
कला ही केवळ सौंदर्याची अभिव्यक्ती नसून, कलाकाराने जगलेल्या अनुभवांची, भोगलेल्या संघर्षांची आणि समाजाशी जोडलेल्या संवेदनांची खरी कहाणी असते. नामदेव पाटील यांचा कलाप्रवास हेच वास्तव अधोरेखित करतो.
चित्रकलेच्या अथांग सागरात स्वतःची स्वतंत्र, ठाम आणि प्रामाणिक ओळख निर्माण करणारे नामदेव मोतीराम पाटील हे आजच्या काळातील एक अभ्यासू, संवेदनशील आणि सृजनशील कलावंत म्हणून ओळखले जातात. त्यांची कला पाहताना केवळ रंगसंगती किंवा तांत्रिक कौशल्य दिसत नाही, तर त्यामागे दडलेला जीवनानुभव, संघर्ष आणि समाजाशी असलेली नाळ प्रकर्षाने जाणवते. भारतीय चित्रकलेच्या समृद्ध परंपरेचा वारसा जपत, द्रष्टे कलागुरू बाबूराव पेंटर यांच्या विचारधारेतून प्रेरणा घेत, त्यांनी आपल्या कलायात्रेला समर्पण, शिस्त आणि सातत्याची भक्कम बैठक दिली आहे.
कोल्हापूर येथील कलानिकेतन महाविद्यालयातून ‘जी.डी. आर्ट’चे शिक्षण घेत असताना नामदेव पाटील यांनी केवळ अभ्यासक्रम पूर्ण केला नाही; तर कलेची शिस्त, साधना आणि आत्मचिंतन आत्मसात केले. विद्याथदशेतच त्यांनी कलेला व्यवसाय म्हणून पाहण्याऐवजी जीवनप्रणाली म्हणून स्वीकारले. रेखाटनातील अचूकता, रंगसंगतीतील संतुलन, प्रकाश-छायांचे परिणाम आणि आशयपूर्ण अभिव्यक्ती यांचा सखोल अभ्यास त्यांनी जाणीवपूर्वक केला. ‘फोटोग्राफी’ आणि ‘कॅलिग्राफी’ या विषयांत ‘कॉलेज टॉपर’ होण्याचा मान मिळवताना कला ही केवळ गुण मिळवण्याचे साधन न राहता, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ठळक ओळख बनली.
‘सृष्टी डिझाईन’ या संस्थेच्या माध्यमातून नामदेव पाटील यांनी कला आणि व्यावसायिक शिस्त यांचा दुमळ समन्वय साधला. गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ विवाहपत्रिका डिझायनिंग क्षेत्रात कार्यरत राहून त्यांनी पारंपरिक सौंदर्यदृष्टीला आधुनिक संकल्पनांची जोड दिली. त्यांच्या डिझाईनमध्ये केवळ आकर्षक मांडणी नसून संस्कृती, नातेसंबंध आणि भावनिक सूक्ष्मता यांचे प्रतिबिंब दिसते. त्यामुळे त्यांच्या कामाला केवळ व्यावसायिक यशच मिळाले नाही, तर एक विश्वासार्ह कलात्मक ओळखही निर्माण झाली.
नामदेव पाटील यांच्या कलेचा प्रवास हा सोपा नव्हता. आर्थिक अडचणी, वाढती स्पर्धा, बदलते तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचे दबाव यांचा सामना करतानाही त्यांनी आपल्या कलात्मक मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. अनेक वेळा अपयश आले, काम नाकारले गेले. मात्र, त्यांनी कलेपासून कधीही पाठ फिरवली नाही. संघर्ष, सातत्य आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या बळावर त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली विकसित केली. प्रत्येक अडचणीला सर्जनशील संधीमध्ये रूपांतरित करण्याची वृत्ती हीच त्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली ठरली आहे.
त्यांच्या कलेला विविध प्रतिष्ठित कलादालनांत स्थान मिळाले. मुंबईतील ‘जहांगीर आर्ट गॅलरी’, ‘नेस्को’ आणि ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ येथे भरलेल्या प्रदर्शनांमधून त्यांच्या कलाकृतींनी रसिक, समीक्षक आणि अभ्यासकांचे लक्ष वेधले. विशेषतः ‘जहांगीर आर्ट गॅलरी’तील प्रदर्शन हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत संस्मरणीय आणि निर्णायक टप्पा ठरला. त्या दालनातील प्रत्येक भिंत, प्रकाशछटा आणि रसिक नजरेतून त्यांना आपल्या कलेची नवी ओळख मिळाली. फोटोग्राफीतील क्षणचित्रे आणि कॅलिग्राफीतील सौंदर्यपूर्ण अक्षररचना जेव्हा त्या प्रतिष्ठित व्यासपीठावर साकार झाली, तेव्हा ती त्यांच्या दीर्घ साधनेची प्रत्यक्ष फलश्रुती होती.
नामदेव पाटील यांच्या कलेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यामागे जपलेले सामाजिक भान. त्यांच्या चित्रांमधून सामान्य माणसाचे जीवन, श्रमिकांचे कष्ट, स्त्रीचे भावविश्व, निसर्गाशी तुटत चाललेले नाते आणि बदलत्या समाजाचे प्रतिबिंब प्रभावीपणे व्यक्त होते. कला ही केवळ सजावटीसाठी नसून ती समाजाशी संवाद साधणारी, प्रश्न विचारणारी आणि विचार प्रवृत्त करणारी असावी, हा त्यांचा ठाम दृष्टिकोन आहे. त्यामुळे त्यांच्या चित्रांत सौंदर्याबरोबरच वास्तवाची धारही जाणवते.
समाजासाठी काहीतरी देण्याची जाणीव त्यांच्या कलाविचारांचा केंद्रबिंदू आहे. ग्रामीण भागातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील आणि संधींपासून वंचित असलेल्या मुलांमध्ये कलागुणांची कमतरता नसून योग्य मार्गदर्शनाचा अभाव आहे, असे त्यांचे ठाम मत. त्यामुळे भविष्यात मोफत चित्रकला, कॅलिग्राफी आणि फोटोग्राफी कार्यशाळा घेऊन या मुलांना दिशा देण्याचा त्यांचा मानस आहे. कला ही केवळ शहरकेंद्रित किंवा निवडक वर्गापुरती मर्यादित राहू नये, तर ती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे, असा त्यांचा विश्वास आहे.
याशिवाय, पारंपरिक भारतीय कलेचे जतन, जुन्या शैलींचे दस्तऐवजीकरण, नव्या पिढीला कला-संस्कृतीशी जोडणे आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हेही त्यांच्या सामाजिक कलाध्येयाचा भाग आहे. कला ही केवळ वैयक्तिक यशाचे साधन नसून समाजघडणीचे प्रभावी माध्यम आहे, या भूमिकेतून ते सातत्याने कार्यरत आहेत.
सध्या नामदेव पाटील विविध विषयप्रधान शिस्तींमध्ये ‘कॅनव्हास ऑईल पेंटिंग्ज’च्या माध्यमातून मानवी भावना, सामाजिक वास्तव आणि निसर्गातील सूक्ष्म छटांचा नवा वेध घेत आहेत. राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कलेचा ठसा उमटवण्याचा त्यांचा दृढसंकल्प आहे. सातत्यपूर्ण साधना, सामाजिक जाणीव आणि कलात्मक प्रामाणिकपणा यांच्या बळावर त्यांचा कलाप्रवास समाजाला दिशा देणारा, प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण ठरत आहे. त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!
- सागर देवरे