मुंबई: (Mumbai Fire Brigade) मुंबई अग्निशमन दल आता अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवी वाहने आणि विस्तारलेल्या पायाभूत सुविधांद्वारे आपत्कालीन प्रतिसाद अधिक सक्षम करण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. वाढत्या उत्तुंग इमारती आणि नागरी विस्तार लक्षात घेऊन दलाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात यंदा २३०.९० कोटी रुपये तरतूद प्रस्थापित आहे. (Mumbai Fire Brigade)
उत्तुंग इमारतींमधील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाच उच्च इमारत अग्निशमन वाहने खरेदीसाठी स्वीकृती देण्यात आली आहे. ३२ मीटर आणि ४० मीटर उंचीचे प्रत्येकी एक टर्न टेबल शिडी वाहन ताफ्यात दाखल झाले असून २४ मीटर उंचीचे हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म आणि उच्च क्षमतेचे पंप असलेली चार प्रथम प्रतिसाद वाहने लवकरच कार्यान्वित होणार आहेत. २५० मीटर उंचीपर्यंत पाणी फवारू शकणारी ११ अत्याधुनिक अग्निशमन वाहने खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रकाश व्यवस्था आणि उच्च दाब पंप सुविधा असलेली चार सहाय्यक वाहने खरेदी करण्यात येत आहेत. (Mumbai Fire Brigade)
एल.बी.एस. मार्ग, कांजूरमार्ग (प.) येथील नवीन अग्निशमन केंद्राचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) परिसरात आणखी एक केंद्र उभारण्यात येणार आहे. जुहू तारा रोड, सांताक्रुझ (प.), माहूल रोड, चेंबूर आणि टिळक नगर येथेही नवी केंद्रे उभारली जाणार आहेत. कॉम्प्रेस्ड एअर फोम प्रणाली आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा समावेश करण्याचे नियोजन असून अग्निशमन व मर्यादित जागेतील बचाव प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक सिम्युलेटर एप्रिल २०२६ पर्यंत कार्यान्वित होणार आहे.या सर्व उपाययोजनांसाठी २०२५-२६ मध्ये १११.६८ कोटी रुपये आणि २०२६-२७ मध्ये २३०.९० कोटी रुपये तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. (Mumbai Fire Brigade)