PM Modi on AI Summit Protest : देशाला माहिती आहे की तुम्ही आधीच नग्न आहात; एआय समिटमधील प्रकारावर पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला

22 Feb 2026 16:57:37
PM Modi on AI Summit Protest
 
मेरठ (उत्तर प्रदेश) : ( PM Modi on AI Summit Protest ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआय समिटदरम्यान कपडे उतरवून करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केली. रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी मेरठ येथे आयोजित जाहीर सभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. भारतात जगातील सर्वात मोठी एआय परिषद पार पडली आणि संपूर्ण देश अभिमानाने भरून गेला. मात्र, काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगींनी या जागतिक कार्यक्रमाला घाणेरड्या व नग्न राजकारणाचे व्यासपीठ बनवले, परदेशी पाहुण्यांसमोर काँग्रेसचे नेते कपडे उतरवून आंदोलन करत होते, असेही त्यांनी नमूद केले.
 
काँग्रेसवर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “देशाला माहिती आहे की तुम्ही (काँग्रेस) आधीच नग्न आहात, मग पुन्हा कपडे उतरवण्याची गरज काय होती?” ते पुढे म्हणाले की, देशातील सर्वात जुना पक्ष असूनही काँग्रेस वैचारिकदृष्ट्या दिवाळखोर झाला आहे.
 
पंतप्रधान व्हायचे असेल तर लोकांची मने जिंका
पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस नेत्यांना उद्देशून सांगितले की, पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा असेल तर प्रथम लोकांची मने जिंकावी लागतील. दिल्लीतील घटनेत तृणमूल काँग्रेस (TMC), द्रमुक (DMK) किंवा बसपा सहभागी नव्हते, असे सांगत त्यांनी काँग्रेसवर थेट टीका केली.
 
मेरठ मेट्रो आणि नमो भारत रॅपिड रेल्वेचे उद्घाटन
या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मेरठ मेट्रो आणि नमो भारत रॅपिड रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी शालेय विद्यार्थी आणि डॉक्टरांसोबत रेल्वेप्रवास करत संवाद साधला. यावेळी सुमारे १२,९३० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.
 
दिल्ली ते मेरठ हे ८२.१५ किलोमीटर अंतर रॅपिड रेल्वेमुळे अवघ्या ५५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. ही रेल्वे मेरठमधील मोदीपुरमपासून सुरू होऊन दिल्लीतील सराय काले खांपर्यंत धावणार आहे. मार्गावर १३ स्थानके असून त्यापैकी दोन स्थानके भूमिगत असतील, तर उर्वरित मार्ग उंचावरील असेल. मेरठ मेट्रो बेगमपुल ते मेरठ साउथदरम्यान धावणार असून एकूण ७ स्थानके असतील. मेट्रोचे भाडे २० ते ६० रुपये, तर रॅपिड रेल्वेचे भाडे २० ते २१० रुपयांदरम्यान असेल.
 
काँग्रेस-सपा-बसपावर टीका
पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांनी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बसपाला विषारी राजकारण सोडून विकासाच्या मुद्द्यावर स्पर्धा करण्याचे आवाहन केले होते. मात्र, या पक्षांनी आपली भूमिका बदलली नाही. २०१४ पूर्वी देशातील केवळ पाच शहरांत मेट्रो सेवा होती, तर आज २५ हून अधिक शहरांमध्ये मेट्रो कार्यरत आहे, असे त्यांनी सांगितले.
 
पायाभूत सुविधा आणि आत्मनिर्भर भारत
काँग्रेसच्या काळात पायाभूत सुविधा प्रकल्प घोटाळ्यांत अडकत असत, असा आरोप करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने घोटाळ्यांना आळा घालत देशाला आत्मनिर्भरतेच्या दिशेने नेले. आता एकाच ट्रॅकवर नमो भारत आणि मेट्रो रेल्वे धावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
देश काँग्रेसच्या भूमिकेवर नाराज
पंतप्रधान मोदी यांनी आरोप केला की, काँग्रेस स्वतःच्या देशाची बदनामी करत आहे आणि संपूर्ण देश त्यांच्या भूमिकेवर नाराज आहे. संसदेतही काँग्रेस कामकाज सुरळीत होऊ देत नाही, त्यामुळे इतर विरोधी पक्षांनाही त्याचा फटका बसतो, असे त्यांनी नमूद केले.
 
शेवटी, माध्यमांना उद्देशून त्यांनी विनंती केली की, अशा प्रकारच्या टीकेला “मोदी ने विपक्ष को धो डाला” अशा मथळ्यांनी रंगवू नये. काँग्रेस जे पाप करते, त्याची किंमत इतर विरोधी पक्षांना चुकवावी लागते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0