‘आर्य आक्रमणा’च्या सिद्धांतावरून वर्षानुवर्षे भारतीयांचा बुद्धिभेद करण्याचे सर्वंकष प्रयत्न झाले आणि दुर्दैवाने ते यशस्वीही ठरले. आर्य बाहेरून आले आणि त्यांनी भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित केले, हे संशोधनापासून शिक्षणापर्यंत अगदी पद्धतशीरपणे भारतीयांच्या मनात पेरण्यात आले. परंतु, कालांतराने केलेल्या संशोधनाअंती हा सिद्धांत केवळ एक थोतांड असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच विषयाला धरून श्रीकांत तलगेरींनी लिहिलेला 'The aryan invasion theory: a repreaisal' हा ग्रंथ १९९३ साली ‘आदित्य प्रकाशन, नवी दिल्ली’ने प्रसिद्ध केला होता. आता सुमारे ३२ वर्षांनंतर प्रा. म. मो. पेंडसे यांनी केलेला मराठी अनुवाद ‘सा. विवेक’ने प्रसिद्ध केला आहे. एका बहुचर्चित विषयाची सटीक आणि दोन्ही विचारधारांची माहिती, तीन दशके जुनी असली, तरी मराठी वाचकांना करून घेण्याची संधी या ग्रंथाद्वारे मिळाली आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकाविषयी...
आर्यांनी भारतावर आक्रमण करून स्थानिक जनसमूहांवर विजय मिळवला, आपले वर्चस्व प्रस्थापित केले, इथे पूर्वीपासून वस्ती करून असलेल्या लोकांवर आपली संस्कृती लादली, हे गृहीतक भारतातील इतिहास शिक्षणक्रमाचा अविभाज्य भाग म्हणून गेली दीडशे वर्षे शिकवले जात आहे. इ. स. १९२० नंतर मोहेंजोदारो आणि हडप्पा येथे झालेल्या उत्खननाने त्यावर जणू शिक्कामोर्तब झाले. नष्ट झालेली सिंधू-संस्कृती, शहरे आर्यांनी नष्ट केली, असे ठरविण्यात आले. त्या गृहीताची इतकी घट्ट पकड इथल्या आणि परदेशातील अभ्यासकांवर बसली की, त्याला सिद्धांताचे महत्त्व प्राप्त झाले. आज सर्वसाधारण सुशिक्षित भारतीय नागरिकाच्या मनावर हेच बिंबलेले आहे की, आर्य हे पश्चिमेकडून आलेले आक्रमक होते. त्याला धरून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक लिखाण होत राहिले. त्यातून या देशातील विविध जनसमूहांमध्ये यशस्वीरीत्या सामाजिक फूट पाडली गेल्याचे चित्र गेल्या शतकभरात दृढ झालेले आपण पाहतो. त्याचे पडसाद आजही आपल्याला तामिळनाडूच्या राजकारणात पाहायला मिळतात. आजकाल हिंदू-आर्यांना सनातन संस्कृतीशी जोडून त्याविरोधात संघर्ष उभा करण्याचे राजकारण तेथे चालते आहे.
सिद्धांताचा प्रतिवाद
‘आर्य आक्रमण सिद्धांत’ विशेषकरून इंग्रजी राज्यकर्त्यांनी जगावर, त्यातल्या त्यात भारतीय आणि युरोपातील जनमानसावर यशस्वीपणे थोपवला. त्याला एकप्रकारे पुष्टी बोगाझकोई येथे हजारोंच्या संख्येने मिळालेल्या लिखित मातीच्या मुद्रांनी मिळाली. कारण, त्या मुद्रांवरील मजकुरात वैदिक देवता, इतर संस्कृत नावे आणि संख्यांचा समावेश होता. काही मुद्रांवरील मजकुरानुसार, त्यांचा काळ निश्चितपणे इ.स.पूर्व १३८०च्या दरम्यानचा हा ठरविता आला. त्याला धरून तो जनसमुदाय मजल-दरमजल करत इराणमार्गे इ.स.पूर्व १२००च्या दरम्यान भारतात पोहोचला, असा निष्कर्ष सहज काढता आला. मॅसमुल्लरने अंदाजपंची ठरविलेल्या आर्य आक्रमणाच्या काळाशी तो जुळल्याने त्यावर मोहर बसली. त्याचा अमिट प्रभाव आजही अनेक बिनीच्या प्राच्यविद्या संशोधकांवर असून, माझ्या मते, ही संशोधक मंडळी बोगाझकोई मातीच्या मुद्रांच्या दलदलीत फसून बसली आहेत. ‘आर्य आक्रमण’ प्रतिपादनाचे सविस्तर संशोधन करून प्रतिवाद करणारे पाच ग्रंथ नारायणराव भवानराव पावगी यांनी १८९०च्या दशकात प्रसिद्ध केले होते. याच्याही पुढे जाऊन पश्चिमेतील अनेक प्राचीन साम्राज्ये भारतीयांनी प्रस्थापित केली होती, असे त्यांनी नमूद होते.
‘आर्य आक्रमण सिद्धांता’चा ठोसपणे पुरस्कार लोकमान्य टिळकांनी केला. त्याचा प्रतिवाद करणारे ग्रंथ नंतरच्या काळात अनेक संशोधकांनी लिहिले. जसे-जसे नवे संशोधन होत गेले, तसे-तसे ‘आर्य आक्रमण सिद्धांता’च्या विरोधातील पुरावे पुढे येऊ लागले आहेत. त्याच विषयाला धरून श्रीकांत तलगेरींनी लिहिलेला 'The aryan invasion theory: a repreaisal' हा ग्रंथ (पृष्ठे ३७३) १९९३ साली आदित्य प्रकाशन, नवी दिल्लीने प्रसिद्ध केला होता. आता सुमारे ३२ वर्षांनंतर प्रा. म. मो. पेंडसे यांनी केलेला मराठी अनुवाद ‘सा. विवेक’ने प्रसिद्ध केला आहे. एका बहुचर्चित विषयाची सटीक आणि दोन्ही विचारधारांची माहिती, तीन दशके जुनी असली, तरी मराठी वाचकांना करून घेण्याची संधी या ग्रंथाद्वारे मिळेल.
प्रस्तुत ग्रंथात विशेष भर भाषाशास्त्रीय विश्लेषणावर आहे. संस्कृत, इराणी, ग्रीक आणि लॅटिन भाषांमधील शब्दसाम्य लक्षात आल्यावर साहजिकच मूळ भाषा कोणती असावी आणि तिचे मूळ ठिकाण कोणते असावे, असा प्रश्न समोर येणे साहजिकच होते. त्याचे उत्तर शोधताना मात्र ब्रिटिश संशोधकांनी युरोपीय-संस्कृती केंद्रस्थानी ठेवून, या दोन्ही प्रश्नांचे उत्तर शोधले नाही, तर तयार केले. ज्या ब्रिटिशांना १८व्या शतकात डॉ. सॅम्युअल जॉन्सनने इंग्रजी शब्दकोश तयार करेपर्यंत शब्दांचे स्पेलिंग एकसारखे असावे, याची अक्कल नव्हती; ते ज्या भारतीयांनी हजारो वर्षांपूर्वी र्हस्व, दीर्घ, अनुस्वार, विसर्ग इ. उच्चारांना धरून संस्कृत व्याकरणाची बांधणी केली, बिनीचे व्याकरणकार दिले, त्यांना हे उपटसुंभ संस्कृत भाषा मूळ शिकवू लागले; त्याने सर्व घोटाळा केला. त्यांनी प्राथमिक Indo-European root language - भारोपीय’ मूळ असलेल्या भाषेची संकल्पना मांडली. ही भाषा साहजिकच युरोपच्या आसपासच्या प्रदेशात निर्माण झाली, हेही ठोस पुरावे उपलब्ध नसताना ठरवले. त्यातून पुढे जाऊन आर्य स्थलांतर आणि आक्रमणाचे गृहीतक मांडले गेले. खरेतर संस्कृत भाषा अति प्राचीन काळापासून ज्या प्रदेशात प्रचारात आणि वर्धिष्णू होती, त्या प्रदेशात मूळ असणे अगदी स्वाभाविक होते. पण, त्याच्या उलट असलेल्या दिशेकडून स्थलांतराचे इमले रचले गेले. त्यावर अमाप ग्रंथरचना झाली. आता स्थिती अशी आहे की, सत्य स्वीकारायचे, तर आजवर उभारलेल्या अवैध ठरलेल्या तुलनात्मक भाषिक संशोधनाच्या महालांवर बुलडोझर चालवून ते जमीनदोस्त करावे लागतील.
अपभ्रंश की उद्भ्रंश?
काही वर्षांपूर्वी माझी दोन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भाषाशास्त्रींबरोबर भेट झाली. ते दोघेही अमेरिकेतील प्रख्यात विद्यापीठांत नावाजलेले प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्यातील एक मराठी (माणूस) होते. मी त्यांना एकमेकांशी संबंधित असलेल्या शब्दांच्या तीन जोड्यांच्या भौगोलिक प्रवासाविषयी विचारले. ‘ऋग्वेदा’त इंद्राने वध केलेल्या ‘वृत्र’ या महाभयंकर भुजंगाचा वारंवार उल्लेख येतो. त्या भुजंगाचे पर्यायी नाव ‘अही-दास’ असेही आहे. त्याचा वध करणारा याअर्थी इंद्राला ‘वृत्रघ्न’ असे नाव दिले गेले. या वृत्रघ्नाला पर्यायी म्हणता येईल, असा शब्द पारशी लोकांचा धर्मग्रंथ ‘अवेस्तात वेरेत्रघ्न’ असा आहे. त्याच्या उत्तरेला असलेल्या आर्मेनियात तो ‘वाहग्न’ असा झाला आहे. त्याला समांतर असलेल्या भुजंग दर्शक शब्दांची रूपे ‘अझी दाहक’ आणि ‘अझो दाह’ अशी आहेत. मी त्यांना विचारले होते की, हा शाब्दिक अपभ्रंशाचा प्रवास पूर्वेकडून पश्चिमेकडे का उलट्या दिशेने झाला असावा. त्या दोघांनीही या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले होते. साधारणपणे कठीण उच्चारी शब्दांचे अपभ्रंश सोप्या उच्चारात होतात. ‘क्षेत्र’चे ‘शेत’ (हिंदीत ‘खेत’) होते, ‘शेत’चे ‘क्षेत्र’ असा उद्भ्रंश होत नाही. हे एक व्यवहारातील उदाहरण झाले. तसे ‘वृत्रघ्न’चे ‘वेरेत्रग्न’ आणि ‘वाहग्न’ असे अपभ्रंश होणे साहजिकच ठरते. पण, बोगझकोई मुद्रांच्या दलदलीत फसलेल्या त्या दोघांनी ‘पूर्वेकडून पश्चिमेकडे’ हा पर्याय स्वीकारला, तर आजवर केलेल्या दशकांच्या संशोधनाचा डोलारा एका क्षणात जमीनदोस्त होईल. आर्य आक्रमण मोडीत निघेल, ही भीती त्यांना होती. तेही माझ्यासारख्या नाव नसलेल्या (उपटसुंभा) कडून. तसे पाहता, युरोपनिर्मित ‘भारोपीय’ मूळ भाषा हे थोतांड आहे.
तलगेरींनी या थोतांडाचे अंतरंग उघडे पाडून त्यातील खाचाखोचा समोर आणल्या आहेत. त्यांनी अनेक प्रस्थापित आणि नावाजलेल्या भाषाशास्त्रज्ञांच्या संशोधनातील कच्चे दुवे स्पष्ट केले आहेत. विशेष करून मध्य-पूर्वेतील आणि दक्षिण युरोपातील प्राचीन भाषांमधील प्रचलित शब्द आणि त्यांचे मूळ असू शकणारे संस्कृत अथवा संस्कृतोद्भव शब्द यांचे सविस्तर विवेचन केले आहे. त्यातून असे दिसते की, भाषाशास्त्रीय विवेचनातून आर्यांचे स्थलांतर पूर्वेकडून पश्चिमेकडे झाले असण्याचीच शयता होती. त्याला आधुनिक पुरातत्त्वीय आणि जनुकीय विस्तारावरील संशोधनाचा ठोस आधार मिळतो आहे. या विषयाला धरून दै. ‘मुंबई तरुण भारत’ (दि. ५ नोव्हें. २०२२) मध्ये माझा प्रसिद्ध झालेला लेख, तसेच ‘पुरातत्त्वावर वेदमुद्रा’ या माझ्या पुस्तकातील प्रकरण ‘आर्य आक्रमणाच्या थोतांडाला साम्यवादी मक्केतून सुरुंग’ (नचिकेत प्रकाशन २०२३, पृ ९९-१०६) यात वाचकांना वाचता येईल.
पुराणांमधील वंशावळ्या
पाश्चात्त्य संशोधक आणि त्यांची ‘री’ ओढणार्या भारतीय संशोधकांनी ‘पुराण’ ग्रंथांना विश्वासार्ह नाहीत, असे ठरवून वैचारिक अडगळीत टाकले होते. त्या पुराणांची ऐतिहासिक उपयुक्तता दाखविण्याचे महत्त्वाचे काम तलगेरींच्या पूर्वी ए. डी. पुसाळकर आणि पी. एल. भार्गव यांनी केले. पुराणांमधील वंशावळ्या व्यवस्थित लावून कालदृष्ट्या इतिहासाची बांधणी केली जाऊ शकते, हे त्यांनी सिद्ध केले. तलगेरी त्यांच्या दोन पावले पुढे गेले आहेत. त्यांनी वैदिक राजे आणि मध्य-पूर्वेतील प्राचीन राजे आणि राजवंशांची योग्य सांगड घातली आहे. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य मानता येईल. या विषयाला धरून विस्तृत चर्चा या ग्रंथात आहे. पुराणांमधील राजवंशावळ्या ‘भाकडकथा’ म्हणून दुर्लक्षित करता येणार नाहीत, हे वास्तव या ग्रंथाने ठळकपणे पुढे आणले.
एक महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित होतो. जर सिंधू-संस्कृती आणि वैदिक-संस्कृती एकच होत्या, तर हे स्थलांतर होण्याचे कारण काय होते? त्याचा उलगडा गेल्या दशक-दोन दशकातील संशोधनाने अधिक स्पष्टपणे झाला आहे. साधारण इ.स. पूर्व २०००-१८०० दरम्यान सिंधू नदीखोर्यात अनेकदा मोठ्या प्रमाणावर भूपृष्ठीय (Tectonic ) उत्पात झाले. त्याच्या परिणामी जवळपास सर्व मोठी शहरे आणि गावे सामूहिक स्थलांतर होऊन ओस पडली. सिंधू-संस्कृतीचे लोक चार दिशांना स्थलांतरित झाले. त्यातील जे दोन जनसमूह उत्तरेकडे आणि पश्चिमेकडे स्थलांतरित झाले, त्यांचा मागोवा तुलनात्मक भाषाभ्यासातून (Comparative philology) घेतला गेला. त्या घटनांचा विस्तृत आढावा ‘पुरातत्त्वावर वेदमुद्रा’ यात (पृ.११-२३) घेतला आहे. या स्थलांतरामागची वस्तुस्थिती लक्षात घेतली की, तलगेरींच्या आणि प्रख्यात पुरातत्त्वविद डॉ. बी. बी. लाल यांनी प्रतिपादन केलेल्या आर्यांच्या पश्चिमेकडील स्थलांतरांचा वस्तुनिष्ठ उलगडा होतो.
प्रा. म. मो. पेंडसे यांनी केलेले हे भाषांतर एकदम छान झाले आहे. सामान्य वाचकांना वाचताना मूळ ग्रंथ वाचल्याचे समाधान मिळेल. मात्र, एक तांत्रिक त्रुटी अभ्यासकांना जाणवत राहील. जागोजागी कंसात दिलेल्या संदर्भ ग्रंथांची यादी त्यात देण्याचे राहून गेलेले दिसते. या ग्रंथाच्या पुढील आवृत्तीत संदर्भयादी न चुकता समाविष्ट व्हावी.
पुस्तकाचे नाव : आर्य आक्रमण सिद्धांत आणि भारतीय राष्ट्रवाद
लेखक : श्रीकांत ग. तलगेरी
अनुवादक : प्रा. म. मो. पेंडसे
प्रकाशक : साप्ताहिक विवेक
प्रकाशन : मे २०२५
पृष्ठसंख्या : ३७८
मूल्य : ५०० रु.
(पुस्तकासाठी संपर्क : ९५९४९६१८५८)
- डॉ. प्रमोद पाठक