चक्क विक्रीसाठी ठेवलेल्या फळांवर उंदीर मारण्याचे विष...

26 Feb 2026 19:27:38

चक्क विक्रीसाठी ठेवलेल्या फळांवर उंदीर मारण्याचे विष... हो, हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडलाय मुंबईतील मालाड परिसरात. स्थानिक बाजारात विक्रीसाठी ठेवलेल्या फळांवर काही विक्रेत्यांनी उंदीर मारण्याचे विष, रॅटोल लावल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच संतापाची लाट उसळली. त्यासोबतच, या घटनेमुळे अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

ही बाब समोर आल्यानंतर, स्थानिक रहिवासी कुणाल साळुंके यांनी दोन फळ विक्रेत्यांविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, बाजारातील काही फळांवर उंदीर मारण्याचे विष लावले जात होते, ज्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता. या आरोपांचा एक व्हिडिओही समोर आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक फळ विक्रेता फळांवर उंदीर मारण्याचे विष लावताना दिसतोय, तर आजूबाजूचे नागरिक त्याला जाब विचारत आहेत. ही फळे नागरिक, विशेषतः मुले खात असताना त्यावर विष का लावले जात आहे? असा प्रश्न विचारला असता ही केळी खराब झाली आहेत असे तो फळ विक्रेता म्हणत असल्याचं दिसून येतंय.







View this post on Instagram
















A post shared by India Today (@indiatoday)


तक्रारीनंतर मालाड पोलिसांकडून तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली, अटकेत असलेल्या आरोपींची ओळख मनोज कुमार केसरवानी आणि बिपिन केसरवानी अशी असून, त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १२५, २७४, २७५ आणि २८६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक चौकशीत आरोपींनी दावा केला की, उंदीर फळांचे नुकसान करू नयेत म्हणून हे विष वापरले गेले. मात्र पोलिसांनी हे स्पष्टीकरण फेटाळून लावत, असे कृत्य धोकादायक आणि बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले. अशा प्रकारच्या विषारी पदार्थांमुळे अन्नविषबाधा, अंतर्गत अवयवांचे नुकसान आणि गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे स्थानिक बाजारपेठेतील अन्नसुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता प्रशासनाने पुढील तपास सुरू केला आहे, मात्र अशा काही संशयास्पद हालचाली तुमच्या परिसरात आढळल्यास त्वरित तक्रार करा आणि या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा.



Powered By Sangraha 9.0