जपानी नवकल्पनांचे नवे जग

27 Feb 2026 12:58:45

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या जपान दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी यामानाशी प्रांतात अत्याधुनिक ‌‘लिनिअर मॅग्लेव्ह ट्रेन‌’चा अनुभव घेतला. ही ट्रेन ताशी 600 किलोमीटरपर्यंत वेग गाठू शकते. नियमित सेवेदरम्यान ही ट्रेन सुमारे 500 किलोमीटर प्रतितास वेगानेच धावते. तुलनेत जपानमधील विद्यमान ‌‘बुलेट ट्रेन‌’ सुमारे 300 किलोमीटर प्रतितास वेगाने धावते. या ट्रेनच्या वेगवान आणि सुरक्षित प्रवसाचा अनुभव घेतल्यानंतर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा प्रवास अत्यंत रोमांचक असल्याचे सांगितले. चुंबकीय शक्तीवर अक्षरशः ‌‘तरंगत‌’ ही ट्रेन अविश्वसनीय वेगाने धावते, हा अनुभव भविष्यातील वाहतुकीच्या दिशेची झलक देणारा असल्याचेही योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले.

जपानने विकसित केलेली ‌‘सुपरकंडक्टिंग मॅग्नेटिक लेव्हिटेशन‌’ ही तंत्रज्ञान प्रणाली, आंतरशहरी वाहतुकीत क्रांती घडवणारी आहे. जपान जगातील पहिली ‌‘मॅग्नेटिक लेव्हिटेशन‌’ प्रणाली असणारी प्रवासी रेल्वेलाईन 2027मध्ये, सुरू करण्याची योजना आखत आहे. ‌‘शिओ शिंकानसेन‌’ ही लाईन टोकियो आणि नागोया यांना जोडणार आहे. ताशी 500 किमी इतक्या प्रचंड वेगाने धावणारी ही रेल्वे, पारंपरिक बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक प्रगत ठरेल, यामध्ये शंका नाही
‌‘मॅग्नेटिक लेव्हिटेशन‌’ प्रणाली तंत्रज्ञान ‌‘सुपरकंडक्टिव्हिटी‌’ या तत्त्वावर आधारित आहे. विशिष्ट अतिशीत तापमानात पदार्थांचा विद्युत प्रतिकार जवळजवळ शून्य होतो. अशा अवस्थेत लहान; पण अत्यंत शक्तिशाली ‌‘सुपरकंडक्टिंग‌’ चुंबकांचा वापर करून ट्रेन रुळांपासून सुमारे 10 सेंमी उंच हवेत तरंगते. त्यामुळे घर्षण कमी होऊन, वेगामध्ये प्रचंड वाढ होते. जपानबाहेरील ‌‘मॅग्लेव्ह‌’ तंत्रज्ञानात मोठ्या आकाराच्या ‌‘नॉन-सुपरकंडक्टिंग कॉईल्स‌’चा वापर केलेला असल्याने, त्यांची उंची आणि वेग मर्यादित राहतो. जपानची ही अत्याधुनिकक् प्रणाली मूलभूत स्वरूपात वेगळी आणि अधिक सक्षम आहे.

या तंत्रज्ञानावर जपानने 1962 पासूनच संशोधन सुरू केले असून, 1997 मध्ये माऊंट फुजीच्या उत्तरेला पूर्ण झालेल्या यामानाशी ‌‘मॅग्लेव्ह लाईन‌’ या चाचणी मार्गावर ‌‘मॅग्नेटिक लेव्हिटेशन‌’ प्रणालीची चाचणी घेण्यात आली. एप्रिल 2015 मध्ये 603 किमी प्रतितास एवढ्या अचाट वेगाचा जागतिक विक्रमदेखील नोंदवण्यात आला. तसेच दोन गाड्या परस्परविरुद्ध दिशेने एक हजार, 026 किमी प्रतितास सापेक्ष वेगानेही धावल्याने, यातील सुरक्षा उच्च दर्जाची असल्याचेही स्पष्ट झाले. ही प्रणाली अपेक्षित प्रवासीसेवेसाठी आवश्यक क्षमतेपेक्षा जास्त अंतर दररोज पार करू शकते, हेदेखील यातोन सिद्ध झाले आहे.

वेगाबरोबर पर्यावरणाच्या दृष्टीनेही ‌‘मॅग्नेटिक लेव्हिटेशन‌’ प्रणाली महत्त्वाची ठरते. हवाई प्रवासाच्या तुलनेत ती केवळ अर्धी ऊर्जा वापरते आणि त्यातून होणारे प्रतिप्रवासी कार्बन उत्सर्जन केवळ एकतृतीयांश एवढेच आहे. त्यामुळे हवामानबदलाच्या पार्श्वभूमीवर ही वाहतूक पद्धती अधिक शाश्वत पर्याय ठरते. या तंत्रज्ञानाची जागतिक पातळीवर दखल घेतली जात असून, ‌‘सेंट्रल जपान रेल्वे कंपनी‌’ अमेरिकेतील ‌‘द नॉर्थ-ईस्ट मॅग्लेव्ह‌’ सोबत भागीदारी करत आहे. वॉशिंग्टन डीसी ते बाल्टिमोर आणि पुढे न्यूयॉर्कपर्यंत ‌‘मॅग्नेटिक लेव्हिटेशन‌’ प्रणाली असणारा मार्ग उभारणे, हे या भागीदारी मागचे उद्दिष्ट. अमेरिकन सरकारने या प्रकल्पाच्या अभ्यासासाठी मेरीलॅण्ड राज्याला 27.8 दशलक्ष डॉलर्सची मदत मंजूरही केली आहे.

अमेरिकेच्या ‌‘ईशान्य कॉरिडोर‌’मध्ये जवळपास 50 दशलक्ष लोकसंख्या असून, देशाच्या 20 टक्के ‌‘जीडीपी‌’चे उत्पादन येथे होते. मात्र, पायाभूत सुविधा जीर्ण झालेल्या असून, हवाई आणि रेल्वे वाहतुकीतील विलंब सातत्याने वाढता आहे. नव्या ‌‘अल्ट्रा-हाय स्पीड‌’ रेल्वेची उभारणी केल्यास केवळ पहिल्या टप्प्यात दोन लाख, पाच हजार रोजगारांची निर्मिती आणि 22.5 अब्ज डॉलर्सची ‌‘जीडीपी‌’ वाढ अपेक्षित आहे. दरवर्षी सुमारे 600 दशलक्ष डॉलर्सची अतिरिक्त आर्थिक भर आणि 20 लाख टन हरितगृह वायू-उत्सर्जनात घटदेखील होईल. ‌‘मॅग्नेटिक लेव्हिटेशन‌’ प्रणाली केवळ जगातील सर्वात वेगवान रेल्वे नाही; तर ती तांत्रिक प्रगती, पर्यावरणपूरक दृष्टी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचे प्रतीक आहे. जपान आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीचे हे आधुनिक प्रतीक, भविष्यातील वाहतुकीचे स्वरूप बदलू शकते.


Powered By Sangraha 9.0