कुर्वन्नेवेह कर्माणी...!

25 Feb 2026 11:48:01

कर्म करत 100 वर्षे जगण्याची इच्छा धरावी, हे तत्त्व उपनिषद सांगते आणि निष्काम कर्मयोग भगवद्गीता. अर्थात, ‌‘एकं सत्‌‍ विप्रा बहुधा वदन्ति‌’ असेच म्हणावे लागेल. व्यक्तीचा परिचय त्याच्या कामावरून होतो. तसा राष्ट्राच्या कार्यसंस्कृतीचा परिचयदेखील त्यातूनच होतो. कर्माचे महत्त्व सांगणारा हा लेख...

कुर्वन्नेवेह कर्माणी जिजिविषेच्छतं समा:|
एवं त्वयि नान्यथेतोस्ति न कर्म लिप्यते नरे॥


हिंदू धर्मातील हे तत्त्वज्ञान, भक्ती एवढेच कर्माला महत्त्व देणारे आहे. काम करत 100 वर्षे जगण्याची इच्छा करावी आणि याशिवाय अन्य मार्ग नसून अशा प्रकारे केलेल्या निष्काम कर्माचा दोष मनुष्यांना लागत नाही, असा याचा ढोबळ अर्थ असून यातील तत्त्वज्ञानाची मांडणी आधुनिक युगात अतिशय उपयुक्त असणारे हे तत्त्वज्ञान आहे. कारण, पूर्वी कधीही नव्हती, एवढी आज निष्काम वृत्तीने काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. वैयक्तिक स्वास्थ्यासोबतच सामाजिक स्थैर्य व राष्ट्रीय उन्नतीसाठी या तत्त्वाचा नवा पैलू समजणे महत्त्वाचे आहे.

मुळात मनुष्याने काम करावे, असे का सांगितले गेले असावे? आपला उदरनिर्वाह, चरितार्थ चालवण्यासाठी तो जसा आवश्यक आहे, तसा शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी काम महत्त्वाचे आहे. काम न करताच, काही मिळावे, असा प्रारब्धवाद सांगून दैवावर विसंबून राहणाऱ्यासाठी ‌‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे,‌’ हा प्रयत्नवादही वरील तत्त्व तर सांगतेच. परंतु, त्याशिवाय एकाकीपण, कंटाळा, आळस दूर सारून माणसाला व्यस्त ठेवण्यासाठी उद्योगी राखण्यासाठी काम आवश्यक आहे. शिवाय, ऐतखाऊ प्रवृत्ती बोकाळू नये, श्रमप्रतिष्ठा वाढावी, यासाठीसुद्धा वरील तत्त्वज्ञान उपयुक्त आहेच. तर यालाच जोड म्हणून ‌‘स्थितस्य गतिः चिन्तनीया‌’ अर्थात निष्क्रिय माणसाचे भवितव्य चिंताजनक असल्याचे उपनिषदकार सांगतात. बहिणाबाई चौधरी ‌‘ज्याच्या हाताले घट्टे, त्याला देव भेटे‌’ असा भाव आपल्या अहिराणी कवितांतून व्यक्त करतात. हे तत्त्वज्ञान ही उपनिषदांतील ‌‘न ऋते श्रान्तस्य सख्ख्याय देवाः‌’ (श्रम करून थकल्याशिवाय देव भेटत नाही,) याचीच प्रचिती देते. कामावरूनच माणसाला मान्यता, प्रतिष्ठा, प्रशंसा मिळते.

कामातूनच माणसाचे व्यक्तिमत्त्वही आकार घेते. आपापल्या व्यवसायाशी एकरूप झाले की, व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व तसेच घडल्याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसतात. कामामुळेच तो समाजाशी जोडला जातो. पर्यायाने राष्ट्रसेवेशी जोडला जातो. मुळात काम ते काम. परंतु, ते करण्याच्या पद्धतीवरून त्या कामाचे स्वरूप ठरते. लोकांनी केले, तसेच करावे, असे कुठे लिहिले आहे. त्या कामावर चढलेली धूळ बाजूला केली, तर कामाचे स्वच्छ स्वरूप दिसेल. काम तन्मयतेने, निष्ठेने केल्यास त्याचा लेप लागत नाही, असे उपनिषदकार सांगतात. दुसरे लहान काम कमी दर्जाचे, म्हणून करणेच बंद केले, तर मोठी कामे करणारे ती करूच शकत नाहीत. उदा. सफाई कामगार कामावर नाही गेले, तर मुख्याधिकारी काय करतील? शिक्षक शाळेत नाही गेले, तर शिक्षणमंत्री काय काम करतील? तलाठी यांनी काम नाही केले, तर तहसीलदार, जिल्हाधिकारी काय काम करतील? कामाच्या स्वरूपावरून त्याची एक उतरंड रचलेली आहे. खालची उतरंडच काढली, तर संपूर्ण उतरंड घसरते. त्यामुळे प्रत्येक काम तेवढेच महत्त्वाचे. ते निष्ठेने केले, तर त्याचा लेप मनुष्याला लागत नाहीच. काम लहान असो वा मोठे, प्रत्येकाची आपल्या कामावरील श्रद्धा महत्त्वाची. ज्याचे-त्याचे परिमाण ठरलेले आहेत. त्यात त्यांचे काम उत्तम झाले, त्यांची निष्ठा त्यांच्या कामाच्या पद्धतीला उजाळा देते.

एकदा असेच एका सुज्ञ माणसाने एकच काम करणाऱ्या तीन व्यक्तींना एकच प्रश्न विचारला. पण उत्तरे मात्र वेगवेगळी आली. यावरून काम करण्याची प्रत्येकाची धारणा वेगळी कशी असते, हे समजते. ते काम होते, संसदभवन उभारणेसाठी दगड फोडण्याचे आणि प्रश्न होता, “तुम्ही काय करत आहात?” जी तीन उत्तरे आली, ती अशी की, “दिसत नाही का, दगड फोडतोय? नशीबच आमचे फुटके,” तर दुसरे उत्तर होते, “काय करणार, कुटुंबासाठी करावे लागते काहीतरी. पोटा-पाण्याचा प्रश्न. दुसरे काय!” तिसऱ्या व्यक्तीने उत्तर दिले, “मी माझ्या देशातील पवित्र लोकशाहीचे मंदिर बनवत आहे.” असाच एक प्रश्न भारतीय पंतप्रधान यांनी जपानमधील झाडू मारणाऱ्या सफाई कामगारास विचारला. तो म्हणाला, “मी माझ्या देशाला सर्वोच्च स्थानी नेण्याचा प्रयत्न करत आहे.” अर्थात, यातून त्या व्यक्तींची आपापल्या कामावरील निष्ठा, श्रद्धा, धारणा समजते आणि यावरूनच तेथील कार्यसंस्कृती समजते. एखाद्या कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांच्या कामाच्या पद्धतीतून तेथील कार्यसंस्कृती समजते, तशीच राष्ट्राचीही कार्यसंस्कृती ठरते.

जेव्हा ‌‘दक्षिण गंगोत्री मिशन‌’वर गेलेल्या वैज्ञानिकांनी 15-15 तास काम केले, त्यांना थकवा जाणवला नाही. कारण, त्यांना सहा महिने दिवस असल्यामुळे वेळच कळला नाही. तसेच डॉ. बाबासाहेबांना वाचत बसलेले पुस्तक संपेपर्यंत रात्र संपून दुसरा दिवस कधी निघायचा, हे समजायचे नाही. एखाद्या कामाकडे आपण कसे पाहतो, त्यावरून आपल्या शरीर-मनावर जसे परिणाम होतात, तसेच त्या कामाच्या स्वरूपावरही परिणाम होतात. काम ओझे झाले की कामाचा दर्जा खालावतो व कार्यसंस्कृती नष्ट होते. परिणामी, त्या संपूर्ण कार्यालयाची असो वा एखाद्या देशाची ओळख कामावरून ठरत जाते. कार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यमूल्ये आवश्यक आहेत. ते म्हणजे, उपक्रमशिलता, जबाबदारी घेण्याची वृत्ती, स्वयंशिस्त, कामसूपणा, नवीन शिकण्याची वृत्ती, जिज्ञासा. ‌

‘काम म्हणजे व्यक्त होण्याची संधी आहे,‌’ या दृष्टीने पाहिले, तर कामाप्रति निष्ठा वाढून कामावरील प्रेम, निष्ठा वाढू शकते, ज्याला आपण थोडक्यात कर्तव्यनिष्ठा म्हणतो. परंतु, ही कार्यमूल्ये न समजल्यामुळे माणसांच्या कामांत बदल होतो. एखाद्याचे काम उत्कृष्ट होते, तर एखाद्याचे निराशाजनक, एखादे उद्विग्नता वाढण्यासारखे. सतत दुसऱ्यांशी स्पर्धा वा हेवा करत केलेल्या कामात मूल्य नसते. उलट, अशा कामातून आत्मिक समाधान न मिळता, असंतुष्टता वाढत जाते, तर एखादे अंगीकारलेले काम निरपेक्ष बुद्धीने केले. अंतःप्रेरणेने व आनंदाने केले, तर यशस्वी जीवनाचे गमक ठरते. निराशा, वैफल्य मनाला स्पर्शही करत नाही. पण, बरेचदा इथेच गडबड होते. आपला अहंकार आडवा येतो आणि आपण स्पर्धा करत काम करतो किंवा एखाद्या प्रलोभनास बळी पडून काम करतो किंवा कोणत्यातरी अपेक्षा ठेवून काम करतो. त्यामुळे कामावर निष्ठा राहात नाही, तर अपेक्षित फळांवर लक्ष असते. त्याऐवजी कामावर पूर्ण निष्ठा ठेवली, तर त्याची निश्चित दखल घेतली जाते; वा घेतली नाही कोणी, तरी

स्वतःलातरी समाधान असते आणि स्वतःच्या समाधानापेक्षा जगात काहीही मोठे नाही. काहीही विकत घेता येईल, परंतु समाधान व आनंद हा आपल्या आतूनच जन्म घेत असतो, एवढे खरे! एखादे कार्य नजरेसमोर उद्देश ठेवून केले व अपेक्षित फळाच्या अपेक्षेने केले, तरी तो उद्देश तेवढा व्यापक समाजहित साध्य करणारा असेल, तरी ते कर्म, कार्य उत्तम सदरातच मोडते. जो आपल्या कामावर प्रेम करू शकत नाही, तो जीवनावरही प्रेम करू शकत नाही व जीवन तर एवढे सुंदर आहे, जे केवळ आपल्या कामावरील निष्ठेमुळे बदलूनच जाते. या परिक्षेपात अमाप मनुष्यबळ परंतु कार्यमूल्ये व कार्यप्रेरणा अद्यापि हवी तशी पसरली नसल्याने भारत अजूनही वैभव शिखरावर पोहोचला नाही.

मात्र, याबद्दल कोणी बाहेरून येऊन हे बदल आपल्यात करणार नाही, तर आपणासच आपले परीक्षण करायचे आहे आणि हे परीक्षण सर्वांना करायचे आहे; मग तो सफाई कामगार असो, वा गृहिणी, वा लोकप्रतिनिधी असेल, वा अधिकारी, कर्मचारी. आपले काम काय आहे, ते का करायचे, कसे करायचे याचा विचार करताना वरील उपनिषदातील तत्त्व पुन्हा एकदा वाचले, तरी लक्षात येईल की, मनुष्याला 100 वर्षे जगण्याची इच्छा असली, तरी असलेले वा मिळालेले आयुष्य मृत्यूसह संपते. परंतु, कार्यमग्नता हेच जीवन झाले आणि ही कार्यमग्नता सकाम कर्मयोगीप्रमाणे असली, म्हणजे त्या कर्माचा कोणताही दोष त्यांस लागत नाही.

जसे चिखलात, पाण्यात राहूनही कमलपत्रांना जलबिंदूचा स्पर्श होत नाही, अगदी तशी निष्काम वृत्ती उपनिषदांना अपेक्षित आहे, जी आज नितांत निकडीची आहे. शेवटी एवढंच म्हणेन की, आपले काम हे आपले अपत्य आहे, या दृष्टीने पाहिले, तरी ते अपत्य निकोप, सदृढ, निरोगी होण्यासाठी संस्कारक्षम होण्यासाठी जसे पालक विचार करतात, तेवढा विचार जरी केला, तरी पुरेसे आहे व अपत्याचे पालनपोषण घडवणूक ही जशी आनंददायी बाब असते, तशी ती कामाप्रति झाली व तसेच प्रेम, तीच निष्काम वृत्ती आली, म्हणजे उपनिषदांतील ‌‘कुर्वन्नेह कर्माणी‌’ हे तत्त्व सफल झाल्यासारखेच होय. वनलक्ष्मी जशी फळभाराचे लावण्य धारण करून सेवेसाठी तत्पर उभी असल्याचे वर्णन ज्ञानेश्वरीत केले आहे, अगदी तसेच जीवन जगण्यासाठी आवश्यक सुंदर तत्त्वांचे लावण्यरत्न धारण करून कित्येक शतकांपासून ही उपनिषदे उभी असल्याचे भासतात.


लाखो विद्यार्थ्यांना सुसंस्कार आणि नीतिमत्तेचे धडे

मुंबई : ‌‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान‌’च्यावतीने भावी पिढीला सुसंस्कार आणि नीतिमूल्यांचे धडे देण्यासाठी श्रीमद्ररामायण, महाभारत, संतकथा, क्रांतिकारकांच्या गोष्टी आदी विषयांवर शालेय विद्यार्थ्यांची नुकतीच परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला महाराष्ट्र आणि गोव्यातील तब्बल दोन लाख, 75 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून संस्कृतीच्या संवर्धनाचा जागर केला. यात अन्य धर्मीय विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्याची माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त मोहन सालेकर यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, “सध्या सनातन संस्कृती जाणून घेण्याबाबत उत्सुकता वाढत आहे. अनेक युवक-युवती भजन क्लबिंगच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचा जागर करीत आहेत. ‌‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान‌’च्यावतीने महाराष्ट्र आणि गोव्यातील एकूण 1 हजार, 470 शाळांमधून एकाच दिवशी आणि एकाचवेळी ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना रामायण, महाभारत आणि संतांच्या कथा ऐकविण्यात आणि दाखविण्यात आल्या. त्याच अभ्यासक्रमावर आधारित 60 गुणांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची लेखी परीक्षा घेण्यात आली.

या परीक्षेत सहभागी विद्याथ, शिक्षक आणि शाळांना आकर्षक पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रत्येक शाळेत आणि इयत्तेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला आकर्षक सन्मानचिन्ह प्रदान केले जाईल. तसेच 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्यांना आकर्षक प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. परीक्षेचे नियोजन करण्यासाठी पाच हजार शिक्षकांसह 1 हजार, 450 कार्यकर्ते सहभागी झाले होते.” संस्कारक्षम पिढी घडविण्याच्या उद्देशाने गेल्या 23 वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे त्याला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असल्याचे सालेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.



- स्नेहलता स्वामी



Powered By Sangraha 9.0