मानवजातीचा तारणहार : श्री गुरु तेग बहादुर

28 Feb 2026 17:59:25
Shri Guru Tegh Bahadur
 
‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदीला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरू तेग बहादूर साहिबजी ३५०वा शहिदी समागम राज्यस्तरीय समितीमार्फत नागपूर व नांदेड येथे भव्य समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आता दि. २८ फेब्रुवारी व दि. १ मार्च रोजी खारघर, नवी मुंबई येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या अनमोल कार्याची ही माहिती...
 
महान योद्धा, आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व आणि मातृभूमीचे प्रेमी नववे शीख गुरू श्री गुरू तेग बहादूरजी यांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानाची मानवता सदैव ऋणी राहील. त्यांनी विश्वबंधुता आणि धार्मिक स्वातंत्र्याचा संदेश दिला. संस्कृती, मातृभूमी आणि लोकांच्या हक्कांसाठी त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला. म्हणूनच त्यांना ‘हिंद-दी-चादर’ या दुर्मीळ सन्मानाने गौरवण्यात आले. आपण श्री गुरू तेग बहादूरजींचे ३५०वा शहिदी समागम वर्ष साजरे करत असताना, संस्कृतीच्या स्वातंत्र्याचे महत्त्व आणि मानवजातीच्या व मातृभूमीच्या कल्याणाविषयी शिकवण देणार्‍या त्यांच्या महान आदर्शांना पुन्हा समर्पित करणे आवश्यक आहे.
 
अतुलनीय श्री गुरू तेग बहादूरजींनी आपल्याला निर्भयपणे मुक्त जीवन जगण्याची शिकवण दिली. ‘त्यागमल’ ते ‘तेग बहादूर’ असे झालेले त्यांचे परिवर्तन मानवी इतिहासात फार कमी समांतर असलेली सांस्कृतिक दृढता, औचित्य, नैतिकता आणि शौर्याची कथा आहे. त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, पण सत्याचा मार्ग सोडला नाही. त्यांच्या देवत्वाची अशी शक्ती होती की, जेव्हा त्यांच्या शिष्याची त्यांच्या समोर क्रुरपणे हत्या करण्यात आली, तेव्हा ते खोल ध्यानात राहिले. जेव्हा त्यांनी स्वतः परमत्याग केला, तेव्हाही ते ध्यानात मग्न होते. आजच्या तरुण पिढीने श्री गुरू तेग बहादूरजींच्या जीवनातून, चारित्र्यातून आणि त्यागातून प्रेरणा घेऊन मानवता आणि नैतिक मूल्ये अंगीकारण्याची गरज आहे, जेणेकरून भारत पुन्हा विश्वगुरू होईल. अत्याचार आणि अन्यायापुढे झुकण्यास त्यांनी ठाम नकार दिला. त्यांनी आदर्श आणि तत्त्वांच्या मार्गावर चालण्याची निवड केली. श्री गुरू तेग बहादूरजी आणि त्यांच्या तीन भक्तांना भाई सती दास, भाई मती दास आणि भाई दयाला यांना बंदिवान करण्यात आले. संस्कृती आणि राष्ट्ररक्षणासाठी इ.स. १६७५ मध्ये श्री गुरू तेग बहादूरजींनी अत्यंत शांतपणे हौतात्म्य पत्करले. जुन्या दिल्लीतील चांदनी चौकातील शीशगंज साहिब हे त्याग आणि बलिदान यांच्या अंतिम गाथेचे प्रतीक आहे, ज्याला मानवी इतिहासात तोड नाही. भाई जैता सिंग यांनी श्री गुरू तेग बहादूरजींचे पवित्र शीश श्री आनंदपूर साहिब येथे नेले, जे जगभरातील शीखांसाठी सर्वांत पवित्र स्थळांपैकी एक आहे.
 
त्यांच्या बलिदानामुळे ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या तत्त्वावर आधारित प्राचीन सभ्यता आणि संस्कृती केवळ नष्ट होण्यापासून वाचली नाही, तर एक दृढ आणि सर्वसमावेशक राष्ट्र म्हणून उदयास येण्याच्या आपल्या सामूहिक प्रयत्नांमध्ये तो एक ऐतिहासिक टप्पा ठरला. शीख धर्माचा पाया हा मानवी इतिहासातील सामान्य विकास नव्हता, तर तो सर्व प्रकारच्या अत्याचारांविरुद्ध मानवतेची ढाल बनला. ही एक महान परंपरा होती आणि आजही आहे. श्री गुरू तेग बहादूर यांचे जीवन हे संस्कृती आणि मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या अतुलनीय बलिदानांचे सर्वोच्च उदाहरण आहे. श्री गुरू तेग बहादूरजींच्या शिकवणीतून आणि त्यागातून आपल्याला अनेक आणि बहुआयामी धडे मिळतात. त्यांचा त्याग, सत्यावरील अढळ विश्वास, अहिंसा आणि सर्वांप्रति परोपकारी दृष्टिकोन आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. अंधश्रद्धा, जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी संघर्ष केला, जेणेकरून प्रत्येक मानवाला आपल्या आवडीचे जीवन जगता येईल. खरा धर्म आपल्याला सर्वांशी चांगले वर्तन करण्याची आणि समाजाची शक्य तितकी सेवा करण्याची शिकवण देतो. त्यांनी दुर्बल आणि वंचितांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. त्यांचे पुत्र श्री गुरू गोविंद सिंगजी यांनी केवळ वडिलांची तत्त्वे आणि मूल्ये जपली नाहीत, तर खालसा निर्माण करून त्यांना पुढे नेले, जो धार्मिकता आणि न्यायासाठी लढण्याचे प्रतीक आहे.
 
आपण श्री गुरू तेग बहादूरजींचे हे महान वचन सदैव लक्षात ठेवले पाहिजे. आपण आपले जीवन सुख-दुःखांत, तसेच मान-अपमानात समान भावनेने जगले पाहिजे. त्यांच्या शिकवणीतून जीवनाचा उद्देश तसेच समता, समरसता आणि त्याग यांचे महत्त्व अधोरेखित होते. श्री गुरू तेग बहादूरजींचे महान शब्द हे मानवतेसाठी ऊर्जा आणि ज्ञानाचे चिरंतन स्रोत आहेत. गुरूंच्या शब्दांच्या मधुर पठणाचा भक्तांवर खोल परिणाम होत असे. त्यांनी अत्यंत शांततापूर्ण आणि मानवतावादी मार्गाने निरंकुश व धर्मांध शासकाशी संघर्ष केला. त्यांची शिकवण कालातीत आहे आणि येणार्‍या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील. श्री गुरू तेग बहादूर यांचे जीवन आपल्याला प्रत्येक परिस्थितीला शांततेने आणि खंबीरतेने सामोरे जाण्याची, तसेच सौहार्द, न्याय, समता आणि समरसतेवर आधारित सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याची प्रेरणा देते.
 
- अनिल आलुरकर
(लेखक उपसंचालक (माहिती) विभागीय माहिती कार्यालय, अमरावती आहेत.)
 
 
Powered By Sangraha 9.0