मुंबई: भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी कारण ठरलं आहे, त्याने त्याची पूर्वपत्नी नताशा स्टॅन्कोविच आणि मुलगा अगस्त्य यांना दिलेली आलिशान भेट. हार्दिकने तब्बल ४ कोटी रुपयांच्या किमतीची लँड रोव्हर डिफेंडर ही लक्झरी एसयूव्ही भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या या भेटीने चाहते मात्र थक्क झाले आहेत. आता सोशल मीडियावर, जुलै २०२४ मध्ये विभक्त होऊनही आणि त्यांच्या नवीन नात्यानंतरही हार्दिक पांड्याच्या कुटुंबाप्रती असलेल्या वचनबद्धतेचे हे प्रतीक असल्याचे म्हटले जात आहे.
लँड रोव्हर मुंबई यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये, नताशा काळ्या रंगाच्या डिफेंडरसोबत पोज देताना दिसते, तर तिच्यासोबत मुलगा अगस्त्यही आहे. वाहन वितरक नवनीत मोटर्सनेही ही डिलिव्हरी विशेष पोस्टद्वारे जाहीर केली.
जुलै २०२४ मध्ये अधिकृतरीत्या विभक्त झाल्यानंतरही हार्दिक आणि नताशा सह-पालकत्वाची जबाबदारी परिपक्वतेने पार पाडताना दिसत आहेत. दोघेही आपल्या वैयक्तिक आयुष्यात पुढे गेले असले तरी, मुलगा अगस्त्य हा दोघांच्याही आयुष्याचा केंद्रबिंदू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
अलीकडेच हार्दिकचे नाव माहिका शर्मासोबत जोडले जात असताना ही भव्य भेट चर्चेत आली आहे. ही कार भेट म्हणून देण्यात आली की कुटुंबासाठी खरेदी करण्यात आली, याबाबत अधिकृत खुलासा झालेला नसला तरी हार्दिकची कुटुंबाप्रती असलेली बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली आहे.