अंधेरी सबवे वाहतूक कोडींबाबत कायमस्वरूपी तोडगा काढणार; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आश्वासन

28 Feb 2026 13:54:42

मुंबई : अंधेरी सबवेमध्ये पावसाळ्यात पाणी साठल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विविध उपाययोजना मुंबई महापालिका करत आहे, आहे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

मुंबईतील अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिमला जोडणारा अंधेरी सबवे हा एकमेव मार्ग आहे. तेथे पावसाळ्यात पाणी साचल्यानंतर वाहतूक कोंडी निर्माण होते. यामुळे अंधेरी सबवेबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याची नितांत आवश्यकता आहे, अशी लक्षवेधी विधानसभा सदस्य मुरजी पटेल यांनी विधानसभेत मांडली. आ. अमीत साटम आणि आ. दिलीप लांडे यांनी या चर्चेत सहभाग घेतला.

यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, "मुंबईतील अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम यांना जोडणारा अंधेरी भुयारी मार्ग हा एक पर्यायी मार्ग आहे. अंधेरी भुयारी मार्ग हा भौगोलिकदृष्ट्या खोलगट भाग आहे. या भुयारी मार्गावर पश्चिम उपनगरीय रेल्वे जाते. यामुळे भुयारी मार्गाच्या खोलीकरण किंवा रुंदीकरणासाठी भौगोलिक अडचणी आहेत. जर पावसाचे प्रमाण १९ मि.मी. प्रति तास पेक्षा जास्त झाल्यास या भुयारी मार्गात पाणी साचते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य आणि जलवाहिनी खात्यामार्फत पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा होण्यासाठी तात्पुरती उपाययोजना म्हणून आवश्यकतेनुसार एकूण २२५० घन मीटर प्रति तास इतक्या क्षमतेने पाण्याचा निचरा करणारे तीन पंप बसविण्यात येतात."

१९७ कोटींचे काम प्रस्तावित

"अंधेरी पश्चिम ते अंधेरी पूर्वला जोडणाऱ्या अंधेरी सबवे व्यतिरिक्त गोखले ब्रिज मुख्य रस्ता आहे. गोखले ब्रिजच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. अति पावसामुळे अंधेरी भुयारी मार्ग बंद ठेवल्यास एस.व्ही. रोडवरील वाहतूक गोखले ब्रिजवर वळविण्यात येते. त्यामुळे अंधेरी पश्चिमेला वाहतूक कोंडीची समस्या होत नाही. मात्र, ५५ मिमी पेक्षा अधिक पाऊस पडला तर इथे पाणी साचू नये म्हणून १९७ कोटीचे काम प्रस्तावित आहे. या प्रश्नाबाबत सर्व विभागांची बैठक घेऊन यातून मार्ग काढणार आहे," असे त्यांनी सांगितले.


Powered By Sangraha 9.0