मुंबई: (Bengali Baba racket) मुंबईतील लोकलमध्ये अवैध पोस्टर लावत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बनावट बंगाली पोस्टर रॅकेटचा मुंबई रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी रे रोड येथील दारुखाना परिसरातील मीरा अली दर्ग्याजवळ सापळा रचत मोहम्मद नजीर अंदारी (बनावट बंगाली बाबा) याला अटक करून त्याच्याकडून १५,००० पोस्टर जप्त केले आहेत. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.(Bengali Baba racket)
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद अंदारी रेल्वेच्या मालमत्तेवर बेकायदेशीरपणे जाहिराती चिकटवून लोकांची दिशाभूल करत होता. वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांच्या विशेष सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आली असून रेल्वे परिसराचे विद्रूपीकरण होण्यापासून संरक्षण आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली प्रवाशांची फसवणूक थांबण्यासाठी कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. (Bengali Baba racket)
रेल्वे सुरक्षा दलाच्या आयटी सेल आणि दक्षता पथकाला बऱ्याच काळापासून तक्रारी येत होत्या की, रेल्वेच्या डब्यांमध्ये 'बंगाली बाबा'च्या नावाने पोस्टर्स चिकटवले जात आहेत, ज्यामध्ये हिप्नोटिजम, प्रेमप्रकरण आणि नोकरीच्या समस्या सोडवण्याचा दावा केला जात आहे. माहिती देणाऱ्यांकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे, पोलिसांनी आरोपीला रंगेहाथ पकडले. (Bengali Baba racket)
कायदेशीर कलमांमध्ये गुन्हा दाखल
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, आरोपीविरुद्ध वडाळा आरपीएफ स्टेशनवर रेल्वे कायद्याच्या कलम १४४ (बेकायदेशीर फेरीवाले), १४५(ब) (उपद्रव), १४७ (अतिक्रमण) आणि १६६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी स्पष्ट केले की, रेल्वे परिसरात कोणताही अनधिकृत जाहिरात उपक्रम हा केवळ कायदेशीर गुन्हा नाही तर रेल्वेच्या प्रतिमेवर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवरही परिणाम करतो.
प्रिंटिंग प्रेस आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू
तपासात असेही समोर आले आहे की, हे रॅकेट फक्त एका व्यक्तीने चालवले नाही तर संपूर्ण टोळी चालवत आहे. पोलिस आता हे पोस्टर्स छापणाऱ्या प्रिंटिंग एजन्सींचा शोध घेत आहेत. पोस्टर्स चिकटवण्यासाठी नियुक्त केलेल्या इतर लोकांमधील आर्थिक व्यवहारांचीही ते बारकाईने चौकशी करत आहेत. अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की या नेटवर्कचे मुंबईबाहेर कनेक्शन असू शकतात.