संस्कृती आणि सामाजिक ऐक्य

28 Feb 2026 17:16:16

गोर बंजारा समाजाची संस्कृती ही मानवतेचा साक्षात्कार देणारी संस्कृती आहे. समाजाचा आणि शीख समाजाचा पाया असणार्‍या विचारांचा मागोवा घेतला तर जाणवते की दोन्ही समाजाची विचार संस्कृती ही समानतेची आणि मानवतेच्या मुल्यांची आहे. गुरू तेग बहादुर यांचे मानवतेसंदर्भातील विचार आणि संत सेवालाल महाराज यांचे विचार नेहमीच समान पातळीवर दिसतात. त्या संदर्भात या लेखात मांडणी केली आहे.

भारतामध्ये विविध धर्म, पंथ, जाती, जमाती आहेत. त्यांपैकी भारतातील महाराष्ट्र, म्हैसूर, राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या घटक राज्यांमध्ये ‘बंजारा’ जमात वास्तव्य करीत असल्याचे आढळून येते. समाजाचे आणि शीख समाजाचे विचार मानवतेसंदर्भात समान भाव दर्शवतात. बंजारा समाज व्यापाराच्या आणि इतर वस्तू-जिन्नस या देशातून, त्या देशात नेण्याच्या अशा या विचारधारेमुळे त्यांच्या उपजीविकेचे एक साधन म्हणून ते केवळ मालाची ने-आण करणे एवढेच होते. गायी-गुरांच्या पाठीवर मालाची ने-आण करणार्‍या या अवस्थेला बंजारा समाजात आजही ‘लदेणी’ असे म्हणतात. बंजारा समाजाची ही संस्कृती म्हणजे ‘गोरवट संस्कृती’. त्यालाच ‘गोरमाटी’ असे बंजारा समाजामध्ये संबोधले जाते. स्त्री-पुरुष असा विचार या बोलीतला शब्द आहेत.

स्वतःच्या बोलीलादेखील ’बंजारा समाज ‘गोरबोली’ म्हणून संबोधतो. ‘ बंजारा समाज स्वाभिमानी असून, ते स्वतःला ‘गोरे’ म्हणजेच ‘श्रेष्ठ’ समजतात. ‘गोरे’ या शब्दाची उत्पत्ती ‘गोरक्षक’ या शब्दापासूनही अधिक संभवते. बंजारा गणांचा संबंध हा भारतीय संस्कृतीशी पूर्वापारचा आहे. एकंदरीत, स्वभाषा, स्वपरंपरा, स्वदेश, स्वराष्ट्र, स्वनिष्ठा या सगळ्या गोष्टींचा विचार बंजारा समाजाच्या या उत्पत्ती-कालाबद्दल विशद करताना सांगता येईल. राठोड चव्हाण, जाधव, आडे, पवार अशा या पाच आडनावांमध्ये त्यांची अनेक गोत्रे सामावलेली आहेत. यामध्ये भुकिया, खेतावत, मेघावत, सांगावत, उदावत, आलावत, खोडावत, जाणावत, ढेगावत, मुलावत, हापावत, पितावत, देवरात, कोणालोत, खोला, मोद्रेचा करमतोट धरमसोत, रातला कोतलावत, अशी बंजारा समुदायाची भरपूर गोत्रे.

‘जाधव’ या वडत्या परिवारामध्ये लुणावत, धारावत, बादावत, कुफावत, तेजावत, धर्मावत, मालावत, मीरावत, दाणावत, धालावत, लाखावत, मकावत, बोडा, अजमेरा जाटोत, तिलावत, हजावत, नेवलात दुर्गावत, दुधावत, मेवावत, धनामत, लाखावत रूपावत, बाणावत आणखी अनेक अशी गोत्रे आहेत. ‘चव्हाण’ या कुळामध्ये पालतिया, मूड, लावडिया, समावत अशी अनेक गोत्रे आपल्याला दिसतात. ‘पवार’ या कुळामध्ये आमगोत, झरपला, नुंसावत, विसरावत. इतकेच नाही; तर अशी असंख्य अशा कुळातली वेगवेगळी गोत्रे आपल्याला दिसतात. या सगळ्या गोत्रांनुसार बंजारा समुदायात एक गोत्रपरंपरा निर्माण झालेली आहेत. बंजारा समुदायात विभिन्न नावांची गोत्रे आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतात.

बंजारा समुदायांमथ्ये गुरूला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. बंजारा समुदायात आतापर्यंत एक सर्वश्रेष्ठ ‘देमा गुरू’ म्हणून आणि भगवान सेवालाल यांचे नाव घेतले जाते. याव्यतिरिक्त रामलाल, जेतालाल, सामतदादा, हेमागुरू, ईश्वरदास महाराजमिठू भुकिया, जंगी-भंगी, लकीशा बंजारा, सतीदादी, सामकी माता, यासोबतच गुरुनानक आणि शिखर-परंपरा याचाही परिणाम बंजारा समुदायावर झालेला आपल्याला दिसतो. बंजारा समुदायांमध्ये देवीची विविध रूपे मानली जातात आणि त्याची पूजाही मनोभावे केली जाते. त्यामध्ये देवीची नावे असतील मरियामा, मथराल, तुळजा, काली सती, दुर्गा वाघाई, जेताई. इतकेच नव्हे; तर आपापल्या समुदायातल्या लोकगणानुसार देवी-देवतांची पूजा केली जाते.

बंजारा समुदायांमध्ये खर्‍या अर्थाने तीज, दसरा, होळी, दिवाळी हे सण मोठ्या उत्साहाने साजरे करतात. या दिवशी ‘बोकड बळी’ची प्रथा आपल्याला पाहायला मिळते. आज शिक्षणामुळे आणि प्रगत अशा विचारसरणीमुळे हा समाज प्रचंड प्रगतीच्या मार्गावर आपली कार्यप्रणाली अनुभवताना दिसतो आहे. भटकंती करणारा समाज, त्यामुळे तो झाडा-झुडुपांची, नदीची, पशुपक्ष्यांची पूजा करतो. त्यामुळे हिंदू धर्म- संस्कृतीमध्ये ज्या काही चालीरीती-परंपरा आहेत, त्या सर्व चालीरीती-परंपरा भारतीय बंजारा समुदायांमध्ये आपल्याला दिसतात. तसेच देवी-देवतांमध्ये राम आहे, कृष्ण आहे, शिव आहे, पार्वती आहे, बालाजी आहे, पंढरपूरचा विठोबा आहे, विठोबाचे भक्तगण आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार बंजारा समुदायातील दैवत म्हणून ते स्वीकारतात. जगदंबेची वेगवेगळी रूपे आणि त्यानुसार त्यांची जीवन-प्रणाली आपल्याला या बंजारा लोकगणामध्ये आणि बंजारा लोकसंस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते.

बंजारा समुदायाचा दुसरा महत्त्वाचा सण म्हणजे खर्‍या अर्थाने होळी आणि दिवाळी. त्यानंतर हा समाज मनोभावे दसरा साजरा करत नऊ दिवस देवीची उपासना करतो. सोबतच नागपंचमी, गोकुळाष्टमी, मकरसंक्रांत, गुढीपाडवा, पिठोरी पोळा असे सर्व सण साजरे करताना दिसतो. बंजारा समाजातील विवाहपद्धती एक वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. हा व्यक्तिजीवनातील महत्त्वाचा संस्कार मानला जात असताना, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात विवाहसंस्काराला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे भारतात सर्वत्र विखुरलेल्या या समाजामध्ये सुंदर अशी विवाहपद्धत आहे. बंजारा समाजातला मुलगा किंवा मुलगी वयात आल्यानंतर तांड्यातील बंजारा समुदाय जिथे वास्तव्य करतो, तिथे भौगोलिकदृष्ट्या तिथला जो नायक असतो, त्या नायकाच्या परवानगीने मुलाचा आणि मुलीच्या लग्नाचे विधिकार्य पूर्ण होते.

विवाहातील दोन्ही पक्षांनी विवाहासंदर्भात सहमती घेतल्याशिवाय ती सोयरीक पक्की होत नाही. बंजारा समुदायांमध्ये ‘कानसळोई’ असा एक प्रकार आहे. दोन्ही पक्षाकडून विवाहासंदर्भात सहमती झाल्यानंतर ‘कानसळोई’ त्यालाच आपण ‘कोळआपट’ असे म्हणूया. यामुळे सोयरीक पक्की झाली, असे संकेत आणि संदर्भ आहेत. या सगळ्या परंपरामध्ये बंजारा समाजातील अलंकार संस्कृतीही खास आहे. वेगवेगळे महागडे अलंकार धारण करणारी बंजारा समाजातली स्त्री या भारतीय परंपरेतला एक वैशिष्ट्यपूर्ण असा भाव मानला जातो. त्यांचा पोशाख आणि त्यांची राहण्याची-जगण्याची पद्धत हीसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. बंजारा समुदाय हा शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही प्रकारांमध्ये आहार करतो. बंजारा लोकसमुदायाची एक गोरपंचायत हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. बंजारा समुदायात गोरपंचायतीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

बंजारा समुदायामध्ये गोरपंचायत ही अतिशय प्राचीन मानली जाते. यालाच बंजारा समुदायात ’न्यायनिवाडा’, ’न्यायविधी’ ’नसाबनीती’ असे म्हटले गेले आहे. बंजारा समुदायातील ‘नाईक’ हा या नसाबनीतीचा, गोरपंचायतीचा प्रमुख असतो. त्याच्या नियंत्रणाखाली गोरपंचायत भरवली जाते. त्याच्या मदतीला अनेक समाजातील वेगवेगळी पंच-मंडळी असतात. त्यांना ‘डायसाणे’ असे म्हटले जाते. ‘कारभारी’, ‘डाव’ अशी नावे त्यांना दिली जातात. एकूणच, या सगळ्या लोकसंस्कृतीचा अभ्यास केला, तर बंजारा समाजामध्ये अत्यंत प्रभावीपणे सामाजिक आणि लोकगणातली सांस्कृतिक जाणीव याचा प्रभावीपणे विचार केला गेला आहे. बंजारा समुदायातल्या या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपली कुटुंबसंस्था आजही जशी आहे, तशीच आहे.

मुघलांच्या काळामध्ये आणि ब्रिटिशांच्या या विकृत राजवटीमुळे बंजारा समाजाची ही गौरवशाली परंपरा सर्वत्र विखुरली गेली आणि ब्रिटिशांनी आणि मुघलांनी, सगळ्या सत्तापिपासू घटकांनी या समाजाला सर्वत्र वेगवेगळ्या व्यूहरचना आखून, त्याला अपमानास्पद अशी वागणूक देऊन खर्‍या अर्थाने या समाजाचा एक जाज्वल्य आणि गौरवान्वित असलेला इतिहास मिटवण्याचा अनेकदा प्रयत्न केला गेला. पण, या समाजाचे एक वैशिष्ट्य असे आहे की, आजही त्यांच्या अलिखित, मौखिक गीतपरंपरेतून त्यांनी ती संस्कृती जपून ठेवलेली आहे. आजही तांडा-पाडा-वस्त्यांमध्ये त्या संस्कृतीचा उद्घोष होताना आपल्याला सर्वत्र दिसतो.

या समाजामध्ये न्यायप्रिय राजा शूरवीर राजा म्हणून राजा भोज यांचे नाव घेतले जाते. त्यांची पंच-पंचायत फार प्रभावी होती. गोराबादल, राणी पद्मिनी, दुर्गा बंजारन गोविंदगीर असे अनेक पराक्रमी योद्धे ‘गोर’ समाजात आहेत. लकीशा बंजाराचा इतिहास तर आपण कदापिही विसरू शकणार नाही, इतका तो इतिहास प्रभावी आहे. मुघलांना ‘सळो की पळो’ करून सोडून शीख गुरूंचा अर्थात, गुरू तेग बहादूर यांची ‘शहादत’ करणारा समाज आणि या समाजाचा नायक असलेला लकीशा बंजारा आणि त्यांनी गुरू तेग बहादुरांच्या देहाचे समर्पण पद्धतीने अंत्यविधी करणारा हा बंजारा समाजातला एक प्रखर नायक, स्वतःच्या घराला, घरात असलेले सोनेनाणे, जडजवाहीर, मौल्यवान वस्तूला आग लावून आपल्या गुरूची ‘शहादत’ करणारी एक असीम अशी परंपरा आपल्याला लकीशा बंजाराच्या माध्यमातून आपल्याला कळते.

भारतीय परंपरेतल्या बंजारा समाजाची सांस्कृतिक प्रतिष्ठा आणि परंपरा अत्यंत गौरवशाली अशीच आहेत. एवढ्या मोठ्या वैभवशाली-गौरवशाली परंपरेचा सांस्कृतिक वारसा हक्क निर्माण करणार्‍या, सातासमुद्रापलीकडे भारताचा झेंडा, भारतीय परंपरेचा झेंडा फडकावणार्‍या या बंजारा महान संस्कृतीला भारतीय इतिहासकारांनी कळत-नकळतपणे पडद्याआड ठेवले आहे का? युरोपामध्ये आजही हा समाज ‘रोमानी’ म्हणून ओळखला जातो. रोम, इटली, फ्रान्स, जर्मनी, युगोस्लाव्हिया, स्कॉटलंड, नॉर्वे, ब्रिटनमध्ये आजही मोठ्या प्रमाणात हा बंजारा समाज वास्तव्याला आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये या समाजाला ‘रोमा बंजारा’ म्हणून ओळखले जाते. प्राचीन काळी प्रसिद्ध उर्दू शायर वजीर अखबराबादी यांनी तर अतिशय सुंदर वर्णन केलेले आहेत, "सब ठाठ पडा रह जायेगा, जब लाद चलेगा बंजारा॥” या शब्दांत बंजारा समाजाच्या प्राचीन काळातील ‘लदेणी’चे आणि त्याच्या शूरवीरतेचे वर्णन अजरामर ठरते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बंजारांना अनेकदा विदेशी आक्रमणांचा सामना करावा लागला.

इसवी सन १५०४ मध्ये सिकंदरने हल्ला केला, त्यावेळेस बंजारा समुदायाने सिकंदर बादशहासोबत युद्ध केले. अर्थात, मुसलमानांनी राजपुतांना काबीज केल्यानंतर बंजारा राजपुतांकडून दक्षिणेकडे पसरले आणि पुढे स्थायिक होत गेले. ”रंजन का पानी|छप्पर का घास|दिन के तीन खून माफ| और जहा असफ खानके घोडे| वाहा जंगी, भंगी के बैल खडे॥” याचा अर्थ, तुम्हाला जर पाणी मिळाले नाही; तर तुम्ही माझ्या सैन्यातील नोकरांनी रांजणात साठवलेले पाणी प्यावे. जरूर पडल्यास त्यांच्या झोपड्यांवरील गवतही बैल-गुरांसाठी घ्यावे. अशा वेळी प्रसंग पडल्यास दिवसातून तीन खून केलेत, तरी तुम्हाला माफ आहेत. जेथे-जेथे माझे घोडे जातील, तेथे-तेथे जंगी-भंगी नाईकांनी आपले बैल न्यावेत.

भाषिक आणि सांस्कृतिक ऐयभाव निर्माण करणारा हा बंजारा समाज आपल्या उपजत असलेल्या लोकगीतांतून आणि आपल्या बोलीभाषेतल्या सहज अशा लाघवी रचनेतून ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा भाव निर्माण करतो. आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या संघटनकौशल्याचा, युद्धनीतीचा, देवी-देवतांच्या श्रद्धा व भक्तीचा, भोग-अर्घ्य आणि पूजापाठांचा, कढई प्रसादांचा आणि श्रद्धायुक्त भावनेचा आहे. समाजाच्या विचारांमध्ये आणि शीख समाजाच्या वैचारीक मुल्यांमध्ये समानता आहे. सकारात्मक विचार बदलत्या काळानुसार समाजरचनेत निर्माण झाला आहे. समाज, संस्कृती जपत, त्यातील नकारात्मकता बाजूला व्हावी आणि संपूर्ण समाज सांस्कृतिक, भाषिक ऐयाच्या या पांढर्‍या, लाल, भगव्या ध्वजाखाली एक व्हावा, हीच सांस्कृतिक भावना समाजाने जपावी. ‘जय सेवालाल’...!

- डॉ. विजय राठोड



Powered By Sangraha 9.0