मतलबी इतिहासाच्या लपंडावाचा साईसुट्ट्यो!

28 Feb 2026 10:28:09
Devendra Fadnavis
 
काँग्रेसने मतपेढीच्या राजकारणापायी गेली 70 वर्षे भारतीयांच्या माथी मारलेल्या निवडक आणि विपर्यस्त इतिहासामुळे देशात वेळोवेळी वाद उद्भवले. आता खरा इतिहास बाहेर येत असल्याने, काँग्रेसची खरी पंचाईत होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा आपल्या विधिमंडळातील भाषणातून टिपूच्या उदात्तीकरणावरुन काँग्रेसचा घेतलेला खरपूस समाचार ही त्याच मतलबी इतिहासाची पोलखोल!
 
काही वाद विनाकारण उठविले जातात. अलीकडेच महाराष्ट्रात म्हैसूरचा राजा टिपू सुलतान याच्यावरून निर्माण झालेला वाद हा असाच अनावश्यक होता. टिपू सुलतानाचा तसा महाराष्ट्राशी काही संबंध नव्हता. तसेच आता त्याचा संदर्भ देण्याचेही काही प्रयोजन नव्हते. पण, काँग्रेस नेत्यांना आता आपल्या अस्तित्वासाठी मुस्लीम मतांचा प्राणवायू आवश्यक बनला असल्याने ते संधी मिळताच आपले मुस्लीमप्रेम भळाभळा व्यक्त करतात. राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही नुकतेच आपले मुस्लीमप्रेम व्यक्त केले. त्याकडेही एकवेळ दुर्लक्ष केले गेले असते; पण ते करताना सपकाळ यांनी निष्कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याने हा वाद उभा राहिला. “टिपू सुलतान हा छत्रपती शिवाजी महाराजांइतकाच शूर व देशप्रेमी होता, असे आपण मानले पाहिजे,” असे वक्तव्य त्यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादाचा उल्लेख विधानसभेत एका चर्चेत केला आणि खरा इतिहास काय सांगतो, तेही स्पष्ट केले.
 
सपकाळ यांना ना इतिहासाचे काही ज्ञान आहे, ना समाजभावनेचे. म्हणून, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानाला एकाच तागडीत तोलण्याचा गुन्हा केला. फडणवीस म्हणाले की, “आम्ही मुस्लिमांविरोधात नाही आणि भारतात देशप्रेमी मुस्लिमांची मुळीच कमतरता नाही. पण, भारतावर आक्रमण करून देशाची लूट करणाऱ्या आणि धर्मद्वेष्टेपणामुळे भारतातील हिंदूंची कत्तल करणाऱ्या मुस्लीम शासकांचा गौरव आम्ही सहन करणार नाही.” भारतात आजवर खोटा इतिहास शिकविला गेल्याचे सांगून ते म्हणाले की, “जर केंद्र सरकारने वेळीच खरा इतिहास शिकविला असता, तर आज देशातील कोणत्याही मुस्लिमाने मुघल शासकांना आपले नायक मानले नसते.”
 
फडणवीस यांनी नेमक्या वर्मावर बोट ठेवले आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने सत्तेच्या राजकारणासाठी सातत्याने मुस्लीम लांगूलचालनाचे धोरण स्वीकारले. त्यासाठी नंतरची तब्बल 30 वर्षे मुस्लीम समाजातील व्यक्तींची देशाचे शिक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि साम्यवादी विचारांच्या कथित बुद्धिजीवींकडे इतिहासलेखनाची जबाबदारी सोपविण्यात आली. याचा परिणाम असा झाला की, या व्यक्तींनी भारताचा खरा जाज्वल्य इतिहास दडवून ठेवला आणि भारतावर आक्रमण करणाऱ्या परक्या आक्रमकांचा उदो-उदो केला. भारतातील कोणत्याही मुलास आज बाबरपासून औरंगजेबापर्यंत मुघल शासकांची वंशावळ अनुक्रमे तोंडपाठ आहे. पण, शिवाजी महाराजांना किती अपत्ये होती, संभाजी महाराजांनंतर कोण छत्रपती झाले, दक्षिण भारतातील महान राजघराण्यांची व त्यांच्या राजांची नावे ठाऊक नाहीत. काश्मीर, सिंध या प्रांतात कोणते चक्रवत राजे झाले, त्यांची कामगिरी काय, याविषयी आज कोणालाही माहिती नाही. भारताचा इतिहास फक्त मुघल काळापासून सुरू होतो का? असा प्रश्न पडावा इतकी अनास्था इतिहासांच्या पुस्तकात दिसून येते.
 
फडणवीस यांनी काँग्रेसने आपल्या मुस्लीम मतपेढीच्या राजकारणासाठी किती खोटा आणि विपर्यस्त इतिहास शिकविला, त्याचे उदाहरण दिले. “काँग्रेसने शालेय इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात मुघल शासकांवर तब्बल 17 पाने खर्च केली असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य केवळ का परिच्छेदात मर्यादित केले होते,” असे ते म्हणाले. आता मोदी सरकारने जारी केलेल्या नव्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात मात्र तब्बल 20 पानांमध्ये मराठ्यांचा इतिहास मांडला आहे, हे फडणवीस यांनी सांगितले. टिपू सुलतान हा क्रूरकर्माच होता. तो जिहादी मनोवृत्तीचा शासक होता आणि संपूर्ण भारतात फक्त इस्लामी राजवट प्रस्थापित व्हावी, हा त्याचा हेतू होता. त्याने स्वत: तब्बल 75 हजार हिंदूंची आणि 33 हजार नायरांची कत्तल केली असून, त्याची माहिती त्याने स्वहस्ते लिहिलेल्या पत्रांमध्ये दिली आहे. त्याने दक्षिण भारतातील असंख्य मंदिरे तोडली. त्याच्या काळात भारतात ‌‘ब्रिटिश राजवट‌’ स्थिरावत होती आणि ते भारतातील राज्ये जिंकून घेत होते. त्या धोरणानुसार, त्यांनी म्हैसूरच्या टिपूच्या राज्यावरही आक्रमण केले, लढाया केल्या. स्वाभाविकच टिपूने आपले राज्य वाचविण्यासाठी त्यांच्याशी लढाया केल्या. केवळ तेवढा धागा उचलून या पक्षपाती आणि काँग्रेसधार्जिण्या कथित बुद्धिजीवींनी टिपू इंग्रजांशी लढला म्हणून तो राष्ट्रभक्त होता, असा निष्कर्ष काढला आणि ते असत्य अनेक भारतीय पिढ्यांच्या माथी मारले. आज सोशल मीडियामुळे खरा इतिहास हळूहळू बाहेर येत असून, या मतलबी आणि पक्षपाती इतिहासकारांची बनवाबनवी उघड होत चालली आहे. टिपू सुलतानच्या कथित देशभक्तीचे पितळही यामुळेच उघडे पडले आहे.
 
सपकाळ यांना छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना थेट टिपू सुलतानाशी करताना लाज वाटायला हवी होती. पण, तसे करताना त्यांची जीभ एकदाही अडखळली नाही. कारण, त्यांना खऱ्या इतिहासाशी काही देणे-घेणेच नव्हते. त्यांना फक्त आपले मुस्लीम लांगूलचालनाचे धोरण रेटायचे होते. पण, आजचा महाराष्ट्र अजून इतकाही मुर्दाड झालेला नाही की, तो अशा अनेक मतलबी सपकाळांच्या बेमुर्वत वक्तव्यांकडे दुर्लक्ष करील. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, इतके त्यांचे कर्तृत्व अद्वितीय होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सातत्याने मुस्लीम शासकांशीच लढा दिला आणि त्यांनी आपल्या स्वराज्याला उघडपणे ‌‘हिंदवी स्वराज्य‌’ म्हटले. तरीही, त्यांनी आपल्या राज्यातील मुस्लीम नागरिकांवर कसलाही अन्याय होऊ दिला नाही. अफझलखान आणि औरंगजेबासारख्या शासकांनी त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांनी राज्यातील मुस्लीम रयतेची कत्तल केली नाही, त्यांच्यावर ‌‘जिझिया‌’सारखा कर बसविला नाही की, त्यांना हिंदू धर्म स्वीकारण्यास भाग पाडले नाही. दिसेल ती मशीद पाडून तेथे त्यांनी हिंदू देवतांची मंदिरे उभी केली नाहीत. या महाप्रतापी आणि आगळ्या राजाचे कर्तृत्व आणि विचारच जगावेगळा आणि खरा मानवतावादी होता. त्यांची तुलना म्हणूनच कोणाशीही होऊ शकत नाही.
 
सोशल मीडियाच्या प्रभावामुळे आणि भाजपच्या राष्ट्रवादी सरकारांमुळे सामान्य भारतीयांमध्ये आता खऱ्या इतिहासाबद्दल जागृती वाढत चालली आहे. त्यामुळे काँग्रेसला आपल्या मुस्लीम मतपेढीच्या राजकारणासाठी गैरसोयीचा वाटणाऱ्या इतिहासाचा खेळखंडोबा करण्याचा लपंडाव संपुष्टात येत चालला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या हिंदुत्वाचा खरा अर्थ जाणणाऱ्या राज्यकर्त्यामुळे भारताच्या इतिहासाची मोडतोड बंद होऊन भारताचा खरा जाज्वल्य इतिहास साऱ्या जगापुढे येत चालला आहे. या प्रखर सूर्यापुढे सपकाळांसारख्या मतलबी नेत्यांचे लांगूलचालनाचे काजवे लुप्त होण्यास वेळ लागणार नाही!
 
 
Powered By Sangraha 9.0