
शिमगा म्हटले की सर्वांच्या डोळ्यासमोर येतो तो शंखासुर! आज समाजमाध्यमांवर तरुणाईला गावोगावच्या पालख्यांचे दर्शन घडते. तसेच, गावागावातून आज तरुणाई ही परंपरा जोपासण्यासाठी पुढे येत आहे. लेखाच्या या दुसऱ्या भागामध्ये रत्नागिरी पट्ट्यातील शिमगोत्सवाचा घेतलेला आढावा...
कोकण पट्ट्यात गणेश चतुर्थी जितक्या उत्साहात साजरी होते, तितक्याच उत्साहात साजरा होणारा सण शिमगोत्सव! चतुथत गणपतीपूजन करण्यात येते, तर शिमगोत्सवात स्थानिक देव आपल्या घरी येत असतात. आपण भक्तगण सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी, माथा टेकण्यासाठी, मनातील संकल्प किंवा आपल्या आयुष्यातील शुभवार्ता सांगण्यासाठी मंदिरात जात असतो. प्रत्येकाचं मंदिरात जाण्याचं, प्रार्थना करण्याचं कारण वेगवेगळं असतं. समान धागा म्हणजे ईश्वरी शक्तीमागील भाव आणि भक्ती!
रत्नागिरी जिल्ह्यातील होळी आणि शिमगा उत्सवाचे स्वरुप सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा थोडे आहे. वसंत ऋतूच्या आगमनामुळे वातावरण नव चैतन्याने भारलेले असते. आंबा आणि काजू यांच्या मोहराला सुरुवात असते. देवतत्त्व दारात येणार म्हणून, मातीतील कण कण झाडावर मोहोर होऊन देवदर्शनास जणू आतूर झालेला असतो.
स्थानिक मंदिरातील देवाची पालखी त्या त्या गावाच्या प्रथेप्रमाणे त्या त्या ठिकाणी येऊन थांबते. त्या ठिकाणाला ‘चावडी’, ‘सहाण’ किंवा ‘चव्हाटा’ असेही म्हटले जाते. ही पालखी घेऊन नाचणारे भोई बघायला खूप गद असते. भोई डोळ्याचं पातं लवतं न लवतं, तोवर पालखीचा खांदा बदलतात. ढोल-ताशाच्या गजरात रात्र-रात्र न थकता देवाला डोक्यावर घेऊन नाचणारी नवीन पिढी बघितली की, अजून आपली संस्कृती सशक्त खांद्यावर असल्याचा विश्वास वाटतो. हल्ली या परंपरेत थोडा थोडा काळानुरूप बदल जरूर झालेला आहे; पण भक्तिभाव अगदी तसाच आहे. हल्ली पालखी नाचवण्याच्या स्पर्धा भरवल्या जातात. यात महिला वर्गातील उत्साहसुद्धा दिसून येतो. अशी समानता इथे छान अनुभवता येते.
फाल्गुन शुद्ध पंचमी म्हणजे फाक पंचमीला ‘फाका मारून’ म्हणजेच आरोळ्या ठोकून, उत्सवाची नांदी होते. वेगवेगळ्या दिवशी होळी पेटविली जाते. काही ठिकाणी तेरसे शिमगे असतात. म्हणजे त्या ठिकाणी, होळी पौर्णिमेच्या पूवच्या त्रयोदशीला होळी पेटविली जाते.
बहुसंख्य गावांमध्ये पौर्णिमेच्या दिवशी होळी पेटते. काही ठिकाणी दुसऱ्या दिवशीही होळी पेटविण्याची प्रथा आहे. मात्र, होळी पेटविल्यानंतर गाऱ्हाणं घालणं, नवस फेडणं आणि नवस करणं अशा प्रकारचे कार्यक्रम सर्वच गावांमध्ये होतात. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे बाराशे ठिकाणी सार्वजनिक आणि सुमारे तीन हजार ठिकाणी खासगी होळ्या उभारल्या जातात. होळी साजरी करताना एकमेकांना सुके रंग लावले जातात. काही ठिकाणी पाण्यातून ते रंग एकमेकांवर फवारले जातात. चौकाचौकात गटाने रंग लावणारी टोळी यावेळी उत्साहात कार्यरत असते. काही हौशी लोक यामध्ये पैसे देऊनही आनंद व्यक्त करतात. सर्वांनी एकत्र यावे, काहीतरी सकस शिजवून खावे, हाही हेतू असतो. अर्थात, प्रेम वाढण्यासाठी एकत्र येणे, खाणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रक्षण करणारी देवता म्हणजे भैरी बुवा आणि रक्षण करणारी देवी शक्ती आहे. यांच्या पालख्या विशिष्ट ठिकाणी भेटतात. भैरी बुवा देवी शक्तीला भेटायला गेला असता, पालखी देवीच्या मंदिरात ठेवतात. बाहेरून कुलूप लावून त्या देवतांना भेटवलं जातं. सुमारे तीन-साडेतीन तास मंदिर बंद ठेवून, देवतांच्या भेटी आतमध्ये होत असतात. जाताना पालखी हलकी असते, तर येताना देव जड झालेली असते असे इथली माणसं अनुभवाने सांगतात. भैरी बुवाचा पोषाख ओला झालेला असतो, तो जाताना बदलावा लागतो. देवीही भिजलेली असते. त्या दोघांनी गावचे अश्रू जणू आपल्या अंगावर झेललेले असतात.
वरील गोष्ट जितकी महत्त्वाची आहे, तितकाच भक्तीने तरुण वर्ग भैरी बुवा आपलं रक्षण करणार आहे असे मानून, दरवष राखी पौर्णिमेला महाविद्यालयामधील मुल-मुली तिथं भैरी देवाच्या झाडाला राखी बांधून येतात. होळीचे 15 दिवस महाविद्यालयात कितीही महत्त्वाचे लेक्चर ठेवा; या दिवसांत विद्याथ वर्ग महाविद्यालयाचे तोंडही बघत नाहीत. कोणताही सण जसा घरातील सर्वांसमवेत साजरा होत असतो, तसा हा देव त्यांचा कुटुंबाचा सदस्य आहे. आम्ही मानकरी आहोत, आमची पालखी आहे, आमचा सण आहे, अशी ही महाविद्यालयीन युवकांच्या आणि युवतींच्या रूधिरामध्ये ती भक्ती ‘इनबिल्ट’ आहे. तरुणाईच्या भाषेत सांगायचे तर ‘नो एनी एक्स्टर्नल भक्ती आऊटपुट इज इन्सरटेड’. माझी एक मैत्रीण रत्नागिरीतून ‘एलएलबी’ची परीक्षा देतानासुद्धा ‘रक्षणकर्ता भैरी बुवा पाठीशी आहे,’ असे मानत असे. आजही एखादे महत्त्वपूर्ण ‘सबमिशन’ किंवा ‘अर्ग्युमेंट’ असताना, ती तिथं डोके टेकूनच मगच न्यायालयाची पायरी चढते. ‘संकासुर’ किंवा ‘शंखासुर’ नावाच्या राक्षसाने, ब्रह्मदेवाच्या हातातून वेद पळवून नेले होते. ते वेद पुन्हा मिळवण्यासाठी देव त्याचा पाठलाग करू लागल्यानंतर, तो राक्षस समुद्रतळातील शंखात सूक्ष्म रूपात जाऊन लपून बसला. हाच तो राक्षस ’शंखासुर’ किंवा ’संकासुर’. त्याच्या डोक्यावर ‘शंकू’ आकाराची टोपी असते. काही कोकणवासीय याला ‘दानशूर असुर’ म्हणूनही सन्मान देतात. त्याच्या अंगात निळा किंवा काळा अंगरखा असतो. त्याच्या कमरेला खुळखुळ घुंगरू वाजत असल्याने, तो आल्याची वद लगेचच कानावर पडते आणि बालचमू संघटना त्याच्या मागे मागे फिरत असते. दारोदारी राधा, गोमू, कृष्ण यांच्या मेळ्यातही, हा राक्षस देव होऊन फिरत असतो. त्याच्या हातात काठी असते. गदत हुल्लडबाजी करणाऱ्या आगाऊ मुलांना तो आपल्या काठीच्या धाकाने वठणीवर आणतो.
हा कलाकार प्रथम ग्रामदेवतेच्या मंदिरात दाखल होतो. गेल्या वष देवीसमोर उतरवलेला साज, पांढरी दाढी, टोपीवरील गोंड्यांची शोभा व जाड कापडाचा मुखवटा कलाकाराच्या चेहऱ्यावर चढवला जातो.मृदुंग आणि टाळांच्या घनगंभीर घुमेदार आवाजात, सजून पूर्ण झालेला शंखासुर देवीच्या चरणी आधी लीन होतो आणि खेळ्यांसह नाचू लागतो.
भक्ती आणि नाट्यकला यांचा संगम म्हणून हा लोककलाप्रकार ‘नमन-खेळे’ या नावाने ओळखला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात नमन-खेळ्यांबरोबरच काही भाग, शक्ती-तुरा, शिमगा खेळ, जाखडी नृत्य, कलगी-तुरा असे लोकनाट्यप्रकार अस्तित्वात आहेत. ग्रामदेवता, गावाच्या शिवेवरच्या देवता यांची पूजा आणि सार्वजनिक सत्यनारायण महापूजा, लग्न, गृहप्रवेश, नामकरण समारंभ अशा निमित्तानेही हे नमनाचे कार्यक्रम ठेवले जातात. ही लोकनाट्यं मनोरंजनासाठी सादर होतात. ‘नमन-खेळे’ हा लोकनाट्यप्रकार प्रामुख्याने कुणबी समाजाने जोपासला आहे. बारा बलुतेदार आणि त्यांच्या कामांनुसार होणारी विभागणी होत असते. ज्यांचे त्यांचे योग्य ते सन्मान जपत, अगदी पेशवे काळापासून अशा प्रथा रूढ झालेल्या आहेत. दक्षिण भागात सिंधुदुर्ग पट्ट्यात ज्याप्रमाणे ‘दशावतार कला’ जतन केली गेली आहे, त्याचप्रमाणेच ही ‘नमन खेळे’ प्रथा रत्नागिरी पट्ट्यात अधिक प्रमाणात जतन केली जात आहे. राम आणि कृष्ण अगदी त्यांच्या बाललीलांपासून ते हनुमान, गणपती, राधा-कृष्ण, शंकर ही दैवते, यातूनच मानवी मनांवर कित्येक वर्षांपासून गारूड करून आहेत, हे या सणानिमित्ताने अधोरेखित केले जाते. मनावरील मरगळ दूर करण्यासाठी नाचणे, गाणी म्हणणे, मनातील तगमग किंवा घुसमट या उत्सवानिमित्ताने दूर करण्याची ही मोठीच ‘रिफ्रेश सिस्टम’ आहे!
- अॅड. अंजली मुतालिक
9420306408