डोंबिवली : डोंबिवलीतील ज्योतिषाचार्य वेदमूर्ती ल.कृ.पारेकर यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी दि. २७ फेब्रुवारी रोजी रात्री १.३० वाजताच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. ते ६८ वर्षाचे होते.
पारेकर हे मूळचे पंढरपूरचे होते. ते वेद, ज्योतिष आणि अध्यात्म यांचे गाढे अभ्यासक होते . त्यांनी शुक्ल यजुव्रेदाचा पुष्कळ अभ्यास केला होता. यज्ञ,याग यांचे शास्त्र त्यांना उत्तम ज्ञात होते. त्यांच्या ज्योतिष विद्येने त्यांनी अनेकांना गेली दशकभर मार्गदर्शन केले आहे. ते कर्मठ होते. पंढरपूरच्या गादीविषयी त्यांना चांगली माहिती होती. पंढरपूरमधून ‘पंढरी संदेश’ मासिक वर्षानुवर्ष प्रसिध्द होत असे. त्यांचा बरचसे संकलन त्यांच्याकडे होते. गोरे शास्त्री यांनी कृष्णाच्या महंतीवर आधारित ‘भक्ती रसायन’ नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथांचा त्यांनी प्रचार केला. त्या ग्रंथाच्या प्रति घेऊन त्यांनी नागरिकांना वाटल्या. त्यांनी मंदिरात प्रवचने केली आहेत.
नववर्ष स्वागतयात्रेत त्यांचा सहभाग असे. गणपतीची पूजा कशी करायची याबाबतचे मराठी आणि इंग्रजी भाषेतील पहिले पुस्तक त्यांनी काढले होते. ते मधुमेहाने त्रस्त होते. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्यावर शुक्रवारी शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, सून, मुलगी, नातवंडं असा परिवार आहे.