राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या विचारांतून राष्ट्रचिंतन

23 Feb 2026 11:17:18

भारताला जशी विरश्रीची एक विशाल परंपरा लाभली आहे, तशीच अध्यात्मिक साधनेचीही परंपरा मोठी आहे. ही परंपरा समर्थपणे सांभाळण्याचे कार्य संतांनी केले. महाराष्ट्र तर संतांचीच भूमी. या मातीमध्ये जन्मलेल्या प्रत्येक संतांनी भक्तीबरोबर समाजाच्या उद्धाराचे कार्यही केले. संत गाडगे महाराजांचे नाव इथे अग्रक्रमाने घ्यावे लागेल. संत गाडगे महाराजांचे कार्य, त्यांचा जीवनप्रवास, त्यांच्या ध्येयासक्ती अशा विविध पैलूंनी संत गाडगे महाराजांच्या आजच्या जयंतीनिमित्ताने घेतलेला मागोवा...

लोकशिक्षकातून लोकसेवा करत लोकहृदय परिवर्तनाने लोकमत ढवळून काढणारे राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज, हे संत नामावलीतले एक अग्रणी संत होय. त्यांच्या लोकशिक्षणाच्या विचारांमुळेच आज महाराष्ट्र प्रगतिप्रथावर आहे. ढेबुजी झिंगराजी जाणारेकर ते राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा जीवनप्रवास अत्यंत अलौकिक आहे. गोविंदांच्या भाषेत सांगावयाचे झाले, तर गाडगे महाराजांचे जीवनचरित्र म्हणजे एका धगधगत्या अग्निकुंडाची कर्मकहाणी!
गाडगे महाराज निरक्षर होते. निरक्षरतेतून त्यांनी प्रभावीपणे लोकशिक्षकाची भूमिका साकारली. कीर्तनाच्या प्रभावी माध्यमातून लोकजीवनाचे प्रबोधन करत, लोकशिक्षणाचे ज्ञानामृत देत ,शिक्षण प्रचारकाची चळवळ उभी केली. सामाजिक सुधारणेसाठी हाती छडी घेऊन ‘शिका आणि शिकवा’ हा लोकसंदेश लोकजीवनाला दिला.
गाडगे महाराज विज्ञानवादी होते. अंधश्रद्धेवर त्यांनी आपल्या कीर्तनातून कडाडून हल्ला केला. देवदेवतांच्या समोर होणार्‍या पशुहत्या थांबवल्या; त्यासाठी संघर्ष केला.

अंधश्रद्धेवर लोकमत ढवळून काढले, पशु-पक्षी मुक्या प्राण्यांना अभय दिले, कसायाच्या हाती जाणारे गोधन सोडवले. दुष्काळात शेतकर्‍यांच्या गोधनासाठी चारा छावण्या सुरू केल्या. देशात गोहत्याबंदीची जाहीरपणे हाक देणारे संत गाडगे महाराज, हे पहिले गोसेवक होय. पर्यावरणप्रेमी गाडगे महाराजांनी स्वच्छतेचा महामंत्र समाजजीवनाला दिला. नुसते महामंत्र देऊन ते थांबले नाहीत, तर हाती खराटा, झाडू घेऊन गावेची गावे स्वच्छ केली. ‘स्वच्छता हाच परमेश्वर आहे,’ हे सांगत स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविले. गावातील नदी, नाले, ओढे, पाणवठे, विहिरीदेखील स्वच्छ केल्या. गावातील लोकांना हातात खराटा घेऊन स्वच्छतेच्या लोक अभियानात सहभागी करून घेत, स्वच्छतेची चळवळ उभी केली. ‘झाडे लावा झाडे जगवा,’ असा संदेश त्यांनी दिला.

खराटा, गाडगे, हाती काठी हेच त्यांचे समाज सुधारणेचे शस्त्र होते आणि अंगात रंगीबेरंगी कापडाची ठिगळे असणारा अंगरखा हेच त्यांचे महावस्त्र होते. हृदयाला साद घालणार्‍या सुमधुर वाणीने त्यांनी लोकमनावर गारुड निर्माण केले. गहन तत्त्वाचा गुंता निर्माण न करता, धडे न देता, साध्या-सोप्या बोली भाषेतून लोकांशी संवाद साधाला. कीर्तनात ते रंग भरत असत. राऊळात मंदिरात जमीनदाराच्या वाड्यावर होणारे कीर्तन, त्यांनी मोकळ्या मैदानावर आणले आणि एक नवी कीर्तनाची परंपरा महाराष्ट्रात सुरू केली.

महाराष्ट्रात ५० वर्षे जीवाच्या आकांताने भ्रमंती करत, एक समाजिक परिवर्तनाची चळवळ महाराष्ट्रात सुरू केली. आपल्या कीर्तनातून लोकभावनेला दातृत्वाची साद घातली. त्याच्या हाती असलेल्या गाडग्यातून श्रद्धावतांनी, दानशूरांनी त्यांच्या गाडग्यात लाखो रुपयांचा दानधर्म केला. त्या गाडग्यातील पै आणि पै त्यांनी सत्कारणी लावला. लोकवर्गणीतून लोकसेवेची गाडगे महाराजांनी प्रचंड मोठी श्रृंखला उभी केली. नदीवर सुबक घाट बांधले, गोधनासाठी गोरक्षणे उभी केली, विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा, वसतिगृहे बांधली, छात्रालय, वृद्धाश्रम, महिलाश्रम, अनाथाश्रम, कृष्ठधाम, धर्मार्थ दवाखाने, सदा अन्नछत्रे पाणपोया यांसारखी सेवाकार्येही उभी केली. आज जी सेवाकार्ये सुरू आहेत, त्यांचे प्रेरणास्थान हे गाडगे महाराजच होय.

देव देवळात नाही, तर तो दरिद्र नारायणाच्या रूपाने अवतरला आहे. ‘जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ सांगत आळंदी, देहू, नाशिक, त्रंबकेश्वर, पंढरपूर, मूर्तिजापूर, पुणे-मुंबई या तीर्थक्षेत्री, राजे-राजवाड्यांनाही लाजवेल अशा प्रचंड मोठमोठ्या धर्मशाळा बांधल्या आणि यात्रेकरूंसाठी नवी आश्रयस्थानेही निर्माण केली. पंढरपूर येथे संत चोखामेळा धर्मशाळा बांधली आणि वास्तुरूपाने संत चोखामेळाचे भव्य स्मारकही उभे करून, ही धर्मशाळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हाती रीतसरपणे कागदपत्रे करून सुपूर्द केली. गाडगे महाराज हे सेवाव्रती जीवनयात्री होते. त्यांनी सामुदायिक विवाह समारंभ घडवून आणले. नवदाम्पत्यांना संसार उपयोगी साहित्य भेट देऊन त्यांचे संसार उभे केले. दारूबंदीच्या विरोधात आणि संघर्षात आयुष्य सत्कारणी लावले. दारूच्या व्यसनाने होरपळणारे संसार पुन्हा उभे केले. सावकारी पाशात अडकलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनी सोडविण्यासाठी, सावकारशाहीच्या विरोधातही त्यांनी संघर्ष केला. महाराष्ट्र शासनाने दारूबंदी, व्यसनमुक्तीसाठी संत गाडगे महाराजांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार देऊन सन्मान केला. एक मोठी डॉज कंपनीची गाडीही त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खैर यांच्या हस्ते भेट देण्यात आली.

राष्ट्रसंत गाडगे महाराज लोकजीवनाच्या विकासासाठी क्रियाशील असा प्रवाही विचार होता. त्यांचा जन्म महाशिवरात्रीच्या दिवशी दि. २३ फेब्रुवारी १८७६ रोजी, अमरावती जिल्ह्यात शेंडगावी एका परीट कुटुंबात झाला. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या गीतासारानुसार ते आपले उभे ८० वर्षांचे आयुष्य निष्काम कर्मयोगातच जगले. दि. २० डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महानिर्वाण झाले. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, आचार्य प्र. के. अत्रे, डॉ. श्रीराम लागू, ग. दि. माडगूळकर, मुख्यमंत्री बाळासाहेब खैर, डॉ. अशोक कामत, अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे यांसारख्या ज्येष्ठ विचारवंतांनी, श्री संत गाडगे महाराजांच्या जीवनकार्याचे मूल्यमापन केले आहे. आज राष्ट्रसंत गाडगे महाराजांची १५०वी जयंती साजरी करत असताना, त्यांच्या विचारांचे राष्ट्रचिंतन होण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यांच्या सेवाकार्याची श्रृंखला पुन्हा एकदा गतिशील होण्याची गरज आहे, हीच त्यांना आदरांजली ठरेल.


- नंदकुमार राऊत
(लेखक क्षत्रिय मराठा परीट मंडळ ट्रस्ट, पुणे या संस्थेच्या कार्याध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.)

Powered By Sangraha 9.0