चेन्नईच्या गोल्डन बीचवर दुर्दैवी घटना; महाराष्ट्रातील विद्यार्थिनीचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

22 Feb 2026 19:16:23

चेन्नई: गोल्डन बीच येथे शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेत, समुद्राच्या प्रचंड लाटांमध्ये अडकून महाराष्ट्रातील एका विद्यार्थिनीचा बुडून मृत्यू झाला असून एक विद्यार्थी अजूनही बेपत्ता आहे. हे विद्यार्थी सहलीसाठी चेन्नईत गेलेले असताना, ही दुर्दैवी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विविध भागांतील २६ विद्यार्थ्यांचा गट तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे शैक्षणिक सहलीसाठी गेला होता. शनिवारी दुपारी हा गट समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेला असताना गटातील तीन विद्यार्थी समुद्रात उतरले. त्याचवेळी आलेल्या प्रचंड लाटेने त्यांना खोल पाण्याकडे खेचले.

या दुर्घटनेत भंडारा जिल्ह्यातील मयुरी चौधरी हिचा बुडून मृत्यू झाला. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाने तात्काळ शोधमोहीम सुरू केली. गटातील राज केदारी या विद्यार्थ्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. मात्र जय पाटील हा विद्यार्थी अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. जय पाटीलचे कुटुंबीय चेन्नईत दाखल झाले असून मयुरी चौधरी यांच्या नातेवाईकांनीही चेन्नईकडे रवाना झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची गंभीर दखल घेत तामिळनाडू सरकारशी तात्काळ संपर्क साधला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर माहिती देताना त्यांनी बेपत्ता विद्यार्थ्याच्या शोधासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनानुसार, मदत आणि बचाव कार्यावर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवले जात असून महाराष्ट्र प्रशासन बाधित कुटुंबीयांच्या सातत्याने संपर्कात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मयुरी चौधरी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, संबंधित विद्यार्थी कोणत्या शैक्षणिक संस्थेचे आहेत याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू असून प्रभावित कुटुंबांना आवश्यक ती मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

चेन्नई (तामिळनाडू) येथील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गटासोबत पाण्यात उतरताना दुर्घटना घडली असून या घटनेत महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ तामिळनाडू सरकारशी संपर्क साधला असून ते मदत व बचाव कार्यावर सतत देखरेख ठेवून आहेत.

तामिळनाडू शासनाकडून प्राप्त माहितीनुसार, 26 विद्यार्थ्यांपैकी केवळ 3 विद्यार्थी पाण्यात उतरले होते. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील मयुरी चौधरी यांना दुर्दैवाने आपला जीव गमवावा लागला, तर जय पाटील यांचा शोध अद्याप लागलेला नाही आणि त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. राज केदारी हे सुरक्षितपणे बाहेर आले आहेत.

जय पाटील यांचे नातेवाईक चेन्नई येथे पोहोचले असून मयुरी चौधरी यांचे नातेवाईक नागपूरहून चेन्नईकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुःखद घटनेबद्दल मयुरी चौधरी यांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र शोक व्यक्त करत संवेदना व्यक्त केल्या आहेत.

तसेच, तामिळनाडू सरकारने शोध व बचाव कार्य अधिक गतीने राबवून सर्वतोपरी मदत करावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य प्रशासन संबंधित कुटुंबीयांच्या सतत संपर्कात असून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जात आहे.


Powered By Sangraha 9.0