‘पंच’ची मिठी आणि अस्तित्वाचा संघर्ष

24 Feb 2026 12:44:59
Punch-Kun
 
जपानच्या चिबा येथील एका शांत प्राणीसंग्रहालयातील तो एक छोटासा व्हिडिओ होता. एक एखाद्या संत्र्यापेक्षाही लहान चिमुकले जपानी माकड, ‘आयकेईए’ (IKEA)’च्या एका मोठ्या अस्वलाला लाकडी जमिनीवर ओढत नेत होते. त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया इतक्या संवेदनशील होत्या की, इंटरनेटवर पुढच्या ४८ तासांत त्या व्हिडिओने भाषेच्या भिंती, काळाच्या सीमा आणि संस्कृतींचे अडथळे ओलांडत जगात भावनांचा एक महापूर आला. ‘पंच-कुन’ने जगाच्या मनावर कब्जा केला होता. त्यातून माकडांपेक्षा मानवी स्वभावाबद्दलच जास्त गोष्टी उलगडत गेल्या.
 
जगाने ‘पंच’कडे फक्त एक ‘क्यूट प्राणी’ म्हणून पाहिले नाही, तर लाखो लोक त्या चिमुकल्या जीवाच्या निरागसतेने पुरते भारावून गेले, प्रतिक्रिया देत इमोजींचा वर्षाव करत राहिले. अनेकांना ‘पंच’च्या आईने त्याला नाकारल्याचे पाहून स्वतःच्या आयुष्यातील एकटेपणाच्या जखमा आठवल्या. त्यांनी आपल्या बालपणातील ज्यांचा आधार घेऊन ते मोठे झाले, त्या वस्तूंच्या गोष्टी सांगितल्या. लेखक आणि विचारवंतांनी ‘पंच’ला आजच्या युगातील एकाकीपणाच्या साथीचे (Loneliness Epidemic) प्रतीक मानले. एका फर्निचरच्या दुकानातील निर्जीव खेळणे, एका जिवंत प्राण्याला आधार देत आहे, यावर भावुक चर्चा सुरू झाली. ही कथा अशी वार्‍यासारखी का पसरली? कारण, ‘पंच-कुन’ हा केवळ प्राणीसंग्रहालयातील एक प्राणी राहिला नव्हता; तो मानवी भावनांचा आरसा बनला होता. त्याने त्या अस्वलाला मारलेली घट्ट मिठी पाहून लोकांना स्वतःच्याच कोणाच्या तरी अस्तित्वाच्या ओढीची जाणीव झाली.
 
‘पंच-कुन’ची कहाणी मुळात जन्माच्या आनंदाने सुरू झाली नाही; ती एका शांत, विनाशकारी वेदनेने सुरू झाली. जुलै २०२५ मध्ये इचिकावा सिटी प्राणीसंग्रहालयात जन्मलेल्या, बाळ जपानी माकडाने अशा जगात प्रवेश केला, ज्याचे आईच्या छातीच्या उबदार स्पर्शाने या जगात स्वागत व्हायला पाहिजे होते. त्याऐवजी, त्याला नकाराच्या क्रूर वास्तवाचा सामना करावा लागला. एका लहान जिवासाठी आईचा स्पर्श ही चैनीची गोष्ट नसते, तर लहान जीवासाठी ते अस्तित्व असते. आईच्या मायेपासून वंचित राहिलेला पंच या अथांग जगात दिशाहीन झाला होता. अपरिचित जगात त्याचे छोटेसे थरथरणारे हृदय एका अशा मायेच्या शोधात होते, जी त्याला अजून गवसली नव्हती.
 
जेव्हा प्राणीसंग्रहालयातील रक्षकांनी त्याच्या पिंजर्‍यात ‘आयकेईए’चे एक मोठे आलिशान मखमली अस्वल ठेवले, तेव्हा त्याच्या मानसिक आरोग्यासाठी केलेला तो एक शेवटचा बचाव होता. त्यानंतर समोर आलेल्या विविध प्रतिमा पाहून जगाचे डोळे पाणावले.
‘पंच’ त्या स्वतःपेक्षाही मोठ्या असलेल्या मखमली अस्वलाच्या केसांत स्वतःला झोकून द्यायचा, त्या खेळण्याला तो एखाद्या लहान मुलासारखा सगळीकडे सोबत घेऊन फिरायचा. त्या निर्जीव अस्वलाने त्याला ते प्रेम, स्थैर्य आणि सुरक्षितता दिली, ज्यासाठी तो आसुसलेला होता. त्याला तिथे आईचा भास झाला, जी सजीव नव्हती, पण तिला बिलगल्यावर त्याचे मन शांत होत असे.
 
१९५०च्या दशकात मानसशास्त्रज्ञ हॅरी हार्लो यांनी त्या काळच्या एका समजाला, ‘बाळ आपल्या आईवर फक्त त्याला मिळणार्‍या दुधासाठी प्रेम करते,’ या सिद्धांताला आव्हान दिले. हार्लो यांनी ‘र्‍हिसस’ माकडांच्या पिल्लांसोबत एक प्रयोग केला. त्यांनी पिंजर्‍यात दोन ‘सरोगेट’ (पर्यायी) एक तारेची माता जिच्याकडे दुधाची बाटली होती आणि दुसरी, जिच्याकडे खाण्यासाठी काहीही नव्हते, अशी मऊ कापडाची मखमली माता ठेवली. या संशोधनात असे दिसले की, जेव्हा त्यांना भूक लागे, तेव्हाच ती पिल्ले तारेच्या मातेकडे जाऊन दूध प्यायची आणि पुन्हा धावत येऊन १८-२० तास त्या मखमली मातेला बिलगायची. हार्लो यांनी याला ‘कॉन्टॅट कम्फर्ट स्पर्शातून मिळणारे समाधान’ असे नाव दिले. ‘पंच-कुन’ हा या प्रयोगाचे आधुनिक आणि जिवंत उदाहरण आहे. त्याच्या मेंदूला अशा एका स्पर्शाची भूक होती, जी त्याला आईच्या प्रेमाचे समाधान देईल.
 
अशा तर्‍हेने ‘पंच-कुन’ एक आरसा बनला. एकाकीपणानंतरच्या जगात जिथे अनेकांना त्यांच्या समूहापासून वेगळे वाटते, तिथे वास्तव प्रेम नसताना काहीही मनाला स्थिरावणारे धरून ठेवण्याची सार्वत्रिक प्रवृत्ती ‘पंच’ने दर्शविली. ‘पंच’ हा फक्त एक गोंडस प्राणी नव्हता; तो आपल्या स्वतःच्या नाजूकपणाची आणि ममत्वाच्या स्पर्शाची आपली हताश, सुंदर गरजेची आठवण करून देणारा होता. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जॉन बोल्बी यांच्या मते, प्रत्येक बालकाला एका सुरक्षित आधाराची गरज असते. जर मुलाला वाटले की, त्याच्याकडे बाहेरच्या अवघड परिस्थितीतून परतण्यासाठी एक सुरक्षित जागा आहे, तरच ते बाहेरचे जग पाहण्याचे धाडस करू शकते.
 
‘पंच-कुन’च्या व्हिडिओंमध्ये हे स्पष्ट दिसते, जेव्हा जेव्हा एखादा मोठा आवाज व्हायचा किंवा दुसरे माकड त्याला ओरडायचे, तेव्हा तो खाण्याच्या भांड्याकडे नाही, तर त्या मखमली अस्वलाकडे धाव घ्यायचा. त्या अस्वलाकडून सुरक्षिततेची शिदोरी घेतल्यावरच त्याला पुन्हा बाहेरच्या जगाशी आणि स्वतःच्या समूहाशी संवाद साधण्याचे धैर्य मिळाले. ते खेळणे हे त्याचे अंतिम ध्येय नव्हते, तर तो त्याच्या समूहाकडे जाण्यासाठीचा एक साकव होता. मानवसुद्धा एक सामाजिक आणि स्पर्शप्रिय प्राणी आहे. आपली त्वचा हे आपल्या शरीरातील सर्वांत मोठे संवेदनाक्षम अंग आहे. ‘पंच’ची कथा आपल्याला भावते, कारण ती आपल्या ‘अ‍ॅटॅचमेंट थिअरी’शी जुळते.
 
लहानगे बाळ आईच्या मऊ मिठीत येताच रडायचे थांबते. कारण, त्याला सुरक्षित वाटते. आपण लहान मुलांकडे त्यांचे लाडके पांघरूण किंवा खेळणे पाहतो. हे सर्व ‘कॉन्टॅट कम्फर्ट’चेच प्रकार आहेत. जरी ते खेळणे निर्जीव होते, तरी त्या स्पर्शाने ‘पंच’च्या मेंदूला हा संदेश दिला की, मी सुरक्षित आहे. याच सुरक्षिततेच्या भावनेमुळे तो भविष्यात इतर माकडांशी नाते जोडण्यास तयार झाला. जुना फोन असो, एक जुनाट छंद असो किंवा आईच्या साड्यांची गोधडी असो, आपल्या सर्वांकडे ‘आयकेईए’ अस्वलाची स्वतःची अशी मूळ आवृत्ती आहे. ‘पंच’ला भावलेला मऊ स्पर्श इतका महत्त्वाचा का? जेव्हा ‘पंच’ त्या अस्वलाला कवटाळत असे, तेव्हा तो एक प्रकारे स्वतःवर उपचार करत होता. मऊ स्पर्शाशिवाय माकडाचे पिल्लू अन्न मिळत असूनही जगण्याची इच्छा सोडून देते आणि 'anaclitic depression मध्ये जाऊ शकते. आईने नाकारल्यामुळे निर्माण झालेला मानसिक धक्का तो या स्पर्शातून सुसह्य करत होता.
 
‘प्राईमेट्स’मध्ये (ज्यामध्ये मानव आणि माकडे येतात), स्पर्शामुळे शरीरात विशिष्ट रसायनांचा स्राव होतो. पहिले म्हणजे ‘बॉन्डिंग हार्मोन’ ऑक्सीटोसिन (Oxytocin) एकटेपणाचा तणाव कमी करते आणि दुसरे ‘एंडोजेनस ओपिओईड्स’ (Endogenous Opiolds) शरीरातील नैसर्गिक वेदनाशामक, जे एकटेपणाच्या मानसिक वेदना कमी करतात. सर्व जगाला मोहित करणारे ‘पंच’चे त्या अस्वलाशी असलेले नाते हे केवळ ‘क्यूट’ असण्यापुरते मर्यादित नाही; ते त्याची जगण्यासाठी आखलेली एक वैज्ञानिक रणनीती होती. मऊपणा ही चैनीची गोष्ट नाही, तर ती जगण्यासाठीची एक मूलभूत जैविक गरज आहे, हेच ‘पंच-कुन’ने जगाला सिद्ध करून दाखवले.
 
 
- डॉ. शुभांगी पारकर
 
 
 
Powered By Sangraha 9.0