डिजिटल अरेस्ट हा निव्वळ खोटेपणा, कुणीही बळी पडू नका; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

24 Feb 2026 15:47:49
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) डिजिटल अरेस्ट हा निव्वळ खोटेपणा असून कुणालाही तसा फोन आल्यास त्यावर कधीही विश्वास ठेवू नका आणि १९३० वर तक्रार करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सभागृहातून राज्यातील जनतेला केले. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, आ. अबू आझमी यांनी डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाईन फसवणुकीद्वारे लूट होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर राज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला आवाहन केले.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या सभागृहाच्या माध्यमातून इथल्या सदस्यांना आणि राज्यातील सर्व नागरिकांना सांगतो की, डिजिटल अरेस्ट असा कुठला प्रकारच नाही. कायद्यात कुणालाही डिजिटली अटक करता येत नाही. त्यामुळे आपल्याला कुणी डिजिटल अरेस्टचा फोन केल्यास तो फसवा आहे हे पाहिल्याच क्षणी समजून घ्या. त्यावर कधीही विश्वास ठेवू नका."
 
डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमके काय?
 
"डिजिटल अरेस्ट मध्ये तुम्हाला व्हिडिओ कॉल येतो आणि समोरचा व्यक्ती तुम्हाला कधी सीबीआयचा अधिकारी तर कधी पोलिस अधिकारी असल्याचे सांगतो. तुमच्या घरी पार्सल आले असून त्यात ड्रग्स आढळले आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करतो, असे तो सांगतो आणि मग २० लाख, ४० लाख रुपये मागतो. सामान्य माणूस घाबरून त्याला पैसे ट्रान्स्फर करतो. यामध्ये मोठमोठ्या अधिकाऱ्यांचीसुद्धा फसवणूक झाली आहे. हे पैसे खात्यात आल्यावर ते पुढे वेगवेगळ्या खात्यांमध्ये जातात आणि असे करत ते पैसे कुठल्यातरी विदेशातील खात्यात जातात. अनेक प्रकरणांमध्ये हे संपूर्ण ऑपरेशन विदेशातून होते," असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
हेही वाचा : BMC Corporators : स्वीकृत नगरसेवकांची नावे ठरली... कोणा-कोणाची नावे पुढे?
 
१९३० क्रमांकावर तक्रार करा
 
"परंतू, डिजिटल अरेस्ट करता येत नाही. कुणालाही यासंबंधी कॉल आल्यास तो फसवा आहे हे समजा आणि त्याचक्षणी १९३० या क्रमांकावर कॉल करा. हा सायबरचा नंबर असून त्यामागे प्रचंड मोठी व्यवस्था उभी आहे. समजा लोकांनी घाबरून पैसे दिले असेल आणि लगेच १९३० या क्रमांकावर सांगितले तर गोल्डन अवरमध्ये तत्काळ हे पैसे थांबवू शकतो, अशी आपल्याकडे व्यवस्था आहे. याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे. टीव्हीवर यासंदर्भातील जाहिराती येतात तरीही रोज कुणीतरी यात फसतो. पण डिजिटल अरेस्ट हा निव्वळ खोटेपणा आहे. कुणालाही तसा फोन आल्यास १९३० वर तक्रार करा," असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0