इस्रायलचा ‌‘षटकोन‌’ हा भारताचाही दृष्टिकोन...!

25 Feb 2026 10:26:37

इस्रायलच्या झेंड्यावरच्या षटकोनी चांदणीला ‌‘स्टार ऑफ डेव्हिड‌’ असे म्हणतात. इस्रायलला केंद्रस्थानी ठेवल्यास अवतीभोवतीच्या इथिओपिया, सोमालीलॅण्ड, सायप्रस, ग्रीस, अझरबैजान, संयुक्त अरब अमिराती आणि बहारीन आणि भारत यांना जोडले; तर हा षटकोन पूर्ण होतो. यातील अझरबैजान वगळता, भारताचे सर्व देशांशी चांगले संबंध आहेत. अझरबैजानच्या शेजारील आर्मेनियाशी भारताचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी इस्रायलला जाऊन भारत आणि इस्रायल यांच्यातील बहरलेल्या द्विपक्षीय, तसेच बहुपक्षीय संबंधांना प्रकाशात आणण्याचे काम करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. २५ व २६ फेब्रुवारी रोजी इस्रायलच्या दौऱ्यावर जात आहेत. इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान म्हणून त्यांनी इतिहासात नाव नोंदवले आहे. इस्रायलचा दुसरा दौरा अवघा दोन दिवसांचा असला, तरी या दौऱ्यामध्ये ते इस्रायलच्या संसदेला संबोधित करणार आहेत. याशिवाय, ते दुसऱ्या महायुद्धामध्ये मृत्यमुखी पडलेल्या ६० लाख ज्यूंच्या इस्रायलमधील ‌‘याद वाशेम‌’ या स्मारकाला भेट देणार असून, जेरुसलेममधील सृजनशील उद्योजकतेवर आधारित एका कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यादरम्यान भारत आणि इस्रायल एका संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या करणार असून, त्याद्वारे इस्रायलमधील संवेदनशील संरक्षण तंत्रज्ञान भारताला मिळू शकणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या इस्रायलच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलताना बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले की, “आम्हाला उच्च तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम क्षेत्रातील सहकार्य वाढवायचे आहे.” सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, नेतान्याहूंनी मोदींच्या दौऱ्याला युरोप, उत्तर आफ्रिका, तसेच मध्य, पश्चिम आणि दक्षिण आशियातील देशांच्या षट्‌‍कोनाशी जोडले. नेतान्याहूंचे म्हणणे आहे की, या भागात ‌‘शिया‌’ आणि ‌‘सुन्नी‌’ मूलतत्त्ववादाचा शस्त्र म्हणून वापर करू पाहणाऱ्या देशांविरुद्ध हे देश एकत्र उभे राहतील. नेतान्याहूंच्या या वक्तव्याची अनेक अरब मुस्लीम देशांमध्ये दखल घेतली गेली.

पश्चिम आशियातील राजकारणावर गेली अनेक दशके ‌‘सुन्नी‌’ विरुद्ध ‌‘शिया‌’, तसेच ‌‘अरब‌’ विरुद्ध ‌‘पर्शियन‌’ राजकारणाचा प्रभाव झाला. पण, गेल्या वष अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध हवाई हल्ले करून त्याच्या अण्वस्त्र तंत्रज्ञान प्रकल्पांचे मोठे नुकसान केले. आपल्या कारवाईपुर्वी त्यांनी इराणची हवाई हल्लेविरोधी यंत्रणा निकामी केली. त्यापूव, म्हणजेच दि. ७ ऑक्टोबर २०२३ नंतर सुरू झालेल्या युद्धामध्ये इस्रायलने इराणचे हस्तक म्हणून काम करणाऱ्या ‌‘हमास‌’ आणि ‌‘हिजबुल्ला‌’ या संघटनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. इराणचे समर्थन असलेली सीरियातील अनेक दशकांपासून आलेली बशर अल असद यांची राजवट उलथवून तेथे तुर्कीये, कतार आणि सौदी अरेबियाचे समर्थन असलेली अहमद अल शरा यांची राजवट आली. यामुळे इराणचा लष्करी, आर्थिक आणि प्रादेशिक प्रभाव मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. अमेरिका आणि इराणमधील युद्धामध्ये अमेरिकेला इराणची राजवट उलथवून टाकण्यात यश मिळाल्यास पश्चिम आशियात मोठी पोकळी निर्माण होणार आहे. या घटनांमुळे पश्चिम आशियातील समतोल मोठ्या प्रमाणावर बिघडला असून, सौदी अरेबिया विरुद्ध संयुक्त अरब अमिराती यांच्यामधील शीतयुद्धाला तोंड फुटले आहे.

तसे बघायला गेले, तर सुरुवातीच्या काळात सौदी अरेबियाचे युवराज आणि आताचे पंतप्रधान महंमद बिन सलमान संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष महंमद बिन झायेद अल नाहयान यांना आपला आदर्श मानून राजकारणात आले. ज्याप्रकारे महंमद बिन झायेद यांनी आपल्या देशाला तेल आणि नैसर्गिक वायूवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेपासून दूर नेऊन वित्त, गुंतवणूक, तंत्रज्ञान, गृहनिर्माण आणि पर्यटनकेंद्री अर्थव्यवस्था बनवले; तसे सौदी अरेबियाच्या बाबतीत करण्याचा महंमद बिन सलमान यांचा प्रयत्न होता. येमेनमधील इराणसमर्थित ‌‘हुती‌’ बंडखोरांचा पाडाव करण्यासाठी दोघांनी एकत्र युद्ध लढले होते. पण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये मूलभूत फरक आहेत. सौदी अरेबियातील नागरिकांची संख्या सुमारे 58 टक्के, म्हणजेच दोन कोटींहून जास्त असून, संयुक्त अरब अमिरातीतील नागरिकांची संख्या अवघी 15 लाख म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 15 टक्के आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये सौदीने अनेक सुधारणा हाती घेतल्या असल्या, तरी तेथील लोकसंख्येवर चार दशकांहून अधिक काळ इस्लामिक मूलतत्त्ववादाचा प्रभाव आहे. संयुक्त अरब अमिरातीने दूरदृष्टीने महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गांवर बंदरे आणि त्याभोवतीच्या व्यापारी क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली. गुंतवणूक करताना परताव्याचा विचार केला, तसेच त्या देशातील राजकीय परिस्थितीपेक्षा स्वतःच्या गुंतवणुकीच्या सुरक्षेकडे लक्ष दिले.

याउलट, सौदी अरेबियाने आपल्याकडील तेलाचा पैसा वापरून शेकडो अब्ज डॉलरची गुंतवणूक असलेले प्रकल्प सुरू केले. तेलाच्या किमती पडल्यामुळे, तसेच जागतिक परिस्थितीमुळे यातील अनेक प्रकल्प ‌‘पांढरा हत्ती‌’ ठरले. संयुक्त अरब अमिरातींसाठी यादवी असलेल्या युद्धातही बंदर विकत घेऊन चालवणे फायद्याचे ठरले. पण, सौदी अरेबियासाठी शेजारील मुस्लीम देशातील यादवीचा अंतर्गत सुरक्षा आणि स्थैर्यावर परिणाम होत असल्याने त्यांच्यासाठी यादवी युद्ध संपणे, अधिक महत्त्वाचे होते. यावरून सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये मतभेद निर्माण झाले. पुढे या मतभेदांचे मनभेदात रूपांतर झाले.

सुरुवातीच्या काळात संयुक्त अरब अमिरातींच्या पाठोपाठ सौदी अरेबियाही इस्रायलला मान्यता देऊन त्याच्याशी राजनयिक संबंध प्रस्थापित करणार होता. भारताला पश्चिम आशियामार्गे युरोपला जोडणाऱ्या मार्गिकेचा सौदी अरेबिया एक महत्त्वाचा भाग होता. पण, ‌‘हमास‌’ने दि. 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामुळे परिस्थिती पालटली. काही अटी-शर्तीवर इस्रायलला मान्यता देण्यास तयार असलेला सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिरातीशी स्पर्धा करू शकत नाही, म्हणून इस्लामिक मूलतत्त्ववादी तुर्कीये, कतार आणि पाकिस्तानला मदत करू लागला. ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’नंतर सौदी अरेबियाने पाकिस्तानसोबत परस्परांच्या संरक्षणाचा करार केला. उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झाले; तर तांत्रिकदृष्ट्या त्यात पाकिस्तानच्या बाजूने उतरायला सौदी अरेबिया कटिबद्ध आहे.

स्वतःच्या सुरक्षेसाठी कायमच पाकिस्तान आणि इतर देशांतील सैनिकांवर अवलंबून असलेला सौदी अरेबिया असे करणार नसला, तरी या कृतीमुळे भारताच्या मनामध्ये संशयाचा खडा पडला. सौदी अरेबियाच्या मदतीने तुर्कीये आणि कतारने सीरियामध्ये एकेकाळी ‌‘इस्लामिक स्टेट‌’चा भाग असलेल्या अहमद अल शरा यांना अध्यक्षपदी बसवून इस्रायलच्या मनात संशय निर्माण केला. इस्रायलसाठी एकीकडे इराणच्या नेतृत्त्वाखालील ‌‘शिया‌’ मूलतत्त्ववादी विचारसरणीची आघाडी अस्तित्वाचे संकट निर्माण करत असताना, दुसऱ्या बाजूने ‌‘सुन्नी‌’ मूलतत्त्ववादी विचारसरणी त्याला घेरू लागली आहे. कतार आणि सौदी अरेबियाकडे प्रचंड प्रमाणावर पैसा असून, त्या जोरावर अमेरिकेतील राजकारणाला, तसेच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या लोकांना आपल्याकडे वळवण्याची ताकदही त्यांच्याकडे आहे. या परिस्थितीत इस्रायल राजकीय इस्लामचा वापर न करणारे मुस्लीमबहुल देश, तसेच या देशांचा उपद्रव सहन करत असलेल्या देशांची मोट बांधायचा प्रयत्न करत आहे.

इस्रायलच्या झेंड्यावरच्या षटकोनी चांदणीला ‌‘स्टार ऑफ डेव्हिड‌’ असे म्हणतात. इस्रायलला केंद्रस्थानी ठेवल्यास अवतीभोवतीच्या इथिओपिया, सोमालीलॅण्ड, सायप्रस, ग्रीस, अझरबैजान, संयुक्त अरब अमिराती आणि बहारीन आणि भारत यांना जोडले; तर हा षट्‌‍कोन पूर्ण होतो. यातील अझरबैजान वगळता, भारताचे सर्व देशांशी चांगले संबंध आहेत. अझरबैजानच्या शेजारील आर्मेनियाशी भारताचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेऊन आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित केली आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी इस्रायलला जाऊन भारत आणि इस्रायल यांच्यातील बहरलेल्या द्विपक्षीय, तसेच बहुपक्षीय संबंधांना प्रकाशात आणण्याचे काम करणार आहेत. या दौऱ्यामध्ये संरक्षणासोबतच अनेक क्षेत्रांमध्ये भारत आणि इस्रायलमध्ये सहकार्य करार होणार असून, भारताला इस्रायलकडून संवेदनशील क्षेत्रातील संरक्षण तंत्रज्ञान मिळणार आहे. मोदींच्या या दौऱ्यामुळे भारत आणि इस्रायल या दोन प्राचीन आणि आधुनिक देशांमधील संबंध अधिक मजबूत होतील, हे निश्चित.

Powered By Sangraha 9.0