गीतासार भाग- ६

26 Feb 2026 13:58:19

भगवान श्रीकृष्णाच्या 16 हजार, 108 बायका
भगवान श्रीकृष्णाच्या पहिल्या आठ बायका म्हणजे अष्टांग योगापासून प्राप्त झालेल्या अष्टसिद्धी होत. ज्या सिद्धींचा आपल्या पत्नीप्रमाणे साधक उपयोग करून घेऊ शकतो, अशा त्या कृष्णाच्या पहिल्या आठ बायका होत. उरलेल्या 16 हजार बायका श्रीकृष्णाने अन्य मार्गाने प्राप्त केल्या. या कथेत भगवान वेदव्यासांनी पुनः एकदा आपल्या श्रेष्ठ बुद्धीचा परिचय दिला आहे. पूर्व प्रदेशात (साधकाच्या आरंभीच्या काळातील जीवन) ‌‘नरकासुर‌’ नावाचा असुर अतिशय उन्मत्त होऊन, आजूबाजूच्या राजांवर हल्ले करून त्यांना छळत असे. त्यांच्या अविवाहित कुमारी कन्यांना पळवून घेऊन जाई. तसेच त्यांच्यावर तो बलात्कार करून, त्यांना तो आजन्म आपल्या बंदिशाळेत बंदिस्त करून ठेवीत असे. अशा तऱ्हेने त्याने 16 हजार कुमारिकांना भ्रष्ट करून आपल्या बंदिशाळेत ठेवले होते; परंतु दुर्भाग्यवश नराधम नरकासुराला धडा शिकवून त्याच्या बंदिशाळेतील 16 हजार कुमारिकांना कोणीच सोडवू शकले नाही. काय या वीरप्रसवा भूमीमध्ये अशा प्रकारच्या दुष्ट नरकासुराला मारणारा एकही सुपुत्र मिळाला नाही? हो! असे होते खरे! असे पाहून त्या दुष्ट नरकासुराला शिक्षा करण्यासाठी स्वतः भगवंतांना पुढे यावे लागले.

आपल्याबरोबर आपली पत्नी सत्यभामेला घेऊन, भगवंत मध्यरात्री नरकासुराच्या राजधानीत पोहोचले. मध्यरात्री त्या दुष्टाला मारून त्याच्या बंदिशाळेतील त्रस्त झालेल्या 16 हजार कुमारिकांची त्यांनी मुक्तता तर केलीच, पण आता त्या 16 हजार नारी कोठे जातील? म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्या 16 हजार नारींशी विवाहही केला. अशा तऱ्हेने भगवान श्रीकृष्ण नरकासुराचा वध करून परत आले. काय एखादा दुष्ट 16 हजार राजांना सतावून त्यांच्या मुली भ्रष्ट करेल? आणि तो तमाशा बाकीचे शूर राजे बघत बसतील? त्या दुष्ट नराधमाला मारण्याच्या हेतूने जाणारे भगवंत, मध्यरात्रीच्या वेळी इतक्या दूरच्या प्रदेशात आपली पत्नी सत्यभामा हिला घेऊन जातील काय? होय ! या कथेत नक्कीच व्यासांचा अन्य आशय असला पाहिजे.

आपल्या शरीरात सहस्रावधी योगनाड्या असतात. वर उल्लेखिलेल्या 16 हजार बायका या आपल्या शरीरातील त्याच योगनाड्या होत. ‌‘न‌’ म्हणजे नाही व ‌‘रक‌’ म्हणजे पुढे जाणे. नरक म्हणजे पुढे न जाणारी अवस्था! अध्यात्मात प्रगती न करणारी कुसाधक वृत्ती जिला व्यास ‌‘नरकासुर‌’ म्हणतात. हाच नरकासुर आपल्या शरीरातील योग्य उपयोग न केलेल्या कुमारी नाड्यांवर, कुमार्गाने केलेल्या साधनेद्वारा बलात्कार करतो आणि योग्य साधना न करता, चांगल्या वृत्तींना बंदिशाळेत बंदिस्त करून ठेवतो. हा नरकासुर आपल्यातच असून, त्याला नष्ट करणे हे भगवानस्वरूप श्रेष्ठ बुद्धी आणि जीवात्म्याचे काम आहे. ध्यानधारणा, योगसाधना या मध्य रात्रीच्या वेळी केल्या जातात, ज्यावेळी जग शांत झोपलेले असते. ज्यामुळे दुष्ट संस्कारांचा नरकासुर मारला जाऊन, साधक उच्च संस्कारयुक्त भगवंत होतो. यासाठी नरकासुराला भगवंत मध्यरात्री मारतात आणि 16 हजार अपहृत बायकांना अर्थात योगनाड्यांना मुक्त करतात. मग त्या 16 हजार नाड्या भगवंताशी विवाह करणार नाहीत का? भगवंत अशा महान कार्यासाठीच आपल्या बरोबर एखाद्या शूर योध्याला न नेता, आपल्या प्रिय पत्नी सत्यभामेला घेऊन जातात. ‌‘सत्य‌’ म्हणजे प्रामाणिकता आणि ‌‘भामा‌’ म्हणजे ज्ञानाचा प्रकाश. सत्य व प्रामाणिकतेशिवाय साधना सफल होत नाहीत; म्हणून भगवान नरकासुरवधासाठी सत्य प्राप्त करू शकणाऱ्या साधनारूप सत्यभामेला घेऊन जातात.

कुंती व पंडु

पांडवांची माता कुंती, तर पिता पंडु होते. पंडु राजा पंडुरोगाने आयुष्यभर त्रस्त असल्याने, त्यांच्याद्वारे संतती होणे असंभव होते. या सर्व घटना व्यासांच्या दिव्य आणि विशाल आध्यात्मिक बुद्धीचा अजोड विलास होय. ‌‘पंड‌’ म्हणजे संतुलित वृत्तीचा समदश पंडित होय. असली समदश पंडित वृत्ती दुनियादारीच्या सर्व कामांसाठी वैराग्यशील म्हणजे, इतर कामासक्त लोकांच्या दृष्टीने नपुंसकच राहणार. म्हणून पंडुला नपुंसक दाखविले आहे, परंतु असला पंडित वृत्तीने समदश म्हणजे व्यवहारी नसल्याने, त्याचे नाव ‌‘पंडु‌’ असे ठेवले आहे. संस्कृतमध्ये पुल्लिंगी शब्दाला उकार लावला की त्याचे पुल्लिंग बनते. म्हणून वृत्तिहीन समदश ‌‘पंड‌’ला ‌‘उ‌’कार लावून भगवान व्यासांनी पराक्रमी ‌‘पंडु‌’ बनविला आहे. असल्या दुनियादारीत नपुंसक असलेल्या पतीद्वारे कुंतीला वृत्तीरूप मूल होणे शक्य नसल्याने, अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या वेदव्यासांनी कुंतीला देवतांद्वारे पुत्रप्राप्ती करवून दिली आणि त्याकरिता त्यांनी दुर्वास ऋषींची एक कथा रचली आहे.

कथा अशी आहे. कुंती त्यावेळी कुमारी होती. कुमारीचा खरा अर्थ असा आहे की, अजून प्रजननाची क्षमता निर्माण न होणे, वा स्त्रीशरीर ज्यावर बळजबरी करूनसुद्धा पुत्रप्राप्ती होऊ शकणार नाही, अशी. कुंती कौमार्य अवस्थेत असताना तिच्या आई-वडिलांच्या घरी एकदा दुर्वास नावाचे ऋषी आले. दुर्वास ऋषी अतिशय क्रोधी असूनसुद्धा कुंतीच्या सेवाचाकरीवर संतुष्ट होऊन दुर्वासांनी कुंतीला एक आशीर्वाद दिला की, पतिशिवाय ती संतती उत्पन्न करू शकेल. संततीप्राप्तीसाठी कोणत्याही एका देवतेचे स्मरण करून, तिला दुर्वास ऋषींनी दिलेला मंत्र उच्चारावा लागेल. दुर्वास ऋषी मंत्र सांगून निघून गेले. विवाहापूर्वी कुंती एक दिवस एकटीच गंगाकिनारी स्नान करण्यास गेली होती. गंगाकिनारी तिला दुर्वासांनी दिलेल्या मंत्राचे सामर्थ्य आजमावण्याची इच्छा झाली. सूर्य देवतेचे स्मरण करून तिने दुर्वास ऋषींनी दिलेल्या मंत्राचे उच्चारण केले आणि सूर्य देवतेपासून तिला गर्भ राहिला. लग्नाआधी मूल होणे, हे सामाजिकदृष्ट्या निंद्य कृत्य समजले जाते. त्या पुत्राचे नाव ‌‘कर्ण‌’ म्हणजे कान ठेवले गेले; परंतु ‌‘कर्ण‌’ नाव कोणी ठेवले, याचा काहीच निर्देश नाही. सामाजिक भीतीमुळे कुंतीने कर्णास गंगेत सोडून दिले. कर्ण बुडून मेला नाही, तर तो वाहात जात असताना अधिरथ नावाच्या व्यक्तीने त्यास उचलले. अधिरथास मूल नव्हते, त्याने मूल घरी आणले. त्याच्या राधा नावाच्या पत्नीला त्यामुळे खूप आनंद झाला. राधेने कर्णाचे पुत्रासारखे पालन केले. अधिरथ सूत असल्यामुळे, कर्णास सूतपुत्र समजू लागले. त्याचे मातेसारखे पोषण राधेने केल्यामुळे त्यास ‌‘राधेय‌’ म्हणू लागले. या बालकाचे नाव ‌‘कर्ण‌’ कोणी ठेवले, आणि ते नाव सर्वांना आपोआप कसे ठावूक झाले, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ‌‘कर्ण‌’ हे नाव व्यासांच्या बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. अशा तऱ्हेने कर्णाचा जन्म देवतेच्या स्मरणाने व मंत्राच्या उच्चारणाने झाला.(क्रमशः)

- योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
9702937357

Powered By Sangraha 9.0