भारत-इस्रायलचे समानशील मैत्र!

27 Feb 2026 11:41:34

भारत-इस्रायल यांच्यात अनेक समानता आहेत. हिंदू आणि ज्यू हे समाज आज जगात अल्पसंख्य आहेत. या दोन प्राचीन संस्कृतींवर गेली अनेक शतके इस्लामी दहशतवाद्यांनी हल्ले केले असले, तरी या देशांनी त्यांचा यशस्वीपणे मुकाबला करून आपले अस्तित्व टिकवून धरले आहे. दहशतवादाचे सावट अजून कायमच असल्याने या स्थितीत इस्रायलशी भारताचे असलेले मैत्रीचे नाते हे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अधिक घट्ट करणे गरजेचे होते. मोदी यांची भेट त्यादृष्टीने उपयुक्त ठरली आहे.

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान या नात्याने दुसर्‍यांदा इस्रायलच्या भेटीवर गेले आहेत. विशेष म्हणजे, पश्चिम आशिया क्षेत्रावर सध्या भीषण युद्धाचे काळे ढग जमा झाले असतानाच, मोदी यांचे इस्रायलमध्ये जाणे हे त्यांच्या धाडसी राजकीय धोरणाचे आणि भारताच्या सद्भावनेचे द्योतकच म्हणावे लागेल. मोदी यांचे इस्रायलमध्ये खूपच उत्साहाने आणि आत्मीयतेने स्वागत झाले. इस्रायली संसदेपुढे (नेसेट) भाषण करण्याचा बहुमान मिळविणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान. या भाषणाच्या वेळीही इस्रायलमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून, मोदी यांच्याबद्दल सारखेच प्रेम व्यक्त करण्यात आले. मोदी यांना इस्रायली संसद अध्यक्षांकडून सर्वोच्च सन्मानही प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, यापूर्वी ‘पॅलेस्टिनी ऑथोरिटी’कडूनही मोदी यांना त्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार बहाल करण्यात आला होता. मोदी यांनी इस्रायली संसदेपुढे केलेल्या भाषणात, या दोन्ही देशांमध्ये अनेक शतकांपासून असलेले सांस्कृतिक संबंध अधोरेखित केले. ज्यू-धर्मियांना आपल्या समाजात सामावून घेणारा आणि त्यांचा छळ न करणारा भारत हा एकमेव देश असल्याचे त्यांनी सांगितले, तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून आपली कृतज्ञताही व्यक्त केली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि मोदी यांच्यात वैयक्तिक स्वरूपाचे मैत्रीसंबंध असल्याचा लाभही या दोन देशांना होत आहे.

मोदी यांनी आपल्या भाषणात दहशतवादावर विशेष भर दिला, हे स्वाभाविक असेच. त्यात त्यांनी दि. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘हमास’ने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा उल्लेख करून, त्याचा कठोर शब्दांत निषेधही केला. तसेच मुंबईवर दि. २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्याचाही विशेष उल्लेख केला कारण, त्यात काही इस्रायली नागरिकांचाही बळी गेला होता. जगाला आज सर्वाधिक धोका हा दहशतवादापासूनच असून, भारत व इस्रायल हे दोन देश त्याचे सर्वात मोठे बळी ठरले आहेत. त्यामुळे हा विषय दोन्ही देशांसाठी विशेष जिव्हाळ्याचा असाच. भारत-इस्रायल यांनी काल जवळपास २७ क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार केले आहेत. त्यात शेतीपासून संरक्षणापर्यंत अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. यातील संरक्षण क्षेत्रातील करारांना विशेष महत्त्व आहे. याचे कारण, जग आज अतिशय धोकादायक अस्थैर्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला आता चार वर्षे पूर्ण झाली असली, तरी ते इतक्यातच थांबण्याची चिन्हे नाहीत. दुसरीकडे अमेरिका आणि इराण यांच्यात केव्हाही युद्धाचा भडका उडू शकतो, अशी स्थिती आहे. त्याचा पहिला फटका इस्रायलाच बसणार आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सध्या युद्धबंदी असली, तरी तेथे कधीही संघर्ष सुरू होऊ शकतो. तैवानचा घास घेण्यास चीन टपून बसला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात शांतता असली, तरी पाकिस्तानमध्ये अंतर्गत अशांततेचा स्फोट होत आहे. शिवाय, त्या देशाचे अफगाणिस्तानशी अघोषित युद्ध सुरूच आहे.

या पार्श्वभूमीवर भारत-इस्रायल यांच्यातील संरक्षणविषयक करार महत्त्वाचे आहेत. गेल्या काही वर्षांत भारताने आपल्या संरक्षण-सिद्धतेत विलक्षण सुधारणा केली आहे. एकेकाळी संरक्षणसामग्रीचा निव्वळ आयातदार देश असलेला भारत, आज उच्च तंत्रज्ञानावर आधारित अनेक शस्त्रास्त्रे निर्यात करू लागला आहे. संरक्षणाच्या काही क्षेत्रांमध्ये तो स्वयंपूर्ण बनला असला, तरी अनेक बाबतीत त्याला अत्याधुनिक आणि उच्च-तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रास्त्रांची गरज भासते. इस्रायलने हवाई संरक्षणाच्या विषयात विशेष प्रावीण्य मिळविले असून, त्याच्याकडून भारत अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकत घेत असतो. आताही इस्रायलने आपली ‘आयर्न बीम’ ही अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हवाई संरक्षण यंत्रणा, भारताला विकत देण्याचे सूतोवाच केले आहे. या यंत्रणेची झलक गतवर्षी इस्रायल-इराण यांच्यातील संघर्षात जगाने पाहिली होती. ही यंत्रणा मिळाल्यास भारताची हवाई संरक्षणावरील खर्चात मोठी बचत तर होईलच; पण त्याच्या हवाई सुरक्षेला मोठा लाभही होईल. यासारख्या अत्यंत आधुनिक यंत्रणा आणि शस्त्रसामग्री सहसा दुसर्‍या देशांना दिली जात नाहीत पण, इस्रायलने ती भारताला देण्याची तयारी दाखविली आहे, यावरूनच या दोन देशांतील मैत्रीचे बंध किती पिळदार आहेत, ते दिसून येते.

‘समानशील व्यसनेषु सख्यम्’ या संस्कृत सुभाषिताचा अर्थ असा होतो की, वाईट सवयी असलेल्या व्यक्तींमध्ये लगेच मैत्री होते. मूळ सुभाषिताचा भाव नकारात्मक असला, तरी आजच्या जागतिक परिस्थितीच्या संदर्भात हे सुभाषित चांगल्या अर्थाने भारत-इस्रायल यांच्या मैत्रीलाही लागू होते. भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये अनेक समानता आहेत. आजच्या जगात ज्यू आणि हिंदू हे जागतिक स्तरावरील अल्पसंख्य समाज आहेत. या दोन्ही देशांना प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभला असून, या दोन्ही देशांवर इस्लामी दहशतवादी सतत हल्ले करीत असतात. तरीही, या दोन देशांनी खंबीरपणे या दहशतवादाशी यशस्वी मुकाबला केला आहे. आपल्या सामर्थ्याचा प्रत्यय दिल्यामुळे एकेकाळचे इस्रायलचे शत्रूदेश, आज त्याच्याशी सौहार्दाचे संबंध राखून आहेत. भारतानेही मोदी सत्तेवर आल्यापासून, जगातील आपल्या मित्रदेशांच्या संख्येत वाढ केली आहे.

रणांगणात एकमेकांविरुद्ध उभ्या असलेल्या दोन्ही राष्ट्रांचा भारत हा मित्रदेश असू शकतो, ही अपवादात्मक आणि अभूतपूर्व कामगिरी मोदी यांनी आपल्या राजनैतिक मुत्सद्देगिरीने आणि भारताच्या आर्थिक ताकदीवर साध्य करून दाखविली आहे. रशिया आणि युक्रेन, तसेच इराण आणि इस्रायल या देशांशी भारताच्या संबंधांची व्याप्ती ही मैत्री ते सौहार्दापर्यंत व्यापक आहे. ही गोष्ट अमेरिकेने लक्षात घेतली, तर भारताशी निष्कारण संबंध बिघडविण्याची घोडचूक तो देश करणार नाही. प्रसंगी अमेरिकेलाही सामरिक क्षेत्रात धूळ चाटविण्याची क्षमता आजचा भारत राखून आहे. आर्थिक निर्बंधांना भारताने फारसे महत्त्व दिले नव्हते. १९९९ मधील अण्वस्त्र चाचणीनंतर भारतावर अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे, भारताचा अप्रत्यक्ष लाभच झाला होता. कारण, संरक्षण क्षेत्रातील अनेक तंत्रज्ञान भारताने स्वबळावर विकसित केले होते. ही गोष्ट अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लक्षात घेतली, तर ते आज भारताशी मैत्रीचाच हात पुढे करतील. अर्थात, इस्रायलसारखा दोस्त असल्यावर भारताला दुसर्‍या फसव्या मैत्रीची गरज नाही.



Powered By Sangraha 9.0