शबरीधाम व बारीपाडा

25 Feb 2026 11:33:27

कै. भिमराव गारे यांच्या संकल्पनेनुसार गेली 20 वर्षे आम्ही प्रकल्प दर्शन सहल आयोजित करतो. त्यांनी घालून दिलेली ही प्रथा त्यांच्यापश्चातही कायम आहे. यावर्षी आम्ही शबरीधाम आणि बारीपाडा येथे नुकतेच सहलीचे आयोजन केले होते. ‌‘पद्मश्री‌’ चैत्राम पवार यांची भेट आणि त्यांनी सांगितलेला बारीपाड्याच्या विकासाचा प्रवास हा सगळ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी होता. बारीपाडा आणि विकास यांसंदर्भात प्रकल्पदर्शनाच्या हेतूने जे पाहिले, त्यासंदर्भात या लेखात मांडणी केली आहे.

ग्रामविकास नाशिक शहराच्या प्रमुख कार्यकर्ते योगिनी चंद्रात्रे, स्मिता जोशी, भावना सोनवणे व अशोक गवळी आम्ही सकाळी 9 वाजता नाशिकच्या बाहेर पडलो. देवळा, सटाणामार्गे प्रवास सुरू झाला. वाटेत सटाण्याजवळील मुल्हेर येथे उद्धव महाराज यांच्या समाधीचे दर्शन दुपारी 12.30 वाजता घेतले. येथे श्रीनारायण व श्रीलक्ष्मी यांच्या विलोभनीय मूर्ती व मधोमध उद्धवराज महाराजांची मूर्ती आहे. नारायणाच्या मूर्तीच्या आजूबाजूला प्रभावळ आहे. येथील अशी आख्यायिका आहे की, सिंहस्थात उद्धव महाराज यांच्या समाधीवरून पाणी येते. असे म्हटले जाते की, सिंहस्थ काळात गंगा उद्धव महाराजांना स्नान घालते. येथे श्री नाना महाराज तराणेकर (इंदोर) यांना उद्धवाचे प्रत्यक्ष दर्शन झाले, असे म्हटले जाते.

पहले तो हरि उद्धव थे
अब तो उद्धवदास
संतन की सेवा करें
जो पाये मुल्हेरवास

उद्धव महाराजांच्या समाधी मंदिराजवळ एक पुरातन बकुळीचे झाड आहे, या झाडाबाबत एक आख्यायिका अशीदेखील आहे की, कोजागिरी पौर्णिमेला रात्री 12 वाजता या बकुळीच्या झाडाच्या फुलातून साखर पडते, तसेच येथील रासक्रीडादेखील खूप पुरातन आहे. परराज्यांतूनही लोक रासक्रीडा पाहण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेला येथे येतात. ज्यांना येथील नवसाने मुले होतात, ते लोक कोजागिरीच्या पौर्णिमेला येथील रासक्रीडेच्या चक्रावर मुले ठेवतात. कोयना व कृष्णा नदीच्या काठी शिवकालीन 12 मारुती मंदिरे बांधली. कारण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सैन्याला युद्धाचे पुढील आराखडे बांधणेसाठी एकत्र येणे व विचारविनिमय करण्यासाठी. कारण इतरत्र सर्वत्र मुघलांचे राज्य होते. मुल्हेर येथून अहवा, डांग मार्गे शबरी धामसाठी प्रस्थान केले. दुपारी 3 वाजता शबरीधाम येथे आम्ही पोहोचलो. शबरी माता मंदिर या मंदिरात डाव्या बाजूला शबरी व उजव्या बाजूला लक्ष्मण व मधे राम यांच्या संगमरवरी विलोभनीय मूर्त्या आहेत. शिलेवर बसलेल्या मूर्तीच्या मागे वनाचा देखावा नदी, नदीतील गोटे व खडकावर शबरीमाता बसलेली आहे व लक्ष्मणाची उभी मूर्ती आहे. शबरीधाम येथे सर्वत्र सागाचे जंगल आहे. शबरीमाता मंदिर चढताना पूर्ण चढ आहे व येताना उताराचा सिमेंटचा रस्ता आहे.

शबरीधाम येथे सन 2006 साली वनवासी बांधवांचा कुंभमेळा झाला होता. परिसर खूप मोठा व विस्तीर्ण आहे. शबरीधाम मंदिर बघून सायंकाळी 5.30 वाजता पंपासरोवर बघण्यास गेलो. रस्त्याने सर्वत्र जंगल नागमोडी व छोटा रस्ता आहे. श्री नवनाथ मढी, पंपा सरोवर, अहवा, डांग येथे सरोवरांवर घाट बांधलेले आहेत. हनुमानाची मूर्ती खडकावर खूप उंचावर बसवलेली आहे. येथून बारीपाडा 40 किमी अंतरावर आहे. सायंकाळी 6 वाजता पंपा सरोवरावरून निघून रात्री 8 वाजता बारीपाडा येथे मुक्कामी पोहोचलो. निवासव्यवस्था पर्यावरण अभ्यास केंद्र बारीपाडा ता. साक्री जि. धुळे येथे दोन मोठ्या हॉलमध्ये केली. भोजनानंतर रात्री 10 वाजता ‌‘जनसेवा फाऊंडेशन‌’चे शिक्षक यांनी ग्रामविकासाची संकल्पना यांवर एक तास उद्बोधन केले.

त्यानंतर दिपक पवार या कार्यकर्त्यांबरोबर आम्ही बारीपाडा गावातील जंगल बघावयास गेलो. गावापासून तीन किमी अंतरावर हे जंगल 1 हजार, 100 एकरांत वसलेले आहे. बारीपाड्याची लोकसंख्या 1 हजार, 200 ते 1 हजार, 300 आहे. जंगलात 4 हजार, 435 मोहाची झाडे आहेत. मार्चला मोहाची पाने गळतात व मोहाच्या झाडांचा दरवर्षी लिलाव होतो. एका झाडाला वर्षातून 15 मोळ्या निघतात; बाकी सर्व झाड सरळ वाढू देतात. मोडून पडलेली झाडे साखरपुडा, लग्न या कार्यक्रमात स्वयंपाकांसाठी जळण म्हणून वापरली जातात. मोहाच्या झाडापासून व्हॅसलिन (पेट्रोलियम जेली), ऑईल, चॉकलेट, साबण इत्यादी वस्तू तयार केल्या जातात व त्या उच्च किमतीत विकल्या जातात. या वस्तू तयार करून वनधन केंद्र नाशिकला विक्रीसाठी पाठविल्या जातात. जंगलाची राखण करण्यासाठी दिवसभरात आठ सुरक्षा रक्षक असतात; ते दरवर्षी बदलत असतात. डॉ. आनंद फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली सन 1991ला येथील कामास सुरुवात झाली. डॉ. आनंद फाटक यांचे यात मोठे योगदान आहे. 1993ला पूर्ण गाव संघटित झाले. या अगोदर आजूबाजूचे लोक येऊन जंगलतोड करायचे. गाव एकत्र येऊन गावाची समिती तयार केली. श्रमदानातून गावात 700 बंधारे बांधले. राजेश शुक्ला यांनी बारीपाड्यांच्या जंगल उत्पादनांवर व शाश्वत विकासावर ‌‘पीएचडी‌’ केलेली आहे. जंगलतोड झाडाचे मूल्य तीन कोटी रुपये आहे.

संयुक्त वनव्यवस्थापन समिती बारीपाडा, शेंदवड ता. साक्री जि. धुळे यांनी जंगलसुरक्षा गट स्थापन केले व असे दहा गटसदस्य आहेत. त्यानंतर दुपारी 12.30 ते 1.30 वाजेपर्यंत ‌‘पद्मश्री‌’ चैत्राम पवार यांचे बारीपाडा गावाचा शाश्वत विकास यावर प्रेरणादायी मार्गदर्शन झाले. त्यांच्या उद्बोधनाअगोदर सर्वांचा परिचय झाला. गारे यांची कन्या प्राची शिंदे हिने प्रास्ताविक करून तिच्या मनातील खंत व्यक्त केली व ‌‘पद्मश्री‌’ चैत्राम यांना विनंती केली की, भिमराव गारे यांनी भिंतघर ता. सुरगाणा या गावी शाश्वत विकासासाठी मुहूर्तमेढ गोशाळेच्या रूपाने रोवली आहे. चैत्राम यांनी वेळ काढून आमच्याबरोबर भिंतघर येथे यावे व आम्ही या गावाच्या विकासासाठी गावाला बरोबर घेऊन कसे काम करावे, याविषयी मार्गदर्शन करावे. त्यानंतर चैत्राम यांनी जे 40 मिनिटे मार्गदर्शन व प्रेरणादायी भाषण केले, त्यावेळी परिस्थिती अशी होती, गावात प्यायला पाणी नव्हते. लोक पावसाळ्यात शेती करायचे आणि आठ महिने ऊसतोडणीला गुजरात मध्ये जायचे. पण हे असं चाललं, तर कसं होईल? हे थांबवण्यासाठी गावात वृक्षलागवड करणे गरजेचे होते. त्यामुळे पाच हजार झाडं आणली आणि त्यांची लागवडी केली. मात्र आमच काम थांबलं. कारण, कामाला दिशा नव्हती. पण, त्या वेळेस आमची एका व्यक्तीची भेट झाली. हा माणूस गावात कशासाठी आला, याचा हेतू काय आहे, आदिवासींच्या जिवावार पैसे कमावायला तर आला नाही, असे विचार कधीतरी मनात यायचे. पण त्यांची भेट घेतल्यावर कळले की, ते संघाचे प्रचारक आहेत.

आम्हाला ‌‘प्रचारक‌’ शब्दच माहीत नव्हता; कारण संघ माहीत नव्हता ना! संघ माहीत नाही, वनवासी कल्याण माहीत नव्हतं. मग प्रचारक म्हणजे नेमका काय, असा विषय समोर आला. तर ते म्हणाले, “मी ‌‘वनवासी कल्याण संस्थे‌’चे काम करतो.” दोन वर्षांनंतर कळाले की, त्या प्रचारकांचे शिक्षण ‌‘एमबीबीएस‌’पर्यंत झाले आहे. 35 वर्षांपूर्वी आमच्या छोट्या गावामध्ये कुठलीही व्यवस्था नव्हती. टॉयलेट, बाथरूम, राहायची व्यवस्था, भोजनाची काहीही व्यवस्था नसताना हा ‌‘एमडी‌’ झालेला माणूस या गावात निस्वाथ सेवा करत होता. मग लक्षात आलं की, रा. स्व. संघ नावाची एक संघटना आहे आणि ते संघाचे स्वयंसेवक आहेत. ते कुठूनतरी लांबून येऊन आपल्या गावासाठी काम करत आहेत. तर आपण का करू नये? हा माझ्या आयुष्यातला ‌‘टर्निंग पॉईंट‌’ आहे. तेव्हापासून त्या कामाशी जोडले गेलो. गावात जंगल, जल, जमीन, जन आणि पशु या पाच बिंदूंनी विकास करण्यास सुरुवात केली. संघाचा ग्रामीण विकास विषय त्याला जोडला.”

पुढे त्यांनी सांगितले की ”इथे दि. 5 डिसेंबर 2017 रोजी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आले होते. त्यांनी म्हटले की, “काम चांगलं आहे. हे काम आपण पुढच्या गावांमध्ये नेऊ शकतो का?” मग 45 गावांचा एक ‌‘क्लस्टर‌’ केलेे. त्या समूहातून 40 युवकांना दर तीन महिन्यांनी बैठकीला बोलावतो. कारण, भविष्यात हे काम आपल्यालाच करायला लागणार आहे. 45 गावांमधून आपण आपण 11 हजार, 200 हेक्टर म्हणजे जवळपास 27 हजार एकर क्षेत्र हे वन संरक्षणखाली घेतलेलं आहे आणि त्या गावांना तो अधिकार मिळवून दिल. चैत्राम यांचे अनुभवकथन एकून सर्वजण भारावले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी संघाच्या साथीने उभे केलेले काम पाहून थक्क झालो. आपल्या परिसरातही असे चिरंतन कल्याणाचे काम उभे करावे, हा ध्यास उरी घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.


बारीपाडा येथील शाश्वत विकासात
6 संस्थांचा सहभाग आहे.

देवगिरी कल्याण आश्रम

ग्रामविकास समिती बारीपाडा

जनसेवा फाऊंडेशन

लुपिन फाऊंडेशन

योजक

वनधन केंद्र बारीपाडा

- प्रमोद मुळे
Powered By Sangraha 9.0