चोर सोडून संन्याशावर कारवाई!

24 Feb 2026 10:50:30
MUDA Scam
 
‘लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण’ याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काँग्रेस पक्ष होय! अलीकडे संविधान आणि अधिकार यांवरून ज्ञानामृत पाजणार्‍या काँग्रेसच्या कर्नाटकमधील सरकारने माहिती अधिकार कार्यकर्त्याचा छळवाद मांडल्याची घटना उघडकीस आली आहे. काँग्रेसच्या या छळवादी वृत्तीचा घेतलेला आढावा...
 
कर्नाटकमधील काँग्रेसचे सरकार आपल्याला विरोध करणार्‍या किंवा भ्रष्टाचार उघड करणार्‍या व्यक्तीच्या विरुद्ध दडपशाहीचा अवलंब करीत असल्याचे दिसून येत आहे. ‘माहितीच्या अधिकारा’चा वापर करून सरकारमधील व्यक्तींचा गैरव्यवहार बाहेर काढणारे स्नेहमयी कृष्णा या नावाच्या कार्यकर्त्यावर, सिद्धरामय्या सरकारने कारवाई केली आहे. म्हैसूरनगर विकास प्राधिकरण म्हणजे ‘मुदा’तील भ्रष्टाचार बाहेर काढल्याबद्दल, कृष्णा यांचा आवाज बंद करण्याची कृती कर्नाटक सरकारने केली आहे. न्यायाविरुद्ध लढत असणार्‍यांवर कारवाई करून पोलीस आपल्या पदाचा गैरवापर करीत असल्याचा आरोपही, विरोधी नेते आर. अशोक यांनी केला. कर्नाटक सरकारकडून जी कारवाई केली जात आहे, ती पाहता राज्यात आणीबाणीसदृश्य स्थिती असल्याचा आरोपही आर. अशोक यांनी केला.
 
माहिती अधिकाराचा वापर करणारे कार्यकर्ते स्नेहमयी कृष्णा यांना राज्य सरकारच्या ‘सेंट्रल क्राईम ब्रॅन्च’ने अटक केल्याने, राज्यातील राजकीय वातावरणात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार, विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसी यंत्रणेचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोपही केला. कृष्णा यांना जी अटक करण्यात आली आहे, ती पाहता कुप्रशासनाने अगदी टोक गाठल्याचेच दिसून येते. सरकारकडून कर्नाटकमध्ये आणीबाणीसारखे वातावरण तयार केले जात आहे, असा आरोप विरोधी नेते आर. अशोक यांनी केला आहे. कृष्णा हे ‘मुदा’ प्रकरणातील कथित अनियमिततेवर सातत्याने प्रकाश टाकत होते. ‘मुदा’ प्रकरणात त्यांनी दीर्घकाळ लढा दिला होता. या मुद्द्यावरून आम्हीही पदयात्रा काढली होती; पण सरकारला हे सर्व सहन झाले नाही. त्यामुळेच न्यायासाठी संघर्ष करीत असलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली, असा आरोप आर. अशोक यांनी केला. कर्नाटक सरकारने गांधीजींची तत्त्वे पायदळी तुडविली आहेत आणि जे आवाज उठवितात, त्यांना गप्प केले जात आहे. न्यायाचाच गळा घोटण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे आवाज उठवितात, त्यांच्यावर कारवाई केल्याने विरोधकांचा आवाज बंद होणार नाही. आमची ही लढाई आम्ही सुरूच ठेवू, असेही अशोक यांनी म्हटले आहे.
 
‘मुदा’चे माजी आयुक्त डी. बी . नटेश यांनी केलेल्या तक्रारीवरून, कृष्णा यांना अटक करण्यात आली. कृष्णा यांनी नटेश यांच्याविरुद्ध अत्यंत गंभीर आरोप केले होते. आपल्याला बढती मिळावी म्हणून नटेश यांनी, कर्नाटक राज्याच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांना १.६० कोटी रुपये दिल्याचा दावा कृष्णा यांनी केला. हा आरोप नटेश यांनी फेटाळून लावला असून, कृष्णा खोटीनाटी माहिती समाजमाध्यमांवर पसरवून आपली बदनामी करीत आहेत, अशी तक्रार नटेश यांनी बंगळुरू पोलीस आयुक्त सीमांथ कुमार सिंह यांच्याकडे केली. त्या तक्रारीच्या आधारे कृष्ण यांच्यावर कारवाई करण्यात आली. कृष्णा यांना ‘सायबर क्राईम’ शाखेत नेऊन, त्यांच्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. कृष्णा यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचे पडसाद कर्नाटकात उमटले आहेत. कर्नाटकातील काँग्रेस सरकार कृष्णा यांच्यावर कारवाई करते की, कृष्णा यांनाच सुळावर चढवते ते येत्याकाळात दिसून येईल. कर्नाटक सरकारचा हा प्रकार म्हणजे ‘चोर सोडून संन्याशावर कारवाई’ करण्यासारखाच आहे.
 
केरळ विद्यापीठात ‘अभाविप’ची सरशी
 
केरळमधील डाव्या विद्यार्थी संघटनांचा प्रभाव असलेल्या ‘सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ केरळ’मध्ये, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने इतिहास घडविला आहे. या विद्यापीठात आतापर्यंत डाव्या संघटनांचे प्राबल्य होते; पण ‘अभाविप’ने आता संयुक्त सचिव आणि कार्यकारी सदस्य या जागा जिंकल्या आहेत. या पदांवर के. जे. अपर्णा आणि विकास कुमार नायक हे विजयी झाले आहेत. हा निकाल पाहता, ‘अभाविप’च्या विद्यार्थीहिताच्या कार्यक्रमास वाढता प्रतिसाद मिळत असल्याचेही दिसून येत आहे. या विद्यापीठात विद्यार्थी संघटनेची निवडणूक गेल्या दि. २० फेब्रुवारीस झाली. हा विजय म्हणजे सदर विद्यापीठातील राजकारणाचा ‘टर्निंग पाईंट’ असल्याचीच चर्चा आहे. या विद्यापीठाच्या राजकारणात आतापर्यंत ‘एसएफआय’ या साम्यवादी विद्यार्थी संघटनेचा दबदबा होता; पण हा निकाल म्हणजे डाव्या विद्यार्थी संघटनेबद्दलच्या असंतोषाचे द्योतक मानले जात आहे. विद्यापीठ परिसरातील संघर्षाच्या राजकारणापासून फारकत घेत विद्यार्थी कल्याण, विधायक कार्य, शैक्षणिक विकास यांच्या बाजूने दिलेला हा कौल असल्याचे म्हटले जाते. दिल्ली विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ, पंजाब विद्यापीठ आणि आता केरळ विद्यापीठात विजय मिळवल्याने, ‘राष्ट्र प्रथम’ या विचारास अधिक गती मिळाली आहे. ‘अभाविप’चे राष्ट्रीय सचिव श्रावण बी. राज यांनी केरळ विद्यापीठात मिळालेला हा विजय ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न योग्यप्रकारे मांडण्यात ‘एसएफआय’प्रणीत विद्यार्थी संघटनेला अपयश आल्याचेही राज यांनी अधोरेखित केले. ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार घेऊन वाटचाल करीत असलेल्या ‘अभाविप’ या संघटनेने, ‘साम्यवाद्यांचा बालेकिल्ला’ म्हणून ओळखल्या जात असलेल्या केरळमध्ये आपले पाय भक्कम रोवण्यास प्रारंभ केला आहे, हाच या निवडणुकीचा अन्वयार्थ.
 
आंध्र : ‘संपूर्ण वन्दे मातरम्’ला विरोध
 
एकीकडे काही मुस्लीम संघटनांकडून ‘संपूर्ण वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीतास विरोध होता असल्याचे दिसून येत असतानाच, आता आंध्र प्रदेशातील एका प्रमुख ख्रिस्ती संघटनेनेही हे राष्ट्रीय गीत पूर्ण गाण्यास विरोध केला आहे. ‘आंध्र प्रदेश ख्रिश्चन लीडर्स फोरम’ असे या संघटनेचे नाव आहे. ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताची सहा कडवी म्हणण्यास त्या संघटनेने आक्षेप घेतला आहे. हे गीत पूर्ण म्हणण्यापासून सवलत देण्यात यावी आणि पुन्हा या गीताची दोनच कडवी म्हणण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी या फोरमने केली आहे. एक पत्रकार परिषद घेऊन या संघटनेचे अध्यक्ष ऑलिवर रायी यांनी, केंद्र सरकारने या राष्ट्रीय गीतासंदर्भात जो आदेश काढला आहे, त्यामुळे ख्रिस्ती समाजाच्या भावना आणि श्रद्धा दुखवतात असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने जो आदेश काढला आहे, त्याचा जगातील ख्रिस्ती समाज निषेध करीत असल्याचेही त्यांनी म्हटले. ज्या फोरमने ‘वन्दे मातरम्’ संपूर्ण गाण्यास विरोध केला, तो फोरम आंध्र प्रदेशातील चर्चेस, चर्चचे नेते, आर्चबिशप आदींची शिखर संस्था आहे. आता एका राज्यातील ख्रिस्ती संघटनेने विरोध केला असून, जगातील ख्रिस्ती समाज या निर्णयाचा निषेध करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हे लक्षात घेता, त्यामुळे विरोधाचे वारे कसे वाहत आहेत आणि पुढे कोणत्या दिशेने वाहतील, त्याची कल्पना यावी.
 
फ्रान्समध्ये स्वामीनारायण मंदिराची उभारणी
 
भारत आणि फ्रान्स यांच्यातील सांस्कृतिक संबंध आणखी दृढ करणारी एक भव्य वास्तू, राजधानी पॅरिसमध्ये उभारली जात आहे. ही वास्तू म्हणजे भव्य असे स्वामीनारायण मंदिर होय. या मंदिराच्या उभारणीसाठी अत्यंत कलाकुसर करून घडविलेले दगड, भारतातून फ्रान्समध्ये आणण्यात आले आहेत. पॅरिसमध्ये प्रथमच अशाप्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर उभारले जात असून, हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण सहकार्याचे प्रतिनिधित्व करते. या मंदिरासाठीचे दगड भारतामध्ये घडविण्यात आले आणि फ्रेंच तंत्रज्ञांकडून ते बसविले जात आहेत. वास्तुरचनेच्या क्षेत्रातील दोन महान परंपरा या मंदिरउभारणीच्या निमित्ताने एकत्र आल्या आहेत, असे फ्रान्समधील भारतीय राजदूत संजीव कुमार सिंगला यांनी म्हटले आहे. पॅरिस शहरालगत हे मंदिर उभारण्यात येत आहे. हिंदू-संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार करण्यामध्ये ‘स्वामीनारायण संप्रदाया’चे योगदान खूप मोठे आहे, हे यावरून लक्षात येते.
 
Powered By Sangraha 9.0