सौंदर्यलहरी भाष्य भाग- १६

26 Feb 2026 13:28:38


चतुर्भिः श्रीकण्ठैः शिवयुवतिभिः पञ्चभिपि
प्रभिन्नाभिः शम्भोर्नवभिरपि मूलप्रकृतिभिः|
चतुश्चत्वारिंशद्-वसुदल-कलाश्र्‌-त्रिवलय-
त्रिरेखभिः सार्धं तव शरणकोणाः परिणताः॥12॥


श्रीयंत्रात चार श्रीकंठ त्रिकोण आहेत आणि पाच शिवयुवती त्रिकोण आहेत. यांच्या ऐक्यरूपातून 43 त्रिकोण निर्माण होतात. याशिवाय शिवशक्ती ऐक्याचे बिंदुस्थान हा 44वा त्रिकोण असून, या त्रिकोणाच्या रचनेच्या बाहेर एक अष्टकमल वृत्त आहे. त्याच्या बाहेर षोडशदलकमल वृत्त आहे. त्याबाहेर तीन वर्तुळे आणि तीन रेखांची त्रिकोणरूपी रचना आहे. श्रीचक्र बनवण्याच्या तीन पद्धती आहेत. मेरू, कैलास आणि भूः. तिन्ही पद्धतींमध्ये शक्तीचे स्थान आणि पूजन विधीमध्ये भिन्नता आहे. मेरू श्रीचक्र हे 16 नित्य कलांचे चक्र समजले जाते. कैलास श्रीचक्र अष्ट मातृकांचे चक्र मानले जाते आणि भूः पद्धतीचे श्रीचक्र हे अष्ट वशिनी देवतांचे चक्र मानले जाते.

तैत्तिरीय ब्राह्मण ग्रंथात पृश्नी ऋषींनी श्रीचक्रपूजन करून, त्याच्या साहाय्याने कुंडलिनी जागृत केली आणि शक्तीला सहस्रार चक्रात स्थिर केले असा उल्लेख आहे. अर्थात, श्रीचक्र उपासना हा वैदिक मार्ग आहे.

श्रीचक्र हे पिंड आणि ब्रह्मांड यांचे प्रतीक आहे. श्रीकंठाचे अर्थात शिव त्रिकोण याचे चार त्रिकोण आणि शिव युवतीचे अर्थात शक्तीचे पाच त्रिकोण, यांच्या योगातून 43 त्रिकोण निर्माण होतात. यात श्रीकंठ आणि शिवयुवती त्यांचे त्रिकोण मुख एकमेकांच्या विरुद्ध असते. सृष्टीक्रमाने श्रीचक्र रेखाटताना पाच शक्ती त्रिकोण ऊर्ध्वमुख असतात आणि चार शिव त्रिकोण अधोमुख असतात. ‌‘अप्यय‌’ अर्थात संहार क्रमाने श्रीचक्र रेखाटताना याच्या उलट संरचना असते.

प्रथम केंद्रीय त्रिकोण जे शंभू स्थान आहे, ते वगळता 42 त्रिकोण आहेत. मध्य त्रिकोणाच्या बाहेर द्वितीय प्रतलात चारही बाजूंनी आठ त्रिकोण तयार होतात, त्याला ‌‘अष्ट कोण‌’ म्हणतात. तिसऱ्या आणि चौथ्या प्रतलात प्रत्येक दहा त्रिकोण तयार होतात. त्यांचा उल्लेख अंतर्दशार आणि बाह्यदशार असा केला जातो. त्याच्या बाहेर 14 त्रिकोण तयार होतात आणि त्यांचा उल्लेख ‌‘चतुर्दशार‌’ असा केला जातो. या सगळ्यांची बेरीज 1 + 8 + 10 + 10 + 14 = 43 येते. मध्य केंद्रीय बिंदू ‌‘शंभूस्थान‌’ आहे, जे पाच ऊर्ध्वशक्ती त्रिकोण आणि चार अधोशिव त्रिकोण यांच्या संयोगाने प्रकृतीस्वरूप नऊ त्रिकोणांनी बनलेला असून, तो संपूर्ण चक्रापासून असंग आहे.

या 43 कोणाच्या बाहेर असलेल्या प्रथम वृत्ताला वेष्टिलेले अष्टदल पद्म असून, त्या बाहेरील वृत्ताला वेष्टिलेले षोडशदल पद्म आहे. षोडशदल पद्माच्या बाहेर तीन वृत्त/वर्तुळे आहेत. सर्वांत बाहेर त्यांना व्यापणारा तीन रेखांचा चतुष्कोण आहे, त्याचा उल्लेख ‌‘भूगृह‌’ असा केला जातो. या भूगृहाच्या चारही बाजू समान असून, याच्या चारही दिशांना चार द्वारे आहेत.

श्रीचक्राचे संहार स्वरूपात पूजन करायचे असेल, तर बाहेरील चतुष्कोणापासून आतमध्ये प्रवेश करत पूजन करणे अभिप्रेत आहे. बाहेरील बाजूने प्रथम आवरण म्हणजे भूगृहातून प्रवेश करणे. भूगृहाचे तिन्ही चौकोन आहेत, त्यांचा उल्लेख त्रैलोक्य मोहन चक्र असा केला जातो. हे चक्र जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांवर नियंत्रण ठेवते. हे श्री चक्राचे प्रथम आच्छादन आहे. या आवरणावर त्रिपुरा देवीचे राज्य आहे. प्रत्येक आवरण, ज्याला आच्छादन म्हणून ओळखले जाते, त्यावर एकेका अधिष्ठाता देवतेचे राज्य असते आणि तिला एक स्वतंत्र योगिनी असते. पहिल्या आवरणातील योगिनी ही ‌‘प्रकट योगिनी‌’ म्हणून ओळखली जाते.

सर्वांत बाहेरील चतुष्कोणाच्या भिंतींमध्ये दहा सिद्धी दर्शवणाऱ्या दहा देवी आहेत. या देवी म्हणजे अणिमासिद्धे, लघिमासिद्धे, गरिमासिद्धे, महिमासिद्धे, ईशित्वसिद्धे, वशित्वसिद्धे, प्राकाम्यसिद्धे, भुक्तिसिद्धे, इच्छासिद्धे, प्राप्तिसिद्धे, सर्वकामसिद्धे या देवता आहेत. यांपैकी गरिमासिद्धी ही सुप्त मानली जाते. त्यामुळे दश सिद्धी होतात. परंतु गरिमा ही सिद्धी अष्टसिद्धींच्या पैकी एक असल्याने, तिचा इथे उल्लेख अनिवार्य आहे. मधल्या चतुष्कोणाच्या भिंतीवर अष्टमाता/अष्टमातृका अर्थात ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारि, वैष्णवी, वाराही, माहेंद्री, चामुंडे, महालक्ष्मी या आहेत. त्यांचे इथे युगुल स्वरूप आहे. त्यामुळे या स्थानी त्यांच्यासह अष्टभैरवसुद्धा आहेत. हे अष्टभैरव म्हणजे असितांग, चंड, रुरु, क्रोध, उन्मत्त, कपाल, भीषण आणि संहार भैरव आहेत.

आतील चतुष्कोणाच्या भिंतीमध्ये दहा मुद्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दहा देवी आहेत. या दशमुद्रांचा उल्लेख नाम क्रमांक 977 मध्ये आलेला आहे. सर्वसंक्षोभिणी, सर्वविद्राविणी, सर्वाकर्षिणी, सर्ववशंकरी, सर्वोन्मादिनी, सर्वमहांकुशे, सर्वखेचरी, सर्वबीजे, सर्वयोने, सर्वत्रिखंडे या दशमुद्रांच्या देवता आहेत. याशिवाय या आवरणाची स्वामिनी म्हणजे त्रैलोक्यमोहन स्वामिनी ही देवी आहे. या सगळ्या मिळून प्रथम 10 + 8 + 10 = 28 देवी. श्रीचक्रामध्ये प्रवेश हा उपासकाकडे तोंड करून, सर्वांत आतील त्रिकोणाच्या शिखराच्या अगदी खाली असलेल्या उघड्यापासून केला जातो. सर्व 28 देवींचे पूजन केल्यानंतर आणि त्यांच्याकडून परवानगी घेतल्यावरच पुढच्या आवारात जावे लागते. त्यात गरिमासिद्धीसह एकूण 11 सिद्धी येतात, अष्ट मातृका, दशमुद्रा आणि प्रकट योगिनीलासुद्धा त्यांनी देवता म्हणून गृहीत धरले आहे.

दुसरे आवरण सर्वाश-परि-पुरक म्हणून ओळखले जाते. हे साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त करते. या आवरणावर त्रिपुरेशीचे राज्य आहे. या आवरणाच्या योगिनीचे नाम गुप्त योगिनी आहे. दुसरे आच्छादन तीन वर्तुळ आणि त्यानंतरचे 16 पाकळ्यांचे कमळ आहे. तीन वर्तुळांत कोणतीही पूजा होत नाही. 16 पाकळ्यांपैकी प्रत्येक पाकळीची एक देवी आहे आणि प्रत्येक पाकळी ही संस्कृत भाषेतील एक स्वर असतो (संस्कृतमध्ये एकूण 16 स्वर आहेत.) या 16 देवींचे पूजन करून, त्यांच्याकडून परवानगी घेतल्यानंतर पुढच्या आवरणात प्रवेश करता येतो. या 16 देवी म्हणजे कामाकर्षिणी, बुद्ध्याकर्षिणी, अहंकाराकर्षिणी, शब्दाकर्षिणी, स्पर्शाकर्षिणी, रूपाकर्षिणी, रसाकर्षिणी, गंधाकर्षिणी, चित्ताकर्षिणी, धैर्याकर्षिणी, स्मृत्याकर्षिणी, नामाकर्षिणी, बीजाकर्षिणी, आत्माकर्षिणी, अमृताकर्षिणी, शरीराकर्षिणी. त्यात चक्राची स्वामिनी म्हणजे, सर्वाशापरिपूरक चक्रस्वामिनी देवी आणि या चक्राची योगिनी म्हणजे गुप्तयोगिनी देवी.

तिसरे आच्छादन सर्व-संबंध म्हणून ओळखले जाते. हे आवरण आध्यात्मिक आकांक्षांच्या पूर्ततेसाठी संघर्ष करण्यास प्रेरित करते. हे आठ पाकळ्यांचे कमळ आहे. या अच्छादनाची प्रमुख देवता त्रिपुरसुंदरी आहे आणि योगिनी ही गुप्ततारा योगिनी आहे. प्रत्येक पाकळीमध्ये आठ देवी आहेत. या आठ देवी म्हणजे अनंगकुसुमे, अनंगमेखले, अनंगमदने, अनंगमदनातुरे, अनंगरेखे, अनंगवेगिनी, अनंगांकुशे, अनंगमालिनी, त्यांची पूजा केल्यानंतर आणि त्यांच्याकडून परवानगी घेतल्यानंतरच, साधकाला पुढील चक्रात प्रवेश करता येतो. हे चक्र म्हणजे 43 त्रिकोणांपैकी पहिल्या संच. त्यात चक्राची स्वामिनी म्हणजे त्रिपुरसुंदरी देवी आणि या चक्राची योगिनी म्हणजे गुप्ततारा देवी.

चौथ्या आवरणाला सर्व-सौभाग्य-दायक म्हणून ओळखले जाते. हे आवरण सर्व आध्यात्मिक आणि भौतिक सुखसोयी प्रदान करते. यात 14 त्रिकोण असून, त्रिपुरवासिनी देवी या आवरणाची प्रमुख आहे. या चक्राशी संबंधित योगिनी संप्रदाय योगिनी आहे. प्रत्येक पाकळीवर एकेका देवीचे राज्य असते. त्या देवींची नामे सर्वसंक्षोभिणी, सर्वविद्राविनी, सर्वाकर्षिणी, सर्वह्लादिनी, सर्वसम्मोहिनी, सर्वस्तंभिनी, सर्वजृंभिणी, सर्ववशंकरी, सर्वरंजनी, सर्वोन्मादिनी, सर्वार्थसाधिके, सर्वसंपत्तिपूरिणी, सर्वमंत्रमयी, सर्वद्वंद्वक्षयंकरी त्यांची पूजा केल्यानंतर आणि त्यांच्याकडून परवानगी घेतल्यानंतरच, साधकाला पुढील आवरणात जावे लागते. त्यात चक्राची स्वामिनी म्हणजे सर्वसौभाग्यदायक चक्रस्वामिनी देवी आणि या चक्राची योगिनी म्हणजे संप्रदाययोगिनी देवी.

पाचव्या आवरणाला सर्वार्थ-साधक असे म्हणतात, जे उपासकाला आध्यात्मिकरित्या समृद्ध करते आणि त्याला दहा त्रिकोण असतात. हे आच्छादन बाह्यर्दर्शार त्रिकोण म्हणून ओळखले जाते. या दहा त्रिकोणाच्या देवी सर्वसिद्धिप्रदे, सर्वसंपत्प्रदे, सर्वप्रियंकरी, सर्वमंगलकारिणी, सर्वकामप्रदे, सर्वदुःखविमोचनी, सर्वमृत्युप्रशमनि, सर्वविघ्ननिवारिणी, सर्वांगसुंदरी, सर्वसौभाग्यदायिनी या आहेत. या आवरणाची प्रमुख देवता त्रिपुराश्री आहे आणि संबंधित योगिनी कुलोत्तिर्ण-योगिनी आहे. प्रत्येक त्रिकोणाची एक प्रमुख देवी असते. तिची पूजा केल्यानंतर आणि तिच्या अनुमतीनेच पुढील आवरणाकडे जाता येते. त्यात चक्राची स्वामिनी म्हणजे, सर्वार्थसाधक चक्रस्वामिनी देवी आणि या चक्राची योगिनी म्हणजे कुलोत्तीर्णयोगिनी देवी.
(क्रमश:)

- सुजीत भोगले
9370043901


Powered By Sangraha 9.0