मुंबई : (BMC Budget) मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आज सन २०२६–२७ या आर्थिक वर्षाचे बजेट सादर करणार आहेत. यंदाच्या बजेटमध्ये मुंबईकरांवर कोणताही नवीन कर लादला जाणार नसल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच पाणी दरात दरवर्षी होणारी किमान ८ टक्के वाढ रद्द करण्याबाबतही निर्णय होऊ शकतो. (BMC Budget)
भाजप सत्तेत आल्यानंतरचे हे पहिलेच बजेट असल्याने सुरू असलेले प्रकल्प निश्चित मुदतीत पूर्ण करण्यावर विशेष भर दिला जाण्याची शक्यता आहे. कामे वेळेत पूर्ण झाल्यास अतिरिक्त खर्च टाळता येईल, यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. तसेच मोठ्या पायाभूत प्रकल्पांसाठी प्रथमच महापालिकेकडून रोखे जारी करण्याचा पर्याय वापरण्याची शक्यता आहे. यासाठी आवश्यक मान्यता आणि पतमानांकन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. (BMC Budget)
मागील सन २०२५–२६ मध्ये महापालिकेचा एकूण बजेट आकार ७४ हजार ४२७ कोटी ४१ लाख रुपये इतका होता. भांडवली खर्चासाठी ४३ हजार १६२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सुमारे २० हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. मुंबई कोस्टल रोड (उत्तर), गोरेगाव–मुलुंड जोडमार्ग बोगदा, प्रस्तावित गारगई धरण आणि समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्याचे प्रकल्प सध्या सुरू आहेत. (BMC Budget)
दरम्यान, महापालिकेच्या ठेव रकमा ३१ जानेवारी २०२६ पर्यंत ८१ हजार ४४९ कोटी रुपये इतक्या होत्या. आर्थिक वर्षाच्या अखेरीस या रकमा सुमारे ७७ हजार कोटी रुपयांपर्यंत घटण्याची शक्यता आहे. पायाभूत प्रकल्पांवरील देणी जवळपास २ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याने आर्थिक ताण वाढत आहे. त्यामुळे नव्या उत्पन्न स्रोतांचा शोध घेण्यावरही भर दिला जाऊ शकतो. (BMC Budget)
अनेक योजना कागदावरच:
मागील वर्षी जाहीर करण्यात आलेल्या काही महत्त्वाकांक्षी योजना अद्याप प्रत्यक्षात आलेल्या नाहीत. ‘मुंबई आय’ हा प्रकल्प लंडन आयच्या धर्तीवर सार्वजनिक-खासगी भागीदारीत राबवण्याची घोषणा झाली होती; मात्र त्यात ठोस प्रगती झालेली नाही. मुंबई सार्वजनिक उद्यान योजनेचीही अंमलबजावणी पुढे सरकलेली नाही. (BMC Budget)
मागील पाच वर्षांचा बजेट आकार:
सन २०२५–२६ मध्ये ७४ हजार ४२७ कोटी ४१ लाख रुपये, २०२४–२५ मध्ये ६५ हजार १८० कोटी ७९ लाख रुपये, २०२३–२४ मध्ये ५२ हजार ५५३ कोटी ७४ लाख रुपये, २०२२–२३ मध्ये ४३ हजार ४९१ कोटी २० लाख रुपये आणि २०२१–२२ मध्ये ३५ हजार ९६२ कोटी रुपयांचा बजेट होता. (BMC Budget)
भांडवली खर्चातही वाढ होत गेली आहे. सन २०२१–२२ मध्ये १२ हजार ५३५ कोटी रुपये, २०२२–२३ मध्ये १३ हजार ९५७ कोटी रुपये, २०२३–२४ मध्ये १८ हजार २८१ कोटी रुपये, २०२४–२५ मध्ये २७ हजार ९५५ कोटी रुपये आणि ३१ जानेवारी २०२६ पर्यंत १९ हजार ४४३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. (BMC Budget)