रडगाणे म्हटले की पाकिस्तान नजरेसमोर येतो. राजकारण ते क्रीडा कोणत्याही क्षेत्रात आज पाकिस्तानची कामगिरी सर्वसाधारणदेखील राहिलेली नाही. प्रत्येक क्षेत्रात अपयश त्यांच्या पदरी पडताना दिसते आहे. क्रीडा क्षेत्रात पाकिस्तानच्या सुमार कामगिरीचा घेतलेला आढावा...
आपला शेजारी सदान्कदा भारताचा अवमान कसा करता येईल, हेच शोधतच असतो आणि त्याला अधूनमधून वठणीवर आणायला लागते. हा आपला शेजारी क्रीडेचाही अवमान करायला मागे-पुढे बघत नाही. असं झालं की मग क्रीडाविश्वातील अनेक राष्ट्रं त्याच्या डोळ्यांत सुरमा घालतात, तर कधीकधी त्यांना घरचा आहेर मिळतो. आता नवीन वर्षातील पहिल्या एक-दोन महिन्यांतच पाकिस्तानने, अशा घटना घडवलेल्या आपल्याला दिसतील.
२० षटकी नाट्य : सध्या २० षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे भारत आणि श्रीलंका या राष्ट्रांमध्ये संयुक्तपणे आयोजन करण्यात आले आहे. त्यात बांगलादेश व पाकिस्तान यांनी सहभागी न होण्याचा निर्णय आधी घेतला होता. सुरुवातीला पाकिस्तान सरकारने भारताविरुद्ध सामना न खेळण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंध ताणले गेले. जर दंडात्मक कारवाई झाल्यास पाकिस्तानलाच आर्थिक फटका बसण्याची शक्यता होती. ते अर्थकारण पाकिस्तानला परवडणारं नसल्याने, माघार घेतली. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला ‘आयपीएल’मधून वगळल्यानंतर, बांगलादेश क्रिकेट बोर्ड अर्थात ’बीसीबी’ने सुरक्षेच्या कारणास्तव आपला संघ भारतात पाठवण्यास नकार दिला होता. या ताठर भूमिकेचा फटका बांगलादेशला बसला. ‘बीसीबी’ने आपले सामने श्रीलंकेत हलवावेत किंवा आयर्लंडसोबतचा गट बदलावा, अशी मागणी केली. मात्र, ‘आयसीसी’ने गट बदलण्याची मागणी स्पष्टपणे फेटाळली. लगेचच ‘आयसीसी’सोबत चर्चा झाल्यानंतर, पाकिस्तानने आपला निर्णय मागे घेतला आणि भारताविरुद्ध मैदानात उतरण्याचं ठरवलं.
परत भारताकडून हार : वेळापत्रकानुसार भारत-पाकिस्तान यांच्यातला साखळी सामना खेळला गेला. त्यात भारतीय संघ जिंकलेला आणि आपला संघ पराभूत झालेला बघितल्यावर, पाकिस्तानात पाक समर्थकांनी प्रचंड गदारोळ केला. पाकिस्तानात अनेकांनी संघातील खेळाडूंना लाखोली वाहिली, दूरचित्रवाणी संचं शब्दशः फोडले.
इम्रान खान चर्चेत : क्रिकेटमध्ये या घटना घडत असतानाच, दुसरीकडे राजकीय पातळीवर इम्रान खान प्रकरण चर्चेत होतं. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इम्रान खानने राजकारणात शिरून निवडणूक लढवत, पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून पदभारही स्वीकारला होता. ऑगस्ट २०२३ पासून इम्रान खान तुरुंगात असून, त्याच्यावर ओंजळभर खटले सुरु आहेत. यामध्ये भ्रष्टाचारापासून ते दहशतवादविरोधी आणि राज्य गुप्ततेचेही आरोप आहेत. पाकिस्तानच्या एका न्यायालयाने नुकतीच इम्रान खान आणि त्याची पत्नी बुशरा बीबी यांना, कमी किमतीत चैनीच्या भेटवस्तू खरेदी केल्याच्या भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा सुनावली आहे. सरकारी पदावर असताना मिळालेल्या मौल्यवान वस्तूंचा वैयक्तिक वापर करणे किंवा ती विकणे नियमांच्या विरोधात मानले जाते. अशांचे मूल्यमापन करून, त्या सरकारी मालमत्ता म्हणून नोंदवल्या जातात. आपल्याला आठवत असेल की काही काळापूर्वी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना विविध प्रसंगी मिळालेल्या स्मृतिचिन्हांचा आणि भेटवस्तूंचा लिलाव करुन, त्यातून आलेली रक्कम मोदींनी ‘नमामि गंगे’ प्रकल्पाला दान केली होती.
तब्येतीकडे दुर्लक्ष : ७३ वर्षीय इम्रान खान अनेक महिन्यांपासून तुरुंग प्रशासनाकडे डोळ्यांमध्ये अंधुकपणा असल्याची तक्रार करत होता. ऑक्टोबर २०२५ पर्यंत त्याची दृष्टी सामान्यच होती; परंतु नंतर त्याची उजव्या डोळ्याची दृष्टी अचानक गेली. चौकशीदरम्यान डॉक्टरांना आढळले की, उपचार आणि इंजेक्शन दिल्यानंतरही त्याच्या उजव्या डोळ्यात आता फक्त सुमारे १५ टक्के दृष्टी शिल्लक आहे.
खिलाडूवृत्तीवाला खान : क्रिकेटमधे पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत असताना, इम्रान खान हा खिलाडूवृत्ती जोपासणारा म्हणून प्रसिद्ध होता. भारत आणि पाकिस्तानमधील एका सामन्यात, वकार युनूसच्या गोलंदाजीवर भारताच्या कृष्णमाचारी श्रीकांतला पंचांनी ‘एलबीडब्ल्यू’ घोषित केले. तथापि, श्रीकांतने असे सूचवले की चेंडू बॅटच्या कडेला लागला होता. विनम्र हावभाव करत पाकिस्तानचा कर्णधार इम्रान खान याने श्रीकांतला परत बोलावले. हे क्रीडा भावनेचे एक उत्तम उदाहरण होते.
क्रिकेटपटूंना कळवळा : पाकिस्तानी राजकारणात न पडता इम्रान खानला ओळखणारे जागतिक दर्जातील अनेक क्रिकेटवीरांनी त्याच्याबद्दल आपुलकी दाखवत, एका क्रिकेटपटूबद्दल एक संयुक्त पत्रक काढलं आहे. पाकिस्तानचा माजी पंतप्रधान व माजी क्रिकेट कप्तान इम्रान खानच्या ढासळलेल्या प्रकृतीबद्दल, पाच देशांतील १४ माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला पत्र लिहिले. पत्रानुसार त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना आवाहन केले आहे की, ७३ वर्षीय इम्रान यांना तुरुंगात योग्य उपचार मिळावेत. या पत्रावर सुनील गावस्कर, कपिल देव, ग्रेग चॅपल, बेलिंडा लार्क, मायकेल एथरटन, नासिर हुसेन, इयान चॅपल, ऍलन बॉर्डर, मायकेल ब्रियरली, डेव्हिड गावर, किम ह्यूजेस, लाईव्ह लॉयड, स्टीव्ह वॉ आणि जॉन राईट यांनी स्वाक्षर्या केल्या आहेत. त्या पत्रावर कोणत्याही माजी पाकिस्तानी कप्तानाने स्वाक्षरी केलेली नाही, मात्र गेल्या आठवड्यात वसीम अक्रम, वकार युनूस आणि शाहिद आफ्रिदी यांच्यासह अनेक माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी समाज माध्यमांवर इम्रानसाठी योग्य उपचारांची मागणी केली होती.
खानचे भवितव्य काय : इम्रान खानसारख्या क्रिकेटपटूने पाकिस्तानात सत्ता चालवणं त्याला आजपर्यंत जमलेलं दिसत नाही. पाकिस्तानात लष्करच कारभारावर नियंत्रण ठेवून असल्याने एक खेळाडू पाकिस्तान बदलू शकला नाही, हे आता सिद्ध होत आहे. भारत पाकिस्तानसंबंधी घटनांमध्ये त्याने केलेल्या काही हालचाली, लष्कराने यशस्वी होऊ दिल्या नसल्याच्या घटना जगाने पाहिल्या आहेत. असो, तर ‘पाक हम नही सुधरेंगे’चे गाणं गात राहणार, असं दिसतंय. इम्रान खानला क्रिकेटपटूंनी दिलेल्या पाठिंब्याचं फलित काय असेल, हे कळणे अवघड आहे.
तिकडे हॉकीही : हे इम्रान प्रकरण बघत असताना, तिकडे पाकिस्तानी हॉकीपटूंची कुजबूज ऐकण्यात आली होती. आजचा पाकिस्तान हॉकीचा कप्तान अम्मद शकील बट याने, आपली भांडणं भारतीयांच्या कानांवर पडू नये म्हणून आमचं सगळं अलबेल आहे, असे एका मुलाखतीत भारताला उद्देशून सांगितलं होतं. अम्मद शकील बट याने आपल्याच बोर्डाचे वाभाडे काढले आहेत. ऑस्ट्रेलिया दौर्यादरम्यान, पाकिस्तानी खेळाडूंवर हॉटेलमध्ये चक्क भांडी घासण्याची वेळ आल्याचा धक्कादायक खुलासा त्याने केला. यावरून पाकिस्तानात मोठा गदारोळ माजला असून, हॉकीच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला आहे. तसेच यावर आवाज उठविल्याने बटवरदेखील बंदीची कारवाई करण्यात आली होती.
सात वर्षांनंतर प्रो हॉकी लीगमधे पाकिस्तानला पात्रता मिळणे, ही एक मोठीच उपलब्धी आहे. अम्मद शकील बट त्याच्या एका मुलाखतीत सांगत होता की, आम्ही अर्जेंटिना दौर्याहून परत आल्यावर परिस्थिती ठीक होण्याऐवजी खराब व्हायला लागली, ऑस्ट्रेलिया दौर्याचा विचार करता आमची कथा सुरू होते, ती आमच्या विमानप्रवास आणि आमच्या निवासव्यवस्थेपासून. ज्या विमानाने आमचा प्रवास आखण्यात आला होता, त्यात आम्ही सिडनीत उतरवण्यात आलं होतं. जवळपास १३ ते १५ तास आमच्यावर ऑपेरा स्ट्रीटवर निराश्रितांसारखी भटकायची पाळी आली होती. आमच्या येण्याची कोणी दखल घेतली, ना निवास व्यवस्था होती, ना कोणी आमच्या पोटापाण्याची तजवीज केली. सिडनीनंतर आम्ही ओबाटा येथे गेलो.
संघव्यवस्थापनाकडून आम्हाला कळलं की, हे प्रकरण भारतापर्यंत पोहोचलं आहे. जेव्हा भारताला हे समजल्याचे कळल्यावर मला जाणवलं की, या गोष्टीने माझ्या राष्ट्राची बदनामी होता कामा नये. लगेच मी भारताला समजावून सांगण्यासाठी एक खास व्हिडिओ तयार करून प्रसारित केला. आमची ऑस्ट्रेलियातील परिस्थिती नियंत्रणात आहे; आमच्या संघाला वाईट वर्तणूक मिळत नाहीये, असं त्यात दामटून सांगण्यात आलं. पण वस्तुस्थिती प्रत्यक्षात अशी होती की, भारताला कळवलेली आणि आम्ही प्रत्यक्ष जे अनुभवलं त्यात जमीन-आसमानाचा फरक होता. हॉटेलचे बिल भरण्यात अपयशी ठरल्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये पाकिस्तान संघाच्या खेळाडूंनी रस्त्यावर अनेक तास घालवल्याची घटना लज्जास्पद असल्याचे, एके काळी जगप्रसिद्ध असलेला पाकिस्तान हॉकी दिग्गज हसन सरदार आणि समीउल्लाह यांनी म्हटले आहे. या दोघांनीही राष्ट्रीय संघातील खेळाडूंना ज्या पद्धतीने वागवले गेले, त्यावर संताप व्यक्त केला.
क्रिकेट हॉकीची झाली तुलना : "पंतप्रधानांकडे क्रिकेटसाठी भरपूर वेळ आहे; पण ते पाकिस्तान हॉकी महासंघाचेही प्रमुखदेखील आहेत आणि मी त्यांना हॉकीच्या बाबींमध्येही सुधारणा करण्याची विनंती करेन. जेव्हा अशा गोष्टी घडतील, तेव्हा राष्ट्रीय संघ मैदानावर कसा कामगिरी करेल? कल्पना करा की, खेळाडू आणि साहाय्यक कर्मचारी अव्वल संघांविरुद्धच्या कठीण स्पर्धेत किती निराश झाले असतील,” असे हसन सरदार आणि समीउल्लाह म्हणाले. सरकारने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि संघाला झालेल्या अपमानासाठी कोण जबाबदार आहे, हे शोधून काढावे.
हे नेहमीचेच : सुरुवातीपासूनच हा दौरा सुखद नव्हताच. पाकिस्तान हॉकी संघटनेनं योग्य अर्ज सादर न केल्याने, त्याचे व्हिसा रोखण्यात आले होते. सर्व कागदपत्रे आणि पडताळणी पूर्ण केल्यानंतर आम्ही अखेर दि. ५ फेब्रुवारी रोजी ‘थाई एअरवेज’ने ऑस्ट्रेलियाला उड्डाण केले. विशेष म्हणजे, एका सूत्राने सांगितले की, ‘पाकिस्तान क्रीडा मंडळा’ने हॉटेलला थेट पैसे द्यायचे होते आणि संघासाठी प्रवास वेळापत्रक आणि तिकिटांची व्यवस्था करायची होती. आम्हाला ‘पीएसबी’कडून या गोष्टींसाठी निधी मिळाला नव्हता आणि मुख्य प्रशिक्षक ताहिर जमान यांनी आमच्याशी संपर्क साधला, तेव्हा आमच्याकडे पुरेसा निधी नव्हता, तो म्हणाला. गेल्या वर्षी पाकिस्तान हॉकी मंडळाने सुमारे दहा हजार अमेरिकन डॉलर्सची हॉटेल निवासासाठी थकबाकी असलेले बिल मंजूर करेपर्यंत, मलेशियातील अझलन शाह स्पर्धेतला पाकिस्तान संघाचा सहभाग निश्चित झाला नव्हता.
राजीनामा सत्र : अलीकडच्या ऑस्ट्रेलिया दौर्यातील वादानंतर तारिक बुगती यांनी पाकिस्तान हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने, गुरुवारी पाकिस्तान पुरुषांच्या राष्ट्रीय हॉकी संघातील संकट अधिकच वाढले. पद सोडण्यापूर्वी त्यांनी संघावर टीका केल्याबद्दल, कर्णधार अम्माद शकील बटवर दोन वर्षांची बंदी घातली होती. तथापि लगेचच पाकिस्तान सरकारने शुक्रवारी राष्ट्रीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार अम्मद शकील बट याची दोन वर्षांची बंदी रद्द केली आणि ‘पाकिस्तान हॉकी फेडरेशन’चा निर्णय बेकायदेशीर आणि असंविधानिक असल्याचे जाहीर केले.
बट याने संघाच्या अलीकडच्या ऑस्ट्रेलिया दौर्यात झालेल्या गैरव्यवस्थापनाबद्दल फेडरेशनवर जाहीर टीका केली होती. ‘पीएचएफ’चे मुख्य संरक्षक, पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी बुगटी यांचा राजीनामा स्वीकारला आणि मुहुयद्दीन अहमद वाणी यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. वाणी यांनी तातडीने बटचे निलंबन रद्द केले. पाकिस्तानने प्रो लीगमध्ये नेदरलँड्स, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीकडून आठही सामने गमावले आहेत आणि नऊ संघांच्या क्रमवारीत शेवटच्या स्थानावर आहे. अंतिम विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी पाकिस्तान हॉकी संघ आता चार महिन्यांत इजिप्तला जाणार आहे. तर ज्या देशाकडून अपेक्षा ठेवणे गैर असल्याने, अशा शेजार्याकडून होत असलेला क्रीडेचा अवमान बघत राहण्याव्यतीरिक्त इतरांकडे काहीच उरत नाही, एवढेच फक्त जागतिक सत्य आहे.
- श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख,पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)