अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी बुधवार दि.२५ रोजी आमदार निरंजन डावखरे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी मांडत ऑनलाईन गेमिंग ॲप मुळे अल्पवयीन मुलांच्या आयुष्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांची दाहकता निदर्शनास आणली याबाबत दैनिक मुंबई तरुण भारत चे मंत्रालय प्रतिनिधी अभिनंदन परूळेकर यांच्याशी केलेली बातचीत (Niranjan Davkhare)
१. ऑनलाईन गेमिंग अॅपबाबत तुम्ही विधान परिषदेत मुद्दा उपस्थित केलात काय सांगाल?
लक्षवेधीच्या माध्यमातून विधान परिषदेत गेमिंग ॲपबाबत महत्वाचा मुद्दा मी उपस्थित केला. एकूण ६० मिनिट यावर सभागृहात चर्चा झाली. गेमिंग प्लॅटफॉर्म मुलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत. यांना नुसते बॅन करून चालणार नाही.तर यांच्यावर आय पी सी ३०६ कलम आणि नवीन बी एन एस अॅक्ट १०६ अन्वये अबेंटमेंट टू सुसाइड यातून कारवाई झाली पाहिजे. माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी याविषयात अतिशय गंभीरपूर्वक आणि विस्तृत उत्तर देताना सांगितले की लॉ आणि जुडीसिअरी बरोबर सल्ला मसलत करून राज्य सरकार पुढच्या काळात यावर कारवाई करेल. तसेच एक टास्क फोर्स गठीत केला आहे आणि त्याचा अहवाल पुढच्या अधिवेशनाच्या आत सर्वांना उपलब्ध होईल. दोन्ही सभागृहातील सदस्यांची एक समिती राज्य शासन यासंदर्भात तयार करत आहे. (Niranjan Davkhare)
२. यासंदर्भात ऑस्ट्रेलिया मधील कायद्याचा उल्लेख सभागृहात तुम्ही केला आहे ?
ऑस्ट्रेलियाने अशी पद्धत अवलंबली आहे की ऑनलाईन वाचनापेक्षा हार्ड कॉपी बुक केली पाहिजे. आणि मुलांनी इंटरनेट आणि गॅझेटचा कमीत कमी वापर केला पाहिजे यावर तिथे भर दिला जातो. तसे संस्कारुपी काम आपल्या शाळा आणि महाविद्यालयात झाले पाहिजे. (Niranjan Davkhare)
३. ऑनलाईन गेमिंगच्या दाहकतेची काही उदाहरण आपण सभागृहात सांगितली आहेत काय आहेत ती उदाहरणे ?
पुण्यात एका १४ वर्षाच्या मुलाने गेमिंग अॅप मुळे आत्महत्या केली. आणि सुसाईड नोट मध्ये लॉग आऊट लिहिले. गाझियाबाद मधील तीन बहिणींनी एकत्र आत्महत्या केल्या कारण कोरियन गेम मध्ये त्यांना तो टास्क दिला होता.त्यांनी आपल्या वडिलांना सॉरी पप्पा सॉरी असे लिहिले. अशा हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना आहेत. यामुळे ते कुटुंब तर उध्वस्त होतेच पण समाजावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. अशा पद्धतीने पुढच्या पिढ्या बरबाद करण्याचं काम या अॅप मुळे होणार असेल तर अशा अॅप वर बंदी आणावी. (Niranjan Davkhare)
४. या तुमच्या प्रश्नावर विरोधकांनी पण पाठिंबा दिलेला पाहायला मिळाला ?
समजातील हा अतिशय गंभीर प्रश्न आहे याबाबत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांच एकमत झालेलं पाहायला मिळाले. मंत्री आशिष शेलार यांनी दोन्ही सभागृहातील निवडक सदस्यांची समिती स्थापन करून पुढची कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. त्याला विरोधी सदस्यांनी पण सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. (Niranjan Davkhare)