लँडिंगदरम्यान तेजस फायटर जेटचे 'ब्रेक फेल'! हवाई दलाकडून ३० विमानांच्या उड्डाणाला स्थगिती

23 Feb 2026 13:15:53

Tejas Fighter Jet

मुंबई : (Tejas Fighter Jet Faces Brake Failure)
भारतीय हवाई दलाचे स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान तेजसचा धावपट्टीवर उतरताना ब्रेक फेल झाल्याची घटना घडली आहे. एका महत्त्वाच्या एअरबेसवर लँडिंग करताना झालेल्या या दुर्घटनेमुळे हवाई दलाने खबरदारीचा उपाय म्हणून तेजस विमानांच्या ताफ्यातील सुमारे ३० विमानांचे उड्डाण तात्पुरते थांबवले असून त्यांची तांत्रिक तपासणी सुरू केली आहे.
 
हेही वाचा - Nepal Bus Accident : नेपाळमध्ये भीषण अपघात! प्रवासी बस नदीत कोसळून १९ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये दोन विदेशी नागरिकांचा समावेश

मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रशिक्षण मोहिमेवरून परतत असताना तेजस विमानाला लँडिंगच्या वेळी समस्या आली. प्राथमिक तपासानुसार, विमानाची 'ब्रेक यंत्रणा' निकामी झाल्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरले आणि बाजूच्या खड्ड्यात जाऊन कोसळले. या दुर्घटनेत विमानाच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले असून ते पुन्हा सेवेत येण्याची शक्यता कमी आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच वैमानिकाला सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले.

या घटनेनंतर हवाई दलाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत तांत्रिक तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत तेजस विमानांचे उड्डाण रोखण्यात आले आहे. तेजस विमानाच्या दुबई एअरशो मधील अपघातामध्ये वैमानिकाचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हा अपघात झाला होता. यापूर्वी मार्च २०२४ मध्ये जैसलमेरजवळ तेजस विमानाचा अपघात झाला होता. गेल्या दोन वर्षांतील हा तिसरा मोठा अपघात असल्याने स्वदेशी विमान कार्यक्रमावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Powered By Sangraha 9.0