श्री गुरू तेग बहादूर : मानवतेचे कवच

28 Feb 2026 15:31:21
Guru Tegh Bahadur

धर्म, श्रद्धा आणि सत्यासाठी स्वतःचा जीव अर्पण करणार्‍यांचे स्थान इतिहासात सदैव अमर राहते, त्या अमरगाथांपैकीच एक प्रेरणादायी कथा श्री गुरू तेग बहादूरजी यांची आहे. त्यांनी धर्मस्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुतेच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान भारतीय संस्कृतीतील अतुलनीय अध्याय आहे. ते धर्म, राष्ट्रीय एकता आणि मानवतेचे कवच होते. त्यांच्या पवित्र विचारकार्याचा आढावा घेणारा हा लेख...

गुरू तेग बहादूरजी यांचा जन्म दि. १ एप्रिल १६२१ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांचे वडील गुरू हरगोविंद साहेब हे शीख धर्माचे सहावे गुरू होते. श्री गुरू तेग बहादूरजी यांचे बाल्यावस्थेतील नाव त्यागमल होते; पण युद्धभूमीवरील त्यांच्या पराक्रमामुळे वडिलांनी त्यांना ‘तेग बहादूर’ म्हणजे ‘तलवारीसारखा धैर्यवान’ असे नाव दिले. बालपणापासूनच त्यांच्यात शौर्य, नम्रता आणि आध्यात्मिक चिंतन यांचा सुंदर संगम होता. त्यांनी सांसारिक कीर्तीपेक्षा आत्मज्ञान आणि मानवसेवा हेच जीवनाचे खरे ध्येय मानले होते. गुरू तेग बहादूरजी हे १६६४ मध्ये शीख धर्माचे नववे गुरू झाले.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वात विलक्षण शांतता, करुणा आणि आत्मनिष्ठा होती. त्यांनी धर्माचा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की, धर्म म्हणजे आग्रह नव्हे; तर दुसर्‍याच्या श्रद्धेचा सन्मान करणे होय, त्यांनी भारतभर प्रवास करून समाजात मानवता, समता आणि सहिष्णुतेचे बीज रोवले. आनंदपूर साहिब हे त्यांनी स्थापन केलेले पवित्र ठिकाण असून आजही ते शीख धर्माचे केंद्रस्थान आहे. त्या काळात परकीय सत्तेकडून संस्कृतीवर हल्ले करण्यात येत होते. या संकटाच्या वेळी श्री गुरू तेग बहादूरजी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते म्हणाले होते की, जर माझ्या बलिदानामुळे या निरपराधांच्या श्रद्धेचे रक्षण होणार असेल, तर तेच माझे सर्वोच्च धर्म कर्म ठरेल. हे शब्द संपूर्ण मानवतेच्या रक्षणाची घोषणा करणारे होते.

श्री गुरू तेग बहादूरजी यांना दिल्लीतील चांदनी चौकाजवळ कैद झाली. त्यांच्यावर धर्मांतराची सक्ती करण्यात आली; पण त्यांनी तत्त्वांशी तडजोड करण्यास नकार दिला. अखेर १६७५ मध्ये त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. (इतिहासातील संदर्भानुसार तारीख ११ नोव्हेंबर किंवा दि. २४ नोव्हेंबर १६७५ अशा दोन भिन्न नोंदी आहेत.) त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या शरीर आणि मस्तकावर गुप्तपणे अंत्यसंस्कार केले. श्री गुरू तेग बहादूरजींच्या बलिदानाच्या मागे केवळ शीख अनुयायी नव्हते; त्यांच्या सोबत अनेक समाज उभे होते. विशेषतः लवाना आणि गोर बंजारा समाजांनी या संघर्षात आपले मोलाचे योगदान दिले. इतिहास साक्ष देतो की, व्यापारी बाबा माखनशहा लबाना यांनी श्री गुरू तेग बहादूर यांना ओळखून ‘गुरू मिले सच्चा’ अशी घोषणा केली आणि त्या क्षणापासून लबाना समाजाचे नाव शीख इतिहासात अमर झाले.

लबाना आणि गोर बंजारा समाजांनी श्री गुरू तेग बहादूर साहिबजींच्या शिकवणीचा संदेश दूरवर पोहोचवला. धर्माचे रक्षण म्हणजे मानवतेचे रक्षण. त्यांच्या व्यापारी व भ्रमणशील जीवनशैलीमुळे भारताच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीत त्यांनी मोलाचा वाटा उचलला. आजही राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक आणि तेलंगण या प्रदेशांमध्ये या समाजाचे लोक भक्ती, सेवा आणि साहसाची परंपरा जिवंत ठेवून आहेत. श्री गुरू तेग बहादूरजींनी शिकवले की, धर्म म्हणजे प्रेम, समता आणि सेवा. ते सांगतात की, धैर्य तलवारीत नसते, ते सत्यात असते. त्यांनी ‘न को बैरी, न ही बेगाना, सगल संग हम को बन आई’ या बाणी म्हणजे रचनेत त्यांनी सर्वधर्मसमभाव आणि एकतेचा संदेश दिला आहे.

याचा अर्थ ‘माझ्यासाठी कोणीही शत्रू नाही, परका नाही, कारण सर्वांमध्ये एकच ईश्वर आहे.’ त्यांच्या लिखाणातील ५७ शबद (भक्तिगीते) आणि ५७ सलोक (उपदेशपर पदे) ती गुरू ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत. प्रत्येक ओळ सत्य, संयम आणि मानवतेचा संदेश देते. ते सांगतात की, धर्म ही मानवतेतील भिंत नसून पूल आहे. श्रद्धा हा संघर्ष नसून सहजीवनाचा प्रवाह आहे. त्यांनी आपल्या बलिदानाने धर्माचे रक्षण म्हणजे इतरांच्या श्रद्धेचा सन्मान करणे, हा संदेश जनमानसांत पोहोचवला. त्यांच्या बलिदानाने मानवाधिकारांचे मूलतत्त्व अधोरेखित झाले आहे.

त्यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरू तेग बहादूर साहिबजी ३५०वी शहिदी समागम राज्यस्तरीय समितीमार्फत राज्यभर प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे संकेतस्थळ आणि गुरू तेग बहादूरजींच्या बलिदानावर आधारित गीताचे लोकार्पण नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान झाले. शीख, लबाना, बंजारा, सिखलीकर, मोहियाल, वाल्मिकी, सिंधी, उदासीन आणि भगत नामदेव संप्रदाय असे विविध समुदाय याप्रसंगी एकत्र येऊन गुरू तेग बहादूरजींचा संदेश घराघरांत पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत. आजही त्यांच्या बलिदानाचा प्रकाश प्रत्येकाच्या अंतःकरणात तेवत आहे आणि जोपर्यंत या भूमीवर मानवतेवर प्रेम करणारा एकही मनुष्य आहे, तोपर्यंत ‘हिंद-दी-चादर’ अमर राहील.


- रामेश्वर नाईक
(लेखक ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिबजी ३५०वा शहिदी समागम समिती’चे समन्वयक आहेत.)
 
 
 
Powered By Sangraha 9.0