नवी दिल्ली: ( PM Narendra Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर १०० मिलियन म्हणजेच १० कोटी फॉलोअर्स पूर्ण झाले असून, ही कामगिरी करणारे ते जगातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत. डिजिटल माध्यमांवरील त्यांचा प्रभाव आणि लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा दुप्पटहून अधिक फॉलोअर्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खात्यावर आहेत.
जागतिक नेत्यांमध्ये आघाडी
जगातील प्रमुख नेत्यांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिजिटल पोहोच लक्षणीयरीत्या मोठी आहे. ट्रम्प यांच्यानंतर इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याकडे सुमारे १५ मिलियन फॉलोअर्स आहेत, तर ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा १४.४ मिलियन फॉलोअर्ससह चौथ्या क्रमांकावर आहेत. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्या खात्यावर ११.६ मिलियन फॉलोअर्स आहेत. या प्रमुख नेत्यांच्या एकत्रित फॉलोअर्सची संख्या देखील मोदी यांच्या एकट्याच्या फॉलोअर्सपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट होते.
२०१४ पासून सुरू झालेला डिजिटल प्रवास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ नोव्हेंबर २०१४ रोजी इंस्टाग्रामवर पदार्पण केले. त्यांनी पहिली पोस्ट म्यानमारची राजधानी नेपीदॉ येथे आयोजित आसियान परिषदेदरम्यान शेअर केली होती. इंस्टाग्रामवर खाते सुरू केल्यानंतर काही तासांतच ५० हजारांहून अधिक फॉलोअर्स त्यांच्या खात्याशी जोडले गेले. त्या काळात हा प्रतिसाद अभूतपूर्व मानला गेला.
वाढत्या लोकप्रियतेचे टप्पे
२०१७-१८ दरम्यान त्यांनी १० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला. २०१९ मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आणि २०२० पर्यंत हा आकडा ४० मिलियनपर्यंत पोहोचला. कोविड-१९ काळात त्यांनी जनतेशी सातत्याने संवाद साधला, विविध मोहिमा राबवल्या, ज्यामुळे सहभागात मोठी वाढ झाली.
२०२२ पर्यंत फॉलोअर्सची संख्या ७० मिलियन झाली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे फोटो आणि परदेश दौऱ्यांमुळे त्यांच्या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळाला. २०२३ मध्ये त्यांनी ८० मिलियनचा टप्पा ओलांडला. जी-२० शिखर परिषद आणि इतर जागतिक कार्यक्रमांशी संबंधित पोस्ट विशेष लोकप्रिय ठरल्या.
१०० मिलियनचा ऐतिहासिक टप्पा
जुलै २०२४ मध्ये ९० मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाल्यानंतर ते इंस्टाग्रामवरील सर्वाधिक फॉलो केले जाणारे राजकीय नेते बनले. २०२५ मध्ये त्यांचे खाते ‘ग्लोबल इन्फ्लुएन्सर्स’ यादीत समाविष्ट झाले आणि फॉलोअर्स ९५ मिलियनवर पोहोचले. आता १०० मिलियनचा टप्पा पार करत त्यांनी डिजिटल विश्वात नवा इतिहास रचला आहे.
इतर सोशल मीडियावरही वर्चस्व
इंस्टाग्रामव्यतिरिक्त एक्स (आधीचे ट्विटर) वर त्यांनी २०२४ मध्येच १०० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला होता आणि सध्या तेथे १०६.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर ५४ मिलियन आणि व्हॉट्सॲप चॅनेलवर ११.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. कोणत्याही भारतीय पंतप्रधानांच्या सोशल मीडिया खात्यांवरील ही सर्वाधिक नोंदलेली संख्या मानली जाते. डिजिटल माध्यमांद्वारे जनतेशी थेट संवाद साधण्याची ही प्रभावी पद्धत ठरली आहे.