समाजसेवाव्रती विरेश

27 Feb 2026 12:31:27

आजार आणि रुग्ण या दोहोंना एकमेकांपासून दूर ठेवण्याची अविरत कसरत करण्यात तल्लीन असलेल्या विरेश न्याती यांच्या विषयी...

रुग्णसेवेसारखे सत्कर्म नाही. हा इतरांसाठी आदर्श आणि स्वतःसाठी आत्मिक समाधानाचा राजमार्ग आहे. यासंदर्भात कोणत्याही रुग्णाला आवश्यक असणारी सेवा कुठेही तत्काळ देणे आणि त्यासाठी तसे नेटवर्क उभे करणारे विरेश न्याती हे व्यक्तिमत्त्व अतिशय निराळे असेच. समाजसेवेचे बाळकडू मिळालेले विरेश मूळचे पुण्याचे. घरातूनच समाजसेवेचा वारसा लाभल्याने, विरेश यांचा समाजसेवार्थ जीवन समर्पित करण्याचा निर्णय लहानपणीच झाला होता. शालेय शिक्षण घेत असतानाच, त्यांनी विविध संस्थांसोबत काम सुरू केले. बालवयातच गड-किल्ले स्वच्छता, नदीची स्वच्छता, मंदिर स्वच्छता अशा कामांतून समाजसेवेच्या कार्याचा त्यांनी श्रीगणेशा केला. विरेश यांनी महाविद्यालयीन काळातही ‌’की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने‌’ या उक्तीनुसार समाजसेवेचे व्रत अखंडपणे सुरूच ठेवले. विविध उपक्रमांत, स्पर्धांत महाविद्यालयांकडून त्यांनी प्रतिनिधित्वही केले. त्यांचा मूळ स्वभावच त्यांना कार्यमग्नता साधण्यात साहाय्यभूत ठरला. इतरांप्रती असलेला आत्मभाव आणि इतरांच्या वेदना दूर करण्यासाठीची तळमळ विरेश यांच्यात असल्याने, त्यांनी स्वत:ला या कामात झोकून दिले.

खरेतर हे क्षेत्र सध्या पैसे कमाविण्याचे माध्यम म्हणून बदनाम झाले आहे. मात्र, सुदैवाने विरेश यांनी यातील व्यावसायिकीकरण आणि लबाडीला ‌‘ठो‌’ दिला आणि निव्वळ ‌‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा‌’ हे ब्रीद अंगीकारून, आपल्या कार्याला सुरुवात केली. आज त्यांना मिळत असलेले समाधान हे बिलियन-ट्रिलियन, लाखो-करोडोंपेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचे ते सांगतात. रुग्णसेवेत संवाद हा अतिशय महत्त्वाचा भाग. आजारावर उपचार तर होतातच; मात्र ज्या वेदना असतात, त्या संवेदनांशिवाय समोरच्याला कळत नाहीत. विरेश याबाबतीत अतिशय आग्रही आणि सकारात्मक आहेत. इतरांच्या वेदनेवर संवेदनेतून फुंकर घालताना त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही.

औषधनिर्माणशास्त्राची पदवी संपादन केल्यानंतर, रुग्णसेवेला वाहून घेऊन काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. रुग्णालयातील गरीब रुग्णांना भेटून, त्यांना हव्या असणाऱ्या सेवा उपलब्ध करण्याचे काम त्यांनी सुरू केले. गरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे लक्षात आल्यानंतर, ग्रामीण भागातही आपले नेटवर्क उभे करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी समाजमाध्यमांचा वापर करत, ‌‘न्याती हेल्थकेअर‌’ नावाने संस्थाही सुरू केली. कोणत्याही रुग्णाचा रात्री-अपरात्री कधीही फोन आला, तरी आज रुग्णांना सहकार्य केले जाते. ‌‘कोरोना‌’च्या लाटेत ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता असताना, पुण्यातील रुग्णांना ऑक्सिजन मिळावा यासाठी विरेश आणि त्यांची टीम प्रयत्नरत होती. ‌‘कोरोना‌’ काळातही रुग्णसेवा करत, त्यांनी अनेकांचे दुःख हलके केले. यामुळे पुण्यातील नागरिकांच्या मनात त्यांना विशेष स्थान आहे.

विरेश हे शांत स्वभावाचे असून, अनेक सामाजिक कार्यक्रमांत त्यांचा सक्रीय सहभाग असतो. विविध धार्मिक कार्यांच्या आयोजनातही विरेश हिरीरिने पुढाकार घेतात. यामधूनच त्यांनी मोठा लोकसंग्रह जोडला आहे. लोकसहभागासाठी विविध क्रीडा स्पर्धा, सहलींचे आयोजनही ते करतात.व्यावसायिक नेटवर्किंगच्या माध्यमातून अनेक व्यावसायिकांनाही विरेश मदत करतात. आपल्या लोकसंग्रहाचा वापर जनतेच्या भल्यासाठी केला पाहिजे, यासाठी ते सदैव प्रयत्नरत असतात. संस्थेची स्थापना केल्यापासून त्यांनी अनेक रुग्णालयांनाही मदतीचा हात दिला. ग्रामीण भागातील रुग्णाला सहकार्य केल्यानंतर, त्याच्याशी ते संपर्कात राहातात, हा त्यांचा विशेष गुण. रुग्णांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या विविध संस्थांशी आज ते जोडले गेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही मदत करताना त्यांना विशेष समाधान मिळते. कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांनी फोन केला की, ते लगेच हजर होऊन ज्येष्ठ नागरिकांसोबत गप्पा मारतात, त्यांच्या समस्याही जाणून घेतात.

आषाढी एकादशीच्या वारीत आवर्जून सहभागी होऊन, वारकऱ्यांची सेवा करण्याचे कार्यही विरेश आनंदाने करतात. पुण्यात सातत्याने विविध जाती-धर्माचे कार्यक्रम होतच असतात, या कार्यक्रमांमध्ये बाहेरगावाहून नागरिक येतात. त्यांच्या आरोग्याच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी, ‌‘न्याती हेल्थकेअर‌’ची टीम अशा कार्यक्रमात हजर असते. विरेश यांच्या या सेवाकार्यासाठी अनेक संस्थांनी त्यांना गौरविले आहे. धार्मिक कार्याची आवड असल्याने अनेक धार्मिक स्थळांना भेटी देत, तेथे येणाऱ्या भक्तांची विचारपूस करून सहकार्य करण्यातही विरेश यांना समाधान लाभते. आपली सामाजिक कार्याची आवड जोपासत अनेकांना आपल्या कार्यात सामावून घेणाऱ्या विरेश न्याती यांना, त्यांच्या पुढील कारकिदसाठी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’च्या हार्दिक शुभेच्छा.


- शशांक तांबे





Powered By Sangraha 9.0