जैसलमेर (राजस्थान) : ( President Droupadi Murmu Prachand Helicopter Flight ) देशाच्या सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजस्थानातील जैसलमेर हवाई दलाच्या तळावरून स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर ‘प्रचंड’मधून उड्डाण करून नवा इतिहास घडवला. ‘प्रचंड’मध्ये सह-वैमानिक म्हणून उड्डाण करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. या धाडसी उड्डाणातून त्यांनी भारतीय वायुसेनेच्या शौर्याला सलाम करत आत्मनिर्भर भारताचा ठाम संदेश दिला.
कॉकपिटमधून सैनिकांना सलाम
सकाळी सुमारे ९ वाजून १५ मिनिटांनी राष्ट्रपती जैसलमेर तळावर दाखल झाल्या. लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांना हेलिकॉप्टरच्या तांत्रिक वैशिष्ट्यांची आणि कार्यक्षमतेची माहिती दिली. त्यानंतर त्या कॉकपिटमध्ये बसल्या आणि सकाळी १०.१५ वाजता ग्रुप कॅप्टन एन. एस. बहुआ यांच्यासोबत सुमारे २५ मिनिटांचे उड्डाण केले. या उड्डाणादरम्यान सीमावर्ती भाग आणि पोखरण फील्ड फायरिंग रेंजची हवाई पाहणी करण्यात आली.
जैसलमेरच्या ऐतिहासिक सोनार किल्ल्यावरून उड्डाण करताना राष्ट्रपतींनी रेडिओ संदेशाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. “मी आज ‘प्रचंड’ हेलिकॉप्टरमधून उड्डाण करत आहे. हे हेलिकॉप्टर भारताच्या आत्मनिर्भरतेचे मजबूत प्रतीक आहे. देशाच्या वीर सैनिकांना मी अभिमानाने धन्यवाद देते. जय हिंद, जय भारत,” अशा शब्दांत त्यांनी सशस्त्र दलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
‘वायु शक्ती-2026’ युद्धाभ्यासाच्या साक्षीदार
पाकिस्तान सीमेजवळील पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये संध्याकाळी होणाऱ्या वायु शक्ती-2026 या भव्य युद्धाभ्यासालाही राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. या सरावात भारतीय वायुसेनेची अत्याधुनिक लढाऊ विमाने अचूक लक्ष्यभेदन आणि मारक क्षमतेचे प्रदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित राहतील.
‘प्रचंड’ आत्मनिर्भर भारताचे प्रतीक
‘प्रचंड’ हे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित हलके लढाऊ हेलिकॉप्टर असून उंच पर्वतीय भागातही प्रभावी कामगिरी करण्यासाठी ते सक्षम आहे. शत्रूच्या तळांवर अचूक प्रहार करण्याची आणि कठीण हवामानातही कार्यरत राहण्याची त्याची क्षमता उल्लेखनीय मानली जाते. तीन वर्षांपूर्वी नवरात्रीच्या अष्टमीदिनी हे हेलिकॉप्टर भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात सामील झाले होते. त्यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही या हेलिकॉप्टरमधून उड्डाण करत त्याचे कौतुक केले होते.
राष्ट्रपतींची ऐतिहासिक कामगिरी
राष्ट्रपती मुर्मू यापूर्वी सुखोई आणि राफेल लढाऊ विमानांतून उड्डाण करणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. आता ‘प्रचंड’ हेलिकॉप्टरमधील उड्डाणामुळे त्यांनी आणखी एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. त्यांच्या या कृतीमुळे सशस्त्र दलांचा आत्मविश्वास वाढण्यासोबतच देशातील तरुणांमध्ये संरक्षण क्षेत्राबद्दल प्रेरणा निर्माण होणार आहे.
राष्ट्रपतींच्या या धाडसी उड्डाणाने भारतीय संरक्षण सामर्थ्य, तांत्रिक प्रगती आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने देशाची वाटचाल अधिक बळकट झाल्याचा संदेश दिला आहे.