आप्रायणात्‌

26 Feb 2026 12:16:54

प्राणोत्क्रमण, आत्मार्पण, निधन, स्वर्गवास, अपसर्पण, उपसर्पण, देहांत, मृत्यू, प्रायोपवेशन, समाधी हे सारे शब्द सारखेच? नाही! प्रत्येक शब्दाला अर्थ वेगळा आहे. याला अनुषंगिक कर्माचा आशयही वेगळा आहे. मग स्वा. सावरकर जेव्हा ‌‘आत्मार्पण‌’ हा शब्द योजून देह ठेवतात, त्याचे विलेषण शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे हे अभ्यासकांचे कर्तव्यच!

दर्शनात्‌‍ ऋषिः‌’ अशी प्रसिद्ध व्याख्या आहे. कोणताही मनुष्य घ्या, तो वागतो कसा, त्याने आदर्श काय घालून दिले, त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक किती, त्याच्या वागण्यामागचा हेतू, त्याने पाळलेली मनाची आणि चित्ताची शुद्धी, लोकांचे दुःख कमी व्हावे म्हणून त्याच्या मनीची तळमळ, त्याची सत्यनिष्ठा, वागण्यातला खरेपणा, अतिशय समाधानी वृत्ती... खरोखरच अशा साध्यासाध्या; पण आचरायला अत्यंत कठीण गोष्टींतूनच त्याचे सामान्यत्व वा असामान्यत्व ठरत असते. असे मनाने निर्व्याज्य, साधे, सरळमाग लोकच परमेश्वराला आपलेसे करतात.

वाचकहो, आजचा ‌‘आत्मार्पण दिना‌’चा लेख हा त्या महापुरुषाची जी पुण्याई, तिची मीमांसा करणारा असावा, असे मनात योजले होते. पण, तसे भलते धाडस मनास न पटून, ‌‘स्तुवंजिह्रेमि त्वां न खलु ननु धृष्टा मुखरता‌’ असे पुष्पदंत गंधर्वांच्या शब्दांत सावरकरांच्या अतिशय साधेपणाचे आणि विवेकाचे दाखले आज देतो आहे. अहो, मनाचा साधेपणा, हेतूची शुद्धी हीच विवेकवृद्धत्व पावती झाली म्हणजे धन्यता आणि कृतकृत्यतेत परिवर्तित होत असते.

लहानपणापासून तात्यारावांचा स्वभाव फार कनवाळू असे. प्रत्येकास त्यांचा फार आधार वाटे. लहानपणी भगूरला असताना, येथील थकलेल्या मजूर मंडळींना लहानगे सावरकर आपल्या पायरीवर थोडा वेळ आराम करण्यास सांगत, त्यांची विचारपूस करत. हीच कनवाळू वृत्ती पुढे जाऊन अंदमानातील अनेक कैद्यांना साक्षर करण्यासाठी प्रवृत्त झालेली आपणास दिसते. अन्यायाची त्यांना कोण चीड. मदनलाल धिंग्रांच्या निषेधार्थ लंडनमध्ये भरलेल्या सभेत ज्यांच्यावर हल्ला झाला आहे, नाकातून रक्त वाहते आहे, असा हा एकच वीर तरुण लंडनच्या कॅक्स्टन सभागृहात धिंग्रांची बाजू घेत, धीर चित्ताने सर्वांसमक्ष उभा होता. प्रसंगवश आणि पर्यायाने कायमच जशी वीरता सावरकरांनी अंगी बाणवली होती, तशीच नेहमीची-नित्याची कामे करीत असता, ‌‘स्व कर्मणा तमभ्यर्च सिद्धीं विन्दन्ति मानवाः‌’ अथवा ‌‘स्वे स्वे कर्मणी अभिरतः संसिद्धिः जायते नरः‌’ इत्यादी गीतेतील लोक मी मनात म्हणत असतो, असे सहजतेने बोलून जाणारे सावरकरच. अंदमानात प्रत्यही सकाळच्या वेळी काहीकाळ उन्हात व्यायाम करण्यास सोडले असता, ‌‘पातंजल योगसूत्रां‌’ची आवृत्ती मनात देत, त्यावर चिंतन करणारे योगी सावरकर. हा ठेवा त्यांना पूर्वजन्मीचाच लाभला होता. ‌‘चित्तवृत्ती निरोध‌’ त्यांना सहज साधत असे. “अंदमानात अनेकवेळा देशाबद्दल कुवार्ता कानी येऊन असाहाय्य स्थितीत जगणे नकोसे वाटे. त्यावेळी मी नेहमीच्या सवयीप्रमाणे आसन लावीत असे आणि मन ‌‘सुप्तसमनिश्चल‌’ होईपर्यंत ध्यानात लय पावत असे,” असे ते म्हणत. त्यांना कवीचे मन लाभले होते. ते अतिशय हळवे होते; पण जिथे आवश्यक, तिथे तितकेच कर्तव्यकठोरही होत. अशा वेळी ते स्वतःच्या मनाचेही ऐकत नसत. म्हणूनच, “ ‌‘अभिनव भारता‌’चा प्रमुख या नात्याने मला इंग्लंडला गेलेच पाहिजे,” असे म्हणत स्वतः चालत ते अटकेत येऊन पडले. फ्रान्समध्ये ते सुरक्षित होते; पण फक्त कर्तव्यपूतसाठी ते इंग्लंडला आले. त्यांच्या मनात, आचारात कायम सत्यच प्रतिष्ठित झालेले असे. अनेकदा भोवतालीच्या गदमुळे ते कपाटाच्या दरवाजात काही शोधण्याच्या निमित्ताने अंतर्मुख होऊनसे थांबत. अशा वेळी “माझ्या मनाची संसद भरे,” असे ते म्हणत. झालेल्या गोष्टींवर, घेतलेल्या निर्णयांवर ते चिंतन करीत. इतक्या कठोर निःस्वार्थ न्यायाने अशा वेळी ते निर्णय घेत की, कधीकधी त्यांनीच आधी घेतलेले निर्णय त्यापुढे स्वार्थावश वाटून चूक वाटावेत. भीती त्यांच्या मनाला कधी शिवत नसे, हेही तितकेच खरे. बारीसारखा काळ समोर असताना असो वा इंग्लंडमध्ये ‌‘ध्वम्‌‍‌’ बनविण्याचे प्रयोग असोत अथवा अस्पृश्यतेविरोधात आपल्याच लोकांच्या विरोधात असलेली चळवळ असो; कुठल्याही अन्यायाविरोधात निर्भय आवाज उठवणारे सावरकरच होते. खरोखरीच सत्यसंध व्यक्ती वेळ पडली म्हणजे खरेच ईश्वराशीही झुंजते हेच खरे!

‌‘घडणाऱ्या गोष्टींना म्हणजेच इंग्रजी साम्राज्याला ईश्वरेच्छा मानून स्वस्थ बसावे,‌’ या गावात आलेल्या एका संताच्या विधानाला लहानपणीच, ‌‘मग आमचे मनी ती सत्ता उलथवून लावावी अशी जी प्रेरणा, ती काय राक्षसाची इच्छा का? तीही ईश्वरेच्छा का मानू नये?‌’ असे खडेबोल सुनावणारेही सावरकरच! प्रयत्नाशिवाय स्वस्थ बसणे त्यांना मान्य नसे. वैयक्तिक आयुष्यात अध्यात्म मार्गाने ते आचरण करीत. एकदा एक व्यक्ती त्यांच्याशी समाधी योगाबद्दल बोलावयास आला असता, “हा चर्चेचा नाही; तर अनुभवाचा विषय आहे,” असे तात्याराव म्हणाले. ‌‘कुंडलिनी‌’ शक्तीचा अनुभव त्यांनी घेतला होता. अंदमानात असताना रात्र-रात्र ते ध्यानमग्न असत. आपल्या ‌‘सप्तष‌’ नावाच्या काव्यात त्यांनी हा अनुभव वर्णिलेला आहे. अध्यात्म मार्ग ही व्यक्तिगत पातळीवरची आचारसंहिता असली, तरी त्याचा मार्ग हा राष्ट्र, देश यांना समोर ठेवून केलेल्या कर्तव्यपूततूनच जात असतो, याबद्दल ते आग्रही असत.

लहानपणापासूनच सावरकरांना प्रसिद्धी लाभली होती. कीतच्या उत्तुंग शिखरावर ते पोहोचले होते. मार्सेलिसच्या त्यांच्या समुद्रातल्या एका उडीने फ्रान्सच्या पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागला होता. जितके उत्तम ते काव्य करीत, तितक्याच शिताफीने ते बंदूक चालवीत. कलेत ते इतके निपुण होते की, स्वतः लिहिलेली संगीत नाटके ते दीनानाथ मंगेशकर आदी मंडळींकडून स्वतः बसवून घेत. कधीकधी तर स्वतः तसा अभिनय करून दाखवीत. त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती लाभलेली असली, तरी रत्नागिरीत असताना भेटावयास येणाऱ्या लोकांना ते, “प्रथम शिवू नावाच्या भंग्याने काढलेल्या भोजनालयात जेवण करून या, तद्नंतरच मी भेटेन,” असे सांगत. रत्नागिरीमध्ये असताना एका साध्या चौपायीवर बसलेले तात्याराव तिथून अगदी सहज अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट याच्याशी तारेने संभाषण करीत. पण, आपल्या पदप्रतिष्ठेचा अहंभाव त्यांना कधी शिवला नाही. ते कायमच प्रसिद्धीस जबाबदारी मानीत.

अशा ‌‘द्वंद्वैः विमुक्तः‌’ असलेल्यास ‌‘परिग्रह‌’ तो कोणता! स्वातंत्र्योत्तर काळात आपले भगूरचे घर काँग्रेस सरकारने परत केले नाही. तेव्हा, “सारा हिंदुस्थानच माझे घर आहे. जो त्या घरात राहात आहे, त्याने खुशाल तिथे राहावे!,” असे दिगंबर वृत्तीदर्शक उद्गार काढणारे तात्याराव सावरकर! सत्याने काहीकाळ वागणे सोपे आहे. प्रसंगानुरूप सत्यनिष्ठेची चादर ओढून घेणारेही अनेक होऊन गेले. पण, ‌‘ब्रह्मसूत्रां‌’मध्ये सांगितल्याप्रमाणे ‌‘आप्रायणात्‌्‌‍‌’ म्हणजे प्राण असेपर्यंत अहर्निश त्या ईश्वराची सेवा, मानवजातीची सेवा करीत सत्याने जीवन कंठणे काय सोपे आहे का? खरोखरीच सावरकरांसारखा मनुष्य परत होणे नाही. एका ठिकाणी सावरकर म्हणतात की, “माझे आयुष्य आणि नियती हे फार लहानपणापासूनच देशाच्या, राष्ट्राच्या नियतीशी एका समान धाग्याने बांधले गेले होते.” वरवर वाचले, तर साधे वाक्य! पण, नीट विचार केला; तर त्यातले गांभीर्य आपणास जाणवते. असे म्हणतात की, राजा, प्रधान, न्यायाधीश यांमध्ये दीक्पालांचा अंश असतो. तोच दैवी अंश आपणास तात्यारावांमध्ये क्षणोक्षणी दिसतो.

मधल्या काळात तुरुंगात असताना सावरकरांना मलेरिया, रक्ती अमांश, ताप असे एकाच वेळी झालेले असताना, त्यांच्यावर उपचारही नीट होऊ शकले नाहीत. अशात देहाचे आवरण किती काळ अजून सांभाळायचे, अशा विचाराने त्यांनी भिंतीवर किती दिवस देह सांभाळणे सुसह्य होते, आज किती दिवस मरणोन्मुख अवस्था अनुभवांस येते, याचा आलेख मांडला होता. त्यामध्ये 60 दिवसांत 15 एक दिवस तरी प्रकृती जिवंत राहावेसे वाटावे इतकी बरी होती, असे त्यांस दिसले. तेव्हाही ‌‘योगसूत्रा‌’तील सगळेच अजून दुःखमय नाही (योगसूत्र - सर्वैः दुःखैः विवेकीनः) यावर कोटी करीत, ‌‘पहावे तर मग अजून जगून थोडे‌’ असे म्हणत त्यांनी पुनश्च कामास सुरुवात केली.

दि. 26 फेब्रुवारी 1966 रोजी डोळे उघडे ठेवून, 24 दिवसांच्या प्रायोपवेशनानंतर परमेश्वराच्या हाती हात देत, विनायक दामोदर सावरकरांनी समाधी घेतली. स्वतःच्या कर्तव्यपूतची धन्यता जशी त्यांच्या शेवटच्या घेतलेल्या छायाचित्रात दिसते, तसेच हिंदूंनी आपले ऐकले नाही; त्यामुळे हिंदुराष्ट्राचा घात झाला असल्याच्या दुःखाची छायाही त्यांच्या डोळ्यांत जाणवते. खरोखरच देव आले, देवांसारखे जगले आणि देवांसारखे परतले. त्या तेजात अखंड हिंदुस्थान न्हाऊन निघाला. त्यातले हे काही स्मृतिरूपी मोती!

- आदित्य शेंडे
श्री विनायकाय नमः| इति शम्‌|
prof.adityashende@gmail.com

Powered By Sangraha 9.0