पाकचा पश्तूनपेच...

25 Feb 2026 10:45:41

नुकतेच पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेअंतर्गत सात ठिकाणी हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला. यावर अफगाणिस्तानच्या ‌‘तालिबान‌’ प्रशासनाने कडक इशारा देत, योग्य वेळी प्रत्युत्तरात्मक कारवाई केली जाईल, असे म्हटले. दोन्ही देशांदरम्यान ऑक्टोबर 2025 मध्ये युद्धविरामाबाबत अनेक बैठका झाल्या होत्या. जरी नोव्हेंबरमध्ये शांतता चर्चा खंडित झाली, तरी युद्धविराम कायम होता. मात्र, ताज्या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांतील तणाव पुन्हा शिगेला पोहोचल्याचे दिसते. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने या कारवाईला राष्ट्रीय सार्वभौमत्व, आंतरराष्ट्रीय कायदा, शेजारीपणाचे तत्त्व आणि इस्लामिक मूल्यांचे उल्लंघन म्हणत पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत.

पाकिस्तानचा दावा आहे की, गेल्या महिनाभरात पाकिस्तानमध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हे हवाई हल्ले करण्यात आले. धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या या भागांत मोठ्या प्रमाणावर साम्य आहे. त्यामुळे खैबर पख्तूनख्वा, बलुचिस्तान आणि गिलगिटसारख्या भागांत पाकिस्तानी लष्कराविरोधात आंदोलन आणि बंडखोरीचे प्रकार घडत आले आहेत. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानने केलेल्या ‌‘एअर स्ट्राईक‌’मध्ये नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या दाव्याला संयुक्त राष्ट्राने दुजोरा दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या या निवेदनामुळे पाकिस्तानच्या त्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, ज्यात त्यांनी ‌‘टीटीपी‌’ आणि ‌‘इस्लामिक स्टेट‌’च्या दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई करून दहशतवाद्यांना ठार केल्याचे म्हटले होते. अफगाणिस्तानासाठी हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. कोणतेही सरकार सत्तेत आले, तरी ‌‘ड्युरंड‌’ रेषेला मान्यता देणार नाही. कारण, हा प्रश्न भावनांशी निगडित आहे. अफगाणिस्तानने ‌‘पश्तून‌’बहुल खैबर पख्तूनख्वा प्रदेशाला ‌‘पश्तूनिस्तान‌’ म्हणून स्वतंत्र ओळख देण्यासही समर्थन दर्शवले आहे.

जगातील सुमारे 94 टक्के ‌‘पश्तून‌’ लोकसंख्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये राहते. अफगाणिस्तानच्या लोकसंख्येत 65 टक्केपेक्षा जास्त ‌‘पश्तून‌’ आहेत; तर पाकिस्तानात सुमारे 15 टक्के लोकसंख्या ‌‘पश्तून‌’ असून, ती प्रामुख्याने खैबर पख्तूनख्वामध्ये वास्तव्यास आहे. पाकिस्तानची सेना मात्र अफगाणिस्तान असो किंवा खैबर पख्तूनख्वा प्रांत, सर्वत्र दहशतवादविरोधी मोहिमेच्या नावाखाली पश्तूनांवर कारवाई करते. अफगाणिस्तानव्यतिरिक्त, स्वतःच्या देशातही पाकिस्तानी सैन्याने खैबर पख्तूनख्वामधील ओरकझाई जिल्ह्याच्या तिराह खोऱ्यात एका वाहनावर ‌‘मोर्टार‌’ने गोळीबार केला, ज्यात दोन मुलांसह पाच पश्तूनांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी पाकिस्तानी चौकीसमोर निदर्शने केली असता, निःशस्त्र पश्तूनांवर गोळीबार करण्यात आल्याचा आरोप आहे, ज्यात सुमारे आठ स्थानिक जखमी झाले.

गेल्या तीन दशकांपासून पश्तूनांवर दडपशाही सुरू असल्याचा आरोप केला जातो. दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी अफगाणिस्तानात ‌‘तालिबान‌’ सत्तेत आल्यानंतरही पाकिस्तान-अफगाण संबंध तणावपूर्णच राहिले आहेत. एकूणच, ‌‘पश्तून‌’ अफगाणिस्तानातील असोत किंवा पाकिस्तानातील, त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जाताहेत. ‌‘ड्युरंड‌’ रेषेने विभागलेली जमीन ही पश्तूनांसाठी फक्त सीमा नाही, तर ती त्यांच्या घराची, संस्कृतीची आणि नात्यांची विभागणी आहे. दहशतवादविरोधी कारवायांच्या नावाखाली वारंवार होणारे हल्ले, निरपराधांचा बळी आणि भीतीचे सावट यामुळे पश्तून समाज आज असुरक्षिततेच्या छायेत उभा आहे.

सीमेच्या दोन्ही बाजूंना राहणाऱ्या पश्तूनांसाठी हा संघर्ष फक्त दोन राष्ट्रांमधील तणाव नाही; तो त्यांच्या अस्तित्वाचा, स्वाभिमानाचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आज पश्तून समाजाला सर्वाधिक गरज आहे ती शांततेची, सन्मानाची आणि न्यायाची. सीमा, राजकारण आणि सत्तासंघर्ष यांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या वेदनेला समजून घेणे आणि टिकाऊ शांततेचा मार्ग शोधणे, हीच खरी काळाची गरज आहे. त्यामुळे ‌‘संयुक्त राष्ट्र समिती‌’च्या देखरेखीखाली हवाई हल्ल्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी, जेणेकरून नागरिकांच्या मृत्यूबाबत सत्य स्पष्ट होईल. हा प्रश्न केवळ सुरक्षा किंवा भू-राजकारणाचा नाही; तो एका समुदायाच्या अस्तित्वाचा, सन्मानाचा आणि हक्कांचा देखील आहे.

Powered By Sangraha 9.0