पिरियड क्लास...!

28 Feb 2026 11:59:00
Period Class
 
मासिक पाळी आली का, याची विद्यार्थिनींकडून माहिती घेतली जाते. तिला मासिक पाळी असेल; तर चक्क वेगळ्या वर्गात बसवले जाते. त्यानंतरच्या महिन्यात त्याच तारखेला पाळी आली का, याबाबत नोंद ठेवली जाते. पाळीच्या दरम्यान वर्गातील इतर विद्यार्थ्यांसोबत त्यांना बसू दिले जात नाही. त्यांना दुसऱ्या वर्गात बसवले जाते (त्याला ‌‘पिरियड क्लास‌’ म्हणतात). घटना कुठली आहे? पाळी-पाळी ओरडून हिंदू कसे मुलींना पाळीच्या नावाने दास्यात ठेवतात वगैरे म्हणणारे तथाकथित विचारवंत (?) म्हणतील की, घटना भारतातील आहे, तर थांबा. ही घटना आहे ऑस्ट्रेलियातली. या देशातील इस्लामिक शाळेमध्ये हे असले नसते उद्योग सुरू आहेत. असे ऑस्ट्रेलियातली प्रसिद्ध नेता पॉलिन हॅन्सन यांनी म्हटले आहे.
 
जग आता दुसऱ्या आकाशगंगेत जायच्या विचारात आहे आणि इथे ऑस्ट्रेलियातील इस्लामिक शाळेत मुलींशी अशाप्रकारे भेदभावाची वर्तणूक केली जाते. का? तर म्हणे, इतर विद्यार्थिनी नमाज पढत असतील, तर या तिथे नकोत. पण, मग दर महिन्याला या मुलींच्या पाळीची नोंद का केली जात असेल? याला कोणता धार्मिक किंवा नैतिक आधार आहे? पॉल हॅन्सन यांचे म्हणणे आहे की, या शाळेत इतर धर्मीय मुली असतील, तर त्यांचे धर्मांतरण करण्यासाठीही प्रयत्न केले जातात. त्यासाठी विशेष फिल्म किंवा लेक्चर आयोजित केले जाते. अर्थात, आपल्या भारतासारखे निधर्मी लोक ऑस्ट्रेलियातही आहेतच. त्यांचे म्हणणे असते, शाळा जरी इस्लामिक अजेंड्याची असली; तरी आम्ही निधर्मी आहोत. त्यामुळे त्या शाळेत आमच्या मुली शिकायला गेल्या; तर काय फरक पडणार? पण, या शिक्षण संस्थांमध्ये निधम पालकांच्या मुलींना कट्टरतेकडे वळवले जाते. याबाबत पॉलिनने गर्भित इशारा दिला आहे.
 
अर्थात, अफगाणिस्तान किंवा इतर कट्टरपंथी देशांमध्ये वयात आलेल्या मुलींना शाळेत जाण्यापासून रोखले जाते. वयात आल्या की, लगेच ‌‘निकाह‌’ करून एक-दोन वर्षांत पोरांची ‌‘अम्मीजान‌’ होण्यातच तिचे आयुष्य व्यतित होते. त्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियामध्ये निदान मुलींना शिक्षणाची संधी तरी देतात, असे आपलेच समाधान करून घेण्यासाठी आपण बोलू शकतो. पण, यावरही तिथल्या समाज अभ्यासकांनी एक अतिशय चिंताजनक दावा केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या मुलींना शाळेत पाठवले जाते. पण, कट्टरपंथीयांच्या मते, मुलगी वयात आली की, तिला ‌‘परदानशीन‌’ ठेवायचे, घराबाहेर पाठवायचे नाही. हे पाप आहे. सैतानाचे काम आहे. मग वयात आलेल्या मुली शाळेत कशा जाणार? त्यासाठी इथल्या काही कट्टरपंथी पालकांनी भयंकर नियोजन केले. मुलीला लवकर पाळी येऊ नये म्हणून तिला पाळी न येण्याचे औषध दिले जाते. काय म्हणावे? याला अपराध म्हणावा, अज्ञान म्हणावे की मूर्खता?
 
असो. ऑस्ट्रेलियामध्ये एकूण लोकसंख्येच्या 3.2 टक्के मुसलमानांची लोकसंख्या आहे. 2016 साली म्हणजे दहा वर्षांपूर्वी ही लोकसंख्या 2.6 टक्के होती. याचाच अर्थ, ऑस्ट्रेलियामध्ये मुस्लिमांची लोकसंख्या वाढतच आहे. त्यातही यामध्ये 35 वर्षांखालील लोकांची लोकसंख्या जास्त आहे. ऑस्ट्रेलियातील मुसलमान हे मूळचे अफगाणिस्तानहून (ऑस्ट्रेलियातील वाळवंटामध्ये उंटचालक म्हणून आणले गेलेले) किंवा इंडोनेशियामधून व्यापारासाठी आलेले इजिप्त आणि पाकिस्तान, लेबनॉन, तुर्कीये आणि भारतातील मुसलमान आहेत. कधीकाळी पोटापाण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आलेले हे लोक (अपवाद वगळून) कधीही ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीशी कधीही एकरूप झाले नाहीत, असे मत ऑस्ट्रेलियातील बहुसंख्य ख्रिस्ती जनतेचे आहे.
 
काही महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियामध्ये ‌‘ज्यू‌’ लोकांवर साजिद अक्रम आणि त्याचा मुलगा नावीद अक्रम याने हल्ला केला होता. त्यामध्ये 15 जण मृत्यू पावले, तर 40 जखमी झाले होते. हा साजिद नोकरीच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात गेला होता. तिथल्याच स्थानिक महिलेशी लग्न करून दोन मुलांना जन्म देऊन तिथे राहत होता. पण, हे सगळे करताना तो आणि त्याचा मुलगा दहशतवादाचे प्रशिक्षण घेत होते. कारण काय, तर इस्रायलने गाझावर हल्ला केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील ‌‘ज्यूं‌’वर हल्ला करायचा म्हणून. तर हे असे आहे. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन नेता पॉलिनने शाळेमधले उघड केलेले सत्य हे धर्मांध दहशतवादाचे समाजात रुजू पाहणारे वास्तव म्हणू शकतो का?
 
 
Powered By Sangraha 9.0