शहादत, स्मृती आणि समाज

28 Feb 2026 18:20:11
Shri Guru Tegh Bahadur Ji
 
भारतीय समाजाच्या इतिहासात धर्मरक्षणाची परंपरा ही केवळ संघर्षाची नव्हे, तर मूल्यनिष्ठ धैर्याची साक्ष देणारी आहे. ‘हिंद-दी-चादर’ म्हणून गौरविले गेलेले श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांचे बलिदान हे धर्मस्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा आणि सांस्कृतिक स्वाभिमानाच्या रक्षणासाठी दिलेले सर्वोच्च योगदान मानले जाते. त्यांच्या ‘शहिदी’च्या ३५० वर्षांच्या स्मरणानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने आणि ‘गुरुनानक नामलेवा समाजा’च्या सक्रिय सहभागातून नागपूर,तखत सचखंड श्री हजूर साहिब, नांदेड आणि नवी मुंबई येथे उभा राहिलेला ‘हिंद-दी-चादर’ हा व्यापक उपक्रम केवळ श्रद्धांजली नसून समाजात समरसता, राष्ट्रभावना आणि ऐतिहासिक जाणीव दृढ करणारा एक सामूहिक सामाजिक प्रवास ठरला आहे.
 
हिंद-दी-चादर‘ ही संज्ञा भारतीय इतिहासातील एका निर्णायक अध्यायाशी जोडलेली आहे. शीखपरंपरेतील नववे गुरू, श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांनी दिलेले बलिदान हे कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नव्हते. काश्मिरी पंडितांच्या धर्मस्वातंत्र्यासाठी त्यांनी स्वीकारलेले बलिदान हे संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धा आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी होते. त्यामुळेच गुरू तेग बहादूर साहिबजी यांचे बलिदान भारतीय समाजाच्या सामूहिक स्मृतीत अढळस्थान मिळवून आहे.
१७व्या शतकातील मुघल राजवटीत जबरदस्ती धर्मांतर, धार्मिक अत्याचार आणि सामाजिक दडपशाही वाढत असताना, श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांनी अन्यायासमोर न झुकता धर्म, श्रद्धा आणि मानवतेच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान स्वीकारले. याच ऐतिहासिक वास्तवामुळे त्यांना ‘हिंद-दी-चादर’ म्हणून गौरविले जाते.
 
या बलिदानाच्या ३५०व्या स्मरणानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने, गुरुनानक नामलेवा समाज, शीख गुरुद्वारा समित्या आणि विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने राज्यभर ‘हिंद-दी-चादर’ शहिदी समागमांचे आयोजन करण्यात आले. नागपूर, तखत सचखंड श्री हजूर साहिब, नांदेड आणि नवी मुंबई येथे राबविले जाणारे हे उपक्रम परस्परांशी जोडलेले असून, समाजात धर्मस्वातंत्र्य, समरसता आणि राष्ट्रभावना दृढ करण्याचा त्यामागे उद्देश आहे. या उपक्रमाची सुरुवात दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूरच्या जरीपटका (नारा गाव) येथील सुरेशचंद सुरी मैदानात पार पडलेल्या ‘शहिदी समागमा’ने झाली. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, संत-महंत व सामाजिक आणि राजकीय नेते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या संक्षिप्त उद्बोधनातून गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानातून धर्मस्वातंत्र्य व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अधोरेखित केला.
 
यानंतर तखत सचखंड श्री हजूर साहिब, नांदेड येथे दि. २४ व २५ जानेवारी रोजी दोन दिवसीय ‘शहिदी समागम’ पार पडला. शीख धर्मातील पाच तखतांपैकी एक असलेल्या या पवित्र स्थळी झालेल्या कार्यक्रमाला विशेष धार्मिक, सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभले. या समागमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, मंत्री गिरीश महाजन, पंकजाताई मुंडे, अतुल सावे, माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नांदेडमधील ‘शहिदी समागमा’ची सुरुवात भव्य नगर कीर्तनाने झाली. ‘श्री गुरू ग्रंथ साहिबजी’ गुरुग्रंथाची विधिवत स्थानापन्नता, ‘गुरुबाणी’ पठण, कीर्तन व अरदास यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. ‘लंगर’ सेवेमध्ये कोणताही भेद न ठेवता, हजारो भाविकांना एकत्र बसवून भोजन देण्यात आले. आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरांमधून हजारो नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा मिळाली.
 
या समागमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विविध समाजघटकांचा सहभाग. बंजारा, लबाना, सिकलीगर, सिंधी, मोहयाल, वाल्मीकी, उदासीन, वारकरी आदी समाजांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘विरासत-ए-सीख’ या प्रदर्शनातून शीख गुरुपरंपरा, इतिहास आणि बलिदानाची परंपरा युवकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात आली. यावेळी आयोजन समितीच्या माध्यमातून शीख समाजाचे संत बाबा हरनाम सिंहजी खालसा यांनी श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५०व्या ‘शहिदी समागमा’निमित्त महाराष्ट्र सरकार व प्रशासनाने घेतलेला पुढाकार हा संपूर्ण जगभरात प्रथमच इतया व्यापक आणि उच्चदर्जावर राबविण्यात आला असल्याचे महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले. शासन, प्रशासन आणि समाज यांच्यातील समन्वयामुळे हा उपक्रम आदर्श ठरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
नागपूर व तखत सचखंड श्री हजूर साहिब, नांदेड येथे पार पडलेल्या ‘शहिदी समागमां’च्या यशस्वी आयोजनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतही विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले असून, या राज्यस्तरीय समागमासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. खारघर, नवी मुंबई येथे आयोजित श्री गुरू तेग बहादूर साहिबजी ३५०वा ‘शहिदी समागम’ या भव्य सोहळ्यात विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून भारताचा नकाशा साकारत गुरुजींना मानवंदना दिली. या उपक्रमातून राष्ट्रीय एकात्मता, धर्मस्वातंत्र्य आणि मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात आला. तसेच विठोबा खंडाप्पा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पनवेल येथे ‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागमानिमित्त भव्य समूहगान पार पडले. तब्बल चार हजार विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे गायन करून श्री गुरू तेग बहादुर साहिबजींना भावपूर्ण मानवंदना दिली. या कार्यक्रमास कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक रामेश्वर नाईक यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना गुरुजींचा इतिहास सांगितला.
 
तसेच आगामी नवी मुंबई ‘शहिदी समागमा’चा प्रचार व जनजागृती केली. याच उपक्रमांच्या अनुषंगाने कोकण विभागाने एक महत्त्वपूर्ण विश्वविक्रम नोंदविला आहे. सुप्रसिद्ध गायक सतेंद्र सरताज सिंग यांनी गायलेल्या गुरू गोविंद सिंग यांच्या जीवनावर आधारित गीताचे कोकण विभागातील २० हजार शैक्षणिक संस्थांमध्ये ५१ लाख विद्यार्थी आणि एक लाख, ५० हजार शिक्षक व कर्मचार्‍यांनी एकत्रित समूहगान केले. या उपक्रमाची नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड’मध्ये विश्वविक्रम म्हणून झाली आहे. तसेच विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई) यांच्या सहकार्याने श्री गुरू गोविंद साहेबजी यांच्यावर आधारित ३१ लेखांचे १३ भाषांतील पुस्तक मुख्य कार्यक्रमात प्रकाशित करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील खारघर, ओवे मैदान येथे दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी होणार्‍या राज्यस्तरीय ‘शहिदी समागमा’साठी महाराष्ट्र शासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, गुरुद्वारा समित्या आणि स्वयंसेवी संस्था समन्वयाने नियोजन करत असून, नगर कीर्तन, शालेय उपक्रम, समूहगान, आरोग्य व प्रवास सेवा, ‘लंगर’ व्यवस्था आणि ऐतिहासिक प्रदर्शन यांवर विशेष भर देण्यात आला आहे.
 
Powered By Sangraha 9.0