मुंबई: (Army Dog Tyson) भारतीय लष्कराच्या अनेक धाडसी कारवायांमध्ये शूर जवानांसोबत श्वानही खांद्याला खांदा लावून लढताना दिसतात. अशाच एका वीर योद्धा टायसनची सध्या सर्वत्र चर्चा होते आहे. भारतीय लष्कराच्या एका महत्त्वाच्या ऑपरेशनदरम्यान गोळी लागूनही मागे न हटता दहशतवाद्यांविरुद्ध टायसने लढा दिला आहे.
टायसन हा एक एलिट जर्मन शेफर्ड असून तो भारतीय लष्कराच्या 2 पॅरा स्पेशल फोर्सेस च्या K9 युनिटचा भाग आहे. त्याला कर्नाटकातील सीआरपीएफच्या तरलू येथे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमधील डोडा–किश्तवाड पट्ट्यातील छत्रू जंगल परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. यानंतर सुरक्षा दलांनी ‘ऑपरेशन त्राशी-1’ सुरू केले. अत्यंत दुर्गम आणि हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीत ही मोहीम राबवण्यात आली होती.
हेही वाचा : सोशल मीडियावर ट्रेंडिंग ‘बेबी पंच’ला अखेर मिळाला मायेचा आधार; व्हिडिओ व्हायरल
या मोहिमेत दहशतवादी लपलेल्या ठिकाणी शिरकाव करताना टायसन हा सर्वात पुढे होता. त्याने दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर पहिला हल्ला चढवला. यानंतर चकमकीदरम्यान टायसनला मात्र गोळी लागली, तरीही जखमी अवस्थेतही तो मागे हटला नाही. या मोहिमेत 2 पॅरा एसएफने जैश -ए- मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मिळालेल्या माहितीनुसार, जवानांनी टायसनला उपचारासाठी एअरलिफ्ट केले असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे.