कृत्रिम फुलांवर बंदी, वापरल्यास होणार कठोर कारवाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

27 Feb 2026 18:33:32
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) कृत्रिम फुलांवर राज्यात बंदी असून अशा फुलांचा वापर केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना दिला.
भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले की, “कृत्रिम फुले आणि प्लास्टिक सजावटीच्या साहित्यामधील रसायनांमुळे डोकेदुखी, त्वचाविकार, खाज, डोळ्यांची जळजळ, लहान मुलांमध्ये श्वसनाचे त्रास उद्भवतात. तसेच रंगांतील दीर्घकालीन रसायनांमुळे कर्करोगाचा धोका वाढतो हे संशोधनातून समोर आले आहे. यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते.” यावेळी आमदार जयंत पाटील यांनी फुल बाजारांचा प्रश्न उपस्थित केला. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यावर उत्तर दिले.
 
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जैविकदृष्ट्या विघटनशील नसलेल्या साहित्यापासून तयार केलेल्या कृत्रिम फुलांवर राज्यात बंदी आहे. या बंदीबाबत अधिक स्पष्टता यावी यासाठी स्वतंत्र शासन निर्णय (जीआर) काढण्यात येईल. तसेच अशा फुलांचा वापर केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. यासोबतच डेकोरेटर्स आणि सजावटीस परवानगी देणारे मोठ्या मॅरेज हॉल्सवर कारवाईची तरतूद करू. अनेकदा ही कृत्रिम फुले इतक्या कुशलतेने तयार केली जातात की, ओळखताच येत नाही. यामुळे पर्यावरणाचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे पर्यावरण विभागाकडून या संदर्भातील कारवाई अधिक प्रभावीपणे करण्यात येईल. आवश्यकता असल्यास इतर संबंधित विभागांचाही यात समावेश केला जाईल, असे त्यांनी सांगितले.”
 
हेही वाचा : प्रत्येक भागातील मराठीचा गोडवा कायम ठेवायला हवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
फुल बाजार चाललेच पाहिजे
 
मुंबई महापालिकेच्या वतीने फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना दादरसह अन्य फुल बाजार बंद करण्यात आल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कोणतेही फुल मार्केट बंद करण्यात आल्याची माहिती सध्या उपलब्ध नाही. तरीही अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान काही विक्रेते विस्थापित झाले असल्यास त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देऊ. फुल बाजार चाललाच पाहिजे. आपण सगळे सनातन संस्कृतीला मानणारे लोक असून आपल्याकडे फुलांचे महत्व मोठे आहे. त्यामुळे फुलांच्या बाजारपेठा योग्य पद्धतीने चालाव्या यासाठी महानगरपालिकेला आवश्यक ते आदेश देण्यात येतील,” असेही त्यांनी सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0