Samruddhi Mahamarg: विधानपरिषदेत समृद्धी महामार्गावरून खडाजंगी!

25 Feb 2026 13:05:18
 
Samruddhi Mahamarg
 
मुंबई : (Samruddhi Mahamarg) नागपूर-मुंबई ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ हा राज्यातील महत्त्वाकांक्षी आणि विकासाला चालना देणारा प्रकल्प मानला जातो. मात्र उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना या महामार्गाचा पूर्ण लाभ मिळत नसल्याचा मुद्दा पुन्हा एकदा विधानसभेत गाजला. चर्चेदरम्यान काही सदस्यांनी समृद्धी महामार्गाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करत, काही ठिकाणी रस्त्यावर चढ-उतार जाणवत असल्याने वाहनांना व्हायब्रेशन जाणवत असल्याची टीका केली. यावर उत्तर देताना राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित कंत्राटदारांना दुरुस्तीचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले. तसेच, खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना समृद्धीशी थेट जोडण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ते जळगाव असा सुमारे १०५ किलोमीटर लांबीचा ‘खानदेश एक्सप्रेसवे’ प्रस्तावित करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली. (Samruddhi Mahamarg)
 
आमदार सत्यजित तांबे यांनी नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना आधी राष्ट्रीय महामार्गाचा आणि त्यानंतर समृद्धी महामार्गाचा टोल भरावा लागतो, त्यामुळे ‘डबल टोल’ आकारला जात असल्याची तक्रार केली. मात्र सरकारने हा आरोप फेटाळून लावला. समृद्धी महामार्गावर ज्या ठिकाणाहून वाहन प्रवेश करते, तेथूनच प्रति किलोमीटर दराने टोल आकारला जातो आणि त्यामुळे स्वतंत्रपणे दोन टोल भरावे लागत नाहीत, असे स्पष्टीकरण देण्यात आले. नाशिककरांना समृद्धीवर येण्यासाठी केवळ ३० ते ५० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, असेही सरकारने नमूद केले. मात्र हे उत्तर दिशाभूल करणारे असल्याचे म्हणत सत्यजित तांबे यांनी राज्य सरकारवर आगपाखड केली. (Samruddhi Mahamarg)
 
खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना समृद्धीशी थेट जोडण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ते जळगाव असा सुमारे १०५ किलोमीटर लांबीचा ‘खानदेश एक्सप्रेसवे’ प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार झाला असून लवकरच कामास सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी पाच ठिकाणी इंटरचेंजची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना समृद्धीवर प्रवेश करणे अधिक सुलभ होईल, असा दावा सरकारने केला. समृद्धी महामार्ग हा विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशासाठी विकासाचा महामार्ग ठरणार असल्याचे सरकारने पुन्हा अधोरेखित केले. उत्तर महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटीबाबतच्या तक्रारी लक्षात घेऊन आवश्यक त्या सुधारणा आणि नव्या जोडरस्त्यांचे नियोजन सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. (Samruddhi Mahamarg)
 
 
Powered By Sangraha 9.0