मुंबई : (pakistan) गाझामध्ये लष्कर तैनात करण्याच्या मुद्यावरून पाकिस्तानमध्ये अंतर्गत संघर्ष चिघळण्याची शक्यता निर्माण झाली असून, पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर यांच्याविरोधात माजी सैनिकांनी उघडपणे आक्रमक भुमिका घेतली आहे. पाकिस्तानातील माजी सैनिकांच्या वेटरन्स ऑफ पाकिस्तान या संघटनेने एक पत्रक प्रसिद्ध करत, मुनीर यांच्या गाझामध्ये सैन्य पाठवण्याच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. तसेच, मुनीर यांच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी सेवेतील सैनिकांना उठाव करण्याचे आवाहनही या पत्रकात करण्यात आले आहे.
इस्रायलच्या बरोबरच्या युद्धात बेचिराख झालेल्या गाझा पट्टीच्या उभारणीसाठी बोर्ड ऑफ पीसचा भाग म्हणून पाकिस्तानी सैन्य पाठवण्याची योजना असल्याचे पाकिस्तानने म्हटले होते. पाकिस्तानी लष्करप्रमुख आणि फिल्ड मार्शल असीम मुनीर यांच्या या योजनेला पाकिस्तानातील माजी सैनिकांना कडाडून विरोध केला आहे. अमेरिकेच्या नेतृत्वामध्ये निर्माण झालेली बोर्ड ऑफ पीस ही आघाडी मुस्लीम विरोधी आहे. या आघाडीमध्ये ज्यु आणि ख्रिस्ती सदस्यांचा भरणा अधिक असून, ते अल- कुद्सवरील कब्जाचे समर्थक आहेत. त्यामुळे त्यांना केलेले कोणतेही सहकार्य हे मुस्लीम उम्माच्या विरोधातच जाणारे ठरणार असल्याचे पाकिस्तानच्या निवृत्त लष्करी अधिकार्यांनी त्यांच्या पत्रकात म्हटले आहे. तसेच, पाकिस्तानी सरकार आणि फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी उम्माशी प्रतारणा केली असून, पाकिस्तानी सैनिक हे त्यांच्या मातृभूमीचे रक्षक आहेत. त्यांच्यावर पाकिस्तान आणि इस्लामच्या रक्षणाची जबाबदारी असल्याचेही या पत्रकात म्हटले आहे.
असीम मुनीर यांच्या गाझा योजनेमुळे पाकिस्तानच्या सैन्यातही अस्वस्थता असून, सैन्यामध्येही या मोहिमेवरुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानी लष्करातील अनेक वरिष्ठ अधिकारी असीम मुनीर यांच्या या निर्णयाच्या विरोधात असून, त्यामुळेच सैन्यातील अशांततेला खतपाणी मिळत आहे. सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरिफ यांनी गाझा पट्टीमध्ये सैन्य पाठवण्यासाठी अतिरिक्त वेळ अमेरिकेकडे मागितला असून, देशांतर्गत अशांततेचा हवाला देत ही सवलत मागितली आहे.
हेही वाचा : PM Modi on AI Summit Protest : देशाला माहिती आहे की तुम्ही आधीच नग्न आहात; एआय समिटमधील प्रकारावर पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
पाकिस्तानी लष्करप्रमुख आणि संरक्षणमंत्री यांच्यात बेबनाव!
पाकिस्तानातील लष्कर आणि सरकार यांच्यातील संबंध जगजाहीर असतानाच, पाकिस्तानी सरंक्षण मंत्र्यांच्या विधानाने सरकार आणि लष्करातील बेबनाव उघड झाला आहे. गाझा पट्टीमध्ये लष्कर पाठवण्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तानचे सरक्षण मंत्री ख्वाजा असीफ यांनी मुनीर माझे बॉस नसून, पंतप्रधान शहबाज शरिफ माझे बॉस असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गाझाच्या मुद्द्यवरून पाकिस्तानी लष्कर आणि सरकार यांच्यात सारेकाही अलबेल नसल्याची चर्चा पाकिस्तानमध्ये आहे.