई मती दास, भाई सती दास आणि भाई दयाला यांचे बलिदान हे संस्कृतीच्या रक्षणासाठी असल्याचे सर्वोच्च उदाहरण आहे. या शहादतींनी परकीय सत्तेच्या अत्याचारशाहीला नैतिक पराभव दिला आणि भारतीय समाजाला नवी चेतना दिली.
दहावे गुरू गुरू गोबिंदसिंग महाराजांनी इ.स. १६९९ साली वैशाखीच्या दिवशी पंथाची स्थापना करताना सर्वप्रथम जे पाच स्वयंसेवक पुढे आले, त्यांनाच पंज प्यारे म्हटले जाते. या परंपरेचा पुढचा तेजस्वी अध्याय म्हणजे 'पंज प्यारे' होय. भाई दया सिंह, भाई धरम सिंह, भाई मोहकम सिंह, भाई हिम्मत सिंह, भाई साहिब सिंह हे त्याग, समर्पण, समता आणि धैर्याचे प्रतीक मानले जातात. त्यांच्यासारख्या असंख्य ज्ञात-अज्ञात वीरांनी शीख परंपरेला अन्यायाविरुद्ध उभी राहणारी जिवंत शक्ती बनवले. ही लढाई केवळ तलवारीने लढली गेली नाही, तर सेवा, करुणा आणि मानवतेनेही लढली गेली. भाई कन्हैयाजींनी रणांगणावर जखमी शत्रू सैनिकांनाही पाणी पाजले आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या सेवाविचाराचा प्रसार सिंधपर्यंत झाला आणि सेवापंथासारखी परंपरा निर्माण झाली.
सिंध प्रांत आणि शीख परंपरा यामध्ये अत्यंत जुने आणि गहिरे नाते आहे. गुरुनानक देवर्जीच्या उदासी यात्रांपासून, बाबा श्रीचंदांच्या उदासी संप्रदायापर्यंत आणि नानकपंथी सहजधारी परंपरेपर्यंत हा प्रवास शीख सांस्कृतिक ऐक्याचा जिवंत पुरावा आहे. सिंधी समाजाने गुरू ग्रंथ साहिबला आपल्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी ठेवत, समन्वयाची परंपरा जपली.
इतिहासात केवळ योद्धेच नव्हे, तर शस्त्रे घडवणारे सिकलकर आणि रसद पुरवणारे बंजारा-लबाणा समाज हेही या क्रांतीचे कणा होते. त्यांनी पडद्यामागे राहूनही संस्कृती रक्षणाच्या लढ्यात निर्णायक भूमिका बजावली. १७०४ मध्ये गुरू तेग बहादूर यांचे पुत्र साहिबजाद्यांचे बलिदान हा भारतीय इतिहासातील सर्वात हृदयद्रावक पण प्रेरणादायी अध्याय आहे. अवघ्या ६ आणि ९ वर्षांच्या बालकांनी संस्कृती रक्षणासाठी मृत्यू स्वीकारला; पण अन्यायापुढे झुकले नाहीत. म्हणूनच २६ डिसेंबर हा दिवस 'वीर बाल दिवस' म्हणून साजरा केला जातो.
फाळणीनंतर सिंधी, शीख समाज भारतात विस्थापित झाला; पण त्यांनी आपली श्रद्धा, भाषा आणि परंपरा सोडली नाही. उल्हासनगर, पिंपरी-चिंचवड, नाशिक यांसारख्या ठिकाणी त्यांनी नव्या भूमीत आपली आध्यात्मिक केंद्रे उभी करून आपली ओळख जिवंत ठेवली. संत नामदेवांपासून गुरुनानक देवजींपर्यंत आणि गुरू तेग बहादूर साहिबांपासून साहिबजाद्यांपर्यंत हा प्रवास सांगतो की, भारताचा आत्मा हा त्याग, शौर्य आणि करुणेने घडलेला आहे. भारतात यामुळे विभिन्नतेत एकता आहे.
- राज्यमंत्री, अल्पसंख्याक विकास विभाग माधुरी मिसाळ