मुंबई: (Red Soil Stories) कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि ग्रामीण जीवनशैली जगासमोर मांडणाऱ्या ‘रेड सॉईल स्टोरीज’ या लोकप्रिय युट्यूब चॅनेलमुळे ओळख निर्माण करणाऱ्या शिरीष गवस आणि पूजा गवस या जोडप्याची कहाणी महाराष्ट्राने जवळून अनुभवली आहे. मात्र ऑगस्ट २०२५ मध्ये शिरीष गवस यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यांच्या पश्चात पत्नी पूजा आणि चिमुकली श्रीजा असा परिवार आहे. (Red Soil Stories)
शिरीष यांच्या निधनाच्या दुःखातून सावरत असतानाच आता पूजा गवस यांच्यावर आणखी एक मोठे संकट कोसळले आहे. कॅन्सरशी ११ वर्षे झुंज देणाऱ्या त्यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. आयुष्याचा आधारस्तंभ असलेले पितृछत्र हरपल्याने पूजा यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. (Red Soil Stories)
पूजा गवस यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, प्रिय पपा, अखेर तुम्ही सुद्धा सोडून गेलात. आधी श्रीजाने तिचा बाबा गमावला आणि आता तिचे आजोबा. आता कुठे एका वादळातून किनारा गाठण्याचा प्रयत्न सुरू होता आणि नशिबाने दुसरे चक्रीवादळ पुढ्यात आणून ठेवले. (Red Soil Stories)
११ वर्ष तुम्ही कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी झुंज दिलीत. ती सुद्धा न डगमगता न हार मानता. खर सांगू जेव्हा शिरीषच्या आजाराबद्दल पहिल्यांदा कळला तेव्हा सर्वात आधी तुम्हीच माझ्या डोळ्यासमोर आला होतात. वाटलेला तुम्ही इतके वर्ष आजाराशी दोन हात करताय मग शिरीषला सुद्धा काहीच होणार नाही. पण आज सगळेच विचार, सगळे निश्चय हरले. या आजाराच्या कितीतरी जीवघेण्या यातना तुम्ही कसलीच तक्रार न करता सहन केल्या. तुमची आलेल्या परिस्थितीशी लढण्याची ताकद माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहील. माझं विचारांनी दाटलेला मन मोकळं करण्यासाठी रोज संध्याकाळी मी आणि श्रीजा तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचो. पण आता तो मार्ग सुद्धा देवाने कायमचा बंद केला. या सगळ्यासाठी देवा तुझे किती आभार मानू. अजून काय काय लिहून ठेवलयस माझ्या साठी ते एकदाच सांगुनच टाक. तू दुःख देत राह पण ते पेलण्याची ताकद सुध्दा तूच दे. तुमच्या आजारपणात ज्या खंबीरपणे तुम्हाला मम्मीने साथं दिलीये तोच खंबीरपणा घेऊन मी जगायचं ठरवलंय.. काही झालं तरी हार मानायची नाही हे शिकवण तुम्ही दोघांनी दिलीये. जोपर्यंत श्वास घेतोय तोपर्यंत लढत रहायचं. पपा.. जिथे कुठे असाल सुखात राह. कायम पाठीशी राहा. शिरीषशी भेट झाली तर त्याला सांगा आम्ही आमची काळजी घेतोय..तू निश्चिंत रहा..
आम्हाला आशीर्वाद देत राह. तुमच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.