पूर्वी दारावर येऊन विविध वस्तूंची विक्री करणारे विक्रेते होते. पण, आता आपल्याला एखादी वस्तू हवी असेल आणि तीही दिवसा अथवा रात्री, तर एका क्लिकवरुन ती ऑर्डर करता येते आणि अवघ्या काही मिनिटांत ती वस्तू घरपोच उपलब्धदेखील होते. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंगपासून ते आता ‘क्विक कॉमर्स’पर्यंत खरेदीच्या बदललेल्या याच तंत्राचा वेध घेणारा हा लेख...
गेल्या दशकामध्ये ग्राहक आणि ग्राहकांची खरेदीबद्दलची पसंती पद्धती व त्यावर आधारित व्यवसाय-विक्री आणि वितरण पद्धती इ. मध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. पूर्वी ग्राहक व त्यातही महिला या त्यांच्या परिसरात हातगाडी वा तत्सम वाहनांमधून हाकारे देत विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांकडून आवर्जून विविध वस्तू चोखंदळपणे खरेदी करीत असत. आता मात्र ऑनलाईन पद्धतीने कुणीही आपल्याला हवी ती चीजवस्तू मागवू शकतो. विक्री-व्यवसाय संदर्भात हे एक मोठे परिवर्तन ठरले असून, यातून फार मोठ्या प्रमाणात छोट्या-मोठ्या स्वरूपातील व्यवसाय-विकासासह रोजगार संधी पण उपलब्ध झाल्या आहेत.
या ग्राहकाभिमुख व नव्या व्यवसाय पद्धतीची पार्श्वभूमी म्हणजे ‘स्विगी’ने ‘कोरोना’ काळात गुरुग्राम येथे 30 ते 45 मिनिटांत ग्राहकांच्या थेट दारात सेवा देण्याच्या दृष्टीने ‘इन्स्टामार्ट’ पद्धतीची केलेली सुरुवात. ‘कोरोना’ काळातील काळजीचे व निर्बंधांसह व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांसह ग्राहकांसाठी हा उपक्रम एक मोठा दिलासा ठरला. त्यामुळे एकीकडे ‘कोरोना’ची गांभीर्यता व व्याप्ती वाढत असतानाच, दुसरीकडे लोकांचा या घरपोच सेवा व्यवस्थेला मिळणारा प्रतिसाद वाढला नसता, तरच नवल. हा मोठा व वाढता प्रतिसाद लक्षात घेता, घरपोच वस्तू पुरविण्याचा कालावधी जवळजवळ अर्ध्यावर म्हणजेच, 15 ते 20 मिनिटांवर आणून मोठ्या उलाढालीसह या क्षेत्रात व्यवसायवाढ करण्यात आली.
व्यवसायाला मिळणारी ग्राहकांची पसंती व वाढता प्रतिसाद पाहून, घरपोच वस्तुसेवा पुरवठादार म्हणून ‘झेप्टो’ची भर पडली. ‘झेप्टो’ने तर केवळ दहा मिनिटांत घरपोच सेवा ही नवी पद्धत सुरू केली व त्याला ग्राहकांची मोठी व वाढती पसंती मिळत गेली. योगायोग म्हणजे त्यावेळी ‘कोरोना’ची तुलनेने अधिक गंभीर लाट देशात पसरली होती. घरपोच सेवेची पद्धती जनसामान्यांच्या केवळ पसंतीसच पडली असे नव्हे, तर ती त्यांच्या पचनी पडली होती व त्याचा फायदा ‘झेप्टो’ला झाला. त्यापाठोपाठ 2021 मध्ये ‘ब्लिंक-इट’ची सुरुवात गुरुग्रामच्याच ‘ग्रोफर्स’ या स्टार्टअप कंपनीने केली व या व्यवसाय-व्यापार क्षेत्राला नवे वळण मिळाले. ‘ग्रोफर्स’ने आपल्या व्यवसायाची सुरुवात मर्यादित स्वरूपात 2013 मध्ये केली होती व त्यांच्या गाठीशी तो अनुभव होताच. त्या पार्श्वभूमीवर ‘त्वरित सेवा’ या नव्या ब्रीद आणि धोरणासह ‘ब्लिंक-इट’ने आपला व्यवसाय सुरू केला व एकूणच व्यवसायाला त्वरित नवी दिशा लाभली, हे विशेष.
याचाच परिणाम म्हणून देशांतर्गत ग्राहकांना घरपोच सेवेची कमीत-कमी वेळातच नव्हे, तर त्वरित वस्तू पुरवण्यासाठी मोठ्या स्वरूपातील ‘इन्स्टामार्ट’, ‘झेप्टो’ व ‘ब्लिंक-इट’ असे विविध पर्याय उपलब्ध झाले. यातून ग्राहकोपयोगी व विशेषत: घरगुती स्वरूपातील नित्योपयोगी व महत्त्वाच्या वस्तूंचा व्यापार-पुरवठा करणाऱ्यांपासून या वस्तूंचे वितरण व पुरवठा करण्याचे काम करण्यासाठी संबंधित क्षेत्रात व्यवसाय वितरण, संकलन, वाहतूक अशा स्वरूपातील संधी उपलब्ध होत गेल्या, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. त्यानंतर घरपोच वस्तू सेवा पुरवठा क्षेत्रात सातत्याने प्रगतीसह वाढ होत गेली. या वस्तूंच्या पुरवठ्यामध्ये बदलता काळ आणि गरजांनुसार स्वयंपाकघरापासून घरातील दिवाणखान्यापर्यंत व कपड्यांपासून कलाकुसरीच्या वस्तूंपर्यंत आवश्यक वस्तू व पदार्थोंचा समावेश करण्यात आला. यामुळे या नव्या व्यवसायाचे स्वरूप पुरतेपणी बदलले. या सेवा क्षेत्रातील कंपन्यांना त्यामुळे सुगीचे दिवस लाभले.
वाढत्या मागणी व गरजांनुसार पुरवठा करण्यासाठी पूर्वतयारी मोठी लागते. या व संबंधित व्यवसाय आणि व्यावसायिकांचा खरा कस त्यानिमित्ताने लागतो. उदाहरणार्थ, विविध सणवार, पूजा-प्रसंग वा राष्ट्रीय संदर्भातील नैमित्तिक व महत्त्वपूर्ण प्रसंगाच्या वेळी ठरावीक व प्रासंगिकदृष्ट्या महत्त्वाच्या चीजवस्तूंची मागणी आणि खप यामध्ये मोठी मागणी वाढते. या वाढत्या मागणीचा नेमका व वस्तुनिष्ठ अंदाज येण्यासाठी आता अद्ययावत माहिती तंत्रज्ञानासह कृत्रिम बुद्धिमत्तेचासुद्धा उपयोग केला जात आहे. या नव्या व्यवसाय-प्रक्रियेमध्ये ग्राहक म्हणून जनसामान्यांसाठी रोजच्या व आवश्यक अशा वस्तूंचा पुरेसा साठा विशिष्ट ठिकाणी केला जातो. या साठ्यासाठी जागा निवडताना संबंधित वस्तूंची क्षेत्रनिहाय मागणी व सोयीस्कर जागा यावर विशेष भर दिला जातो. हे ठरविताना संबंधित ग्राहकाला दहा मिनिटांत पुरवठा करण्याचे मोठे व्यावसायिक आव्हान पार पाडावे लागते.
यासंदर्भातील व्यवसाय-व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पूर्वपीठिका म्हणजे, ज्यावेळी एखादा ग्राहक त्याच्या गरजा व वस्तूंच्या संदर्भात ‘झेप्टो’शी ऑनलाईन संपर्क करतो, त्याची नोंद ‘झेप्टो’च्या ‘वेअरहाऊस मॅनेजमेंट सिस्टम’ पद्धतीद्वारा घेतली जाते. त्याठिकाणी अद्ययावत संगणकीय पद्धतीच्या आधारे संबंधित गरजांची वेळेत पूर्तता करण्याच्या दृष्टीने करण्यात येते. यामध्ये ग्राहकाच्या गरजेनुसार संबंधित वस्तू-पदार्थांची निवड करून त्याचे पॅकिंग करण्यात येते. त्याचे वितरण अचूक वेळेत व योग्य पद्धतीने होण्यासाठी उपलब्ध व वितरणाच्या दृष्टीने जवळच्या वाहकसेवेचा प्राधान्याने विचार करून ग्राहकापर्यंत संबंधित पुरवठा केला जातो. वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहकाच्या त्वरित व अचूक माहिती आणि मार्गदर्शनासाठी ‘वेअरहाऊस’ व ‘डार्क स्टोअर्स’ म्हणजेच, विविध वस्तू आणि पदार्थांचा पुरेसा साठा ठेवून, त्याद्वारे ग्राहकांना अचूक व वेळेत पुरवठा करण्यासाठी भर दिला जातो.
यासंदर्भात ‘इन्स्टामार्ट’ने स्पष्ट केल्यानुसार अधिकाधिक ग्राहकांना वेळेत व घरपोच सेवेकडे आकृष्ट करण्यासाठी विविध कंपन्या आपल्या व्यवसाय-विस्तारासाठी धडाडीने प्रयत्न करीत आहेत. यासंदर्भात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, ‘ब्लिंक-इट’नेच गेल्या तिमाहीत 262 ‘डार्क स्टोअर्स’ची व्यावसायिक भर घातली आहे. त्यामुळे त्यांच्या एकूण स्टोअर्सची संख्या सुमारे एक हजार, 900 झाली आहे. कंपनीने 2025-26 मध्ये दोन हजार स्टोअर्सचे व्यावसायिक उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात त्यांच्या स्टोअर्सची संख्या दोन हजार, 100 वर जाण्याची शक्यता आहे, हे विशेष.
गेल्या काही वर्षांत झालेल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या व्यावसायिक बदलांमुळे कधी ब्रेड-बटर दूध-दही, फळे-भाजी या प्रकारच्या घरपोच पुरवठ्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आल्याने या व्यवसाय साखळीद्वारा ‘सोप ते स्मार्टफोन’ असा व्यापक व मोठा व्यवसाय सध्या केला जात आहे. यामागे अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘सरासरी विक्री किंमत’ हे तत्त्व ग्राहकांसाठी लागू करण्यात येत असल्याने ग्राहकांना परवडणारी किंमत व कंपनी-पुरवठादारांना मोठे व्यावसायिक पाठबळ लाभले आहे. या क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करणाऱ्या किर्मे कंपनीचे संचालक अंकुर सिंह यांच्यानुसार सद्यस्थितीत ग्राहकाला त्यांच्या आवडीचा व पसंतीच्या ब्रॅण्ड कंपनीचा शर्ट हवा असेल, तर त्यांना कुठल्याही दुकान-शोरूममध्ये न जाता, पण नेमका तसा शर्ट निर्धारित कालावधीत त्याच्या घरी पोहोचता करण्याची क्षमता या व्यवसाय-प्रक्रियेने सिद्ध केली असून, त्याला उत्पादक-विक्रेता व ग्राहक या सर्वच व्यावसायिक घटकांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे.
आपल्या घरपोच सेवा व्यवसाय-प्रक्रियेमध्ये अधिक प्रगती-सुधारणा करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग-उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने विविध प्रसंग विशेष व सणांच्या निमित्ताने ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी ‘फेस्टिव्ह स्टोअर्स’ म्हणजे प्रसंग विशेष विक्री व्यवस्थेची रचना लावण्यात आली असून, त्याला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांच्या गरजांतून व्यवसायवाढीचे विशेष उदाहरण सर्वांपुढे प्रस्तुत झाले आहे.
- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापक आणि सल्लागार आहात.)