मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने तिसऱ्या टी-२० सामन्यात ८२ धावांची दमदार खेळी करत भारताला शानदार विजय मिळवून दिला. तिच्या या खेळीचं सर्वत्र कौतुक होत असतानाच सामन्यानंतर शेअर केलेली तिची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेचा विषय ठरली आहे.
स्मृतीने इन्टाग्राम स्टोरीमध्ये काय लिहिलंय?
खेळ कधीच तुमच्या भावनेची कदर करत नाही. हे एक कटू सत्य आहे. तुम्ही थकला आहात की नाही याची त्याला पर्वा नाही. तुम्ही थकलेले असाल, नुकतेच जिंकला असाल, सर्वोत्तम खेळाडू असाल किंवा अगदी नवखे असला तरीही... खेळाला यापैकी कशाचीच फिकीर नसते. तुम्ही किती आत्मविश्वासात आहात किंवा किती नर्वस आहात, यानेही काही फरक पडत नाही, असं स्मृती मानधनाने इन्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं आहे.
खेळाला फक्त एकाच गोष्टीशी देणंघेणं असतं. ती म्हणजे तुम्ही मैदानात कसे खेळता. त्या दिवशी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी तुम्ही कोणत्या जिद्दीने उतरता, हेच महत्त्वाचे ठरते. जर तुम्ही खेळाला पूर्ण आदर देऊन तुमचे सर्वस्व अर्पण केले, तरच तुम्हाला यश आणि संधी मिळू शकते. ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा अनुभवण्याची मिळणारी संधी ही खरोखरच एक अप्रतिम भावना आहे. मला वाटतं ही एक भयानक भावना आहे, असं स्मृती मानधना म्हणाली.
गेल्या काही महिन्यांत वैयक्तिक आयुष्यातील आव्हानांनंतर स्मृतीने पुन्हा जोरदार पुनरागमन केले आहे. कठीण प्रसंगातून सावरत तिने मैदानात आपली चमक कायम ठेवली. अलीकडेच तिने महिला प्रीमियर लीगमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली होती. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शानदार खेळीनंतर चाहत्यांमध्ये तिच्याबद्दल आणखी आदर आणि प्रेम वाढले आहे.
