कृत्रिम प्रज्ञा’ या विषयाला वाहिलेली चौथी जागतिक परिषद (आर्टिफिशियल इंटेलिजन्स इम्पॅट समिट) राजधानी दिल्लीत दि. १६ ते २१ फेब्रुवारीदरम्यान पार पडली. देश-विदेशातून लोकांचा महापूर ‘भारत मंडपम’ मध्ये लोटला. याआधी ही परिषद यूके, दक्षिण कोरिया आणि फ्रान्समध्ये घेण्यात आली होती. ‘कृत्रिम प्रज्ञा’ जागतिक स्तरावर सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवून आणणारे तंत्रज्ञान म्हणून विकसित होत आहे. आज भारत जागतिक स्तरावर चीन, अमेरिकेनंतर हे तंत्रज्ञान वापरणारा तिसर्या क्रमांकाचा (वापरकर्त्यांच्या संख्येधारित) देश झाला आहे; पण हे तंत्रज्ञान विकसित करणारे देश अमेरिका आणि चीन आहेत. त्यात अमेरिकन कंपन्यांनी मोठी आघाडी घेतली आहे. उदा. ‘ओपन एआय’ (चॅट-जीपीटी), ‘अँथ्रोपिक’ (लॉड), ‘गुगल’ (जेमेनाय), ‘मेटा’ (लामा), ‘एस एआय’ (ग्रॉक) इ. चिनी कंपन्यांची नावे ‘बायडू’, ‘अलीबाबा’, ‘टेन्सन्ट’, ‘बाईट डान्स’ अशी आहेत; पण त्यांचे वापरकर्ते केवळ चीनमध्येच अधिक आहेत. त्यामुळे जग त्यांच्याविषयी फारशी चर्चा करत नाही.
भारतीय कंपन्या आणि भारतीय लोक ‘कृत्रिम प्रज्ञे’चा अंगीकार करत आहेतच; पण काही भारतीय कंपन्या स्वतः आपले ‘जनरेटिव्ह एआय’ तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, उदा. ‘सर्वम’. कारण, केवळ काही निवडक कंपन्या आपले ‘लार्ज लँग्वेज मॉडेल’ वापरून जगावर अधिराज्य गाजवू जातील; तर ते सामान्यांपर्यंत पोहोचणे अवघड होऊन जाईल. ‘या तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण होणे आवश्यक आहे,’ असे मत ‘जिओ इंटेलिजन्स’सारख्या भारतीय उद्योगाने पण निर्विवादपणे मांडले आहे. त्यामुळे भारतीय उद्योगांनी या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे, यात ‘अदानी’, ‘टाटा’ हे उद्योगसमूह पण आघाडीवर आहेत.
‘कृत्रिम प्रज्ञा’ या तंत्रज्ञानाला वेगवेगळ्या स्तरांवर विकसित करावे लागते. त्यात ऊर्जा, सेमीकंडक्टर, डेटा सेंटर्स (लाऊड), ‘एआय मॉडेल्स’ आणि अॅप्लिकेशन्सचा समावेश होतो. त्यामुळे या पाचही स्तरांशी संबंधित कंपन्यांचा या परिषदेत सहभाग होता. ऊर्जा क्षेत्राशी निगडित विविध कंपन्यांनी या परिषदेत सहभाग नोंदवला होता, उदा. ‘श्नाइडर इलेट्रिक’सारखी फ्रेंच कंपनी किंवा काही भारतीय ‘सोलर’ व पारंपरिक ऊर्जा कंपन्या- ‘आरईसी’, ‘अदानी’, ‘रिलायन्स’, ‘लार्सन अॅण्ड टुब्रो’ शिवाय, ‘व्हेरोना शेल्टर्स’सारखी फिनिश ‘न्यूलिअर’ कंपनी इ.
सेमीकंडक्टर क्षेत्रातल्या जवळजवळ सगळ्याच नावाजलेल्या कंपन्या इथे होत्या. उदा ‘एनव्हिडिया’, ‘एएमडी’, ‘इंटेल’, ‘क्वालकॉम’, ‘ब्रॉडकॉम’ इ. शिवाय ‘टाटा इलेट्रॉनिस’सारख्या भारतीय कंपनीने कमी वेळात तैवानी कंपनीसोबत बनविलेल्या ‘चिप्स’पण चर्चेत होत्या. सेमीकंडटर कंपन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्या कित्येक ‘स्टार्टअप्स’मध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे त्यांच्या बूथवर १०-१२ ‘स्टार्टअप्स’ना जागा दिलेली होती, ती त्यांची भविष्यातील गुंतवणूक असते. भारतीय ‘सिलिकॉन व्हॅली’तील कंपन्या आज या क्षेत्रात काम करत आहेत. पाहता-पाहता त्यांच्यात या मोठ्या अमेरिकन कंपन्या गुंतवणूक करतील, तर आश्चर्य वाटायला नको.
जागतिक ‘लाऊड’ कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात या परिषदेत सहभाग घेतला होता, त्यांची दालने भव्य होती. शिवाय, त्यांनी भारतात कित्येक वर्षांपासून अर्जित केलेला अनुभव एकसंधपणे मांडला होता, त्यात ‘गुगल’, ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘एडब्ल्यूएस’ यांची नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील. शिवाय, ‘एचपी’, ‘डेल’ यांनी पण आपली ‘सर्व्हर्स’, ‘डेटा सेंटर्स’ बनवण्यासाठी किती आवश्यक आहेत, यादृष्टीने सादरीकरण केले होते. ‘व्हीव्हीडीएन’सारखी भारतात जन्मून या क्षेत्रात मोठी झालेली कंपनी पण यात सहभागी झाली होती.
अॅप्लिकेशन्स बनविणार्या आणि ‘सिस्टम इंटिग्रेशन’ करणार्या तर कैक कंपन्या भारतात आहेतच. या क्षेत्रात भारताचा वरचष्मा आहेच, म्हणून ‘टीसीएस’, ‘एचसीएल’, ‘विप्रो’, ‘इन्फोसिस’ इत्यादींचा सहभाग नजरेत भरत होता. त्यांना आपण ‘आयटी’ कंपन्या म्हणून सामान्यतः ओळखत असलो, तरी त्या ‘एआय’मध्ये महत्त्वाची सर्व्हिसेस देणारी भूमिका निभावतात. जागतिक स्तरावरील या क्षेत्रातील ‘कॅपजेमेनाय’, ‘रेड हॅट’, ‘एटॉस’, ‘एसेंचर’ इ. कंपन्या पण इथे होत्या. भारतात कैक वर्षांपासून कार्यरत असणार्या कंपन्यांना मोठे दालन देण्यात आले होते. शिवाय, कित्येक देशांनी त्यांच्या दूतावासांच्या माध्यमातून आपल्या देशांच्या कंपन्यांचे प्रतिनिधित्व केले होते. उदा. इस्टोनिया, नेदरलॅण्ड्स, फ्रान्स, जर्मनी, इटली, आफ्रिका इ. तर भारतात मोठ्या असलेल्या कित्येक कंपन्या दूतावासाच्या माध्यमातून आल्यामुळे छोट्या बूथस्मधून दिसल्या. उदा. ‘एसएपी’, ‘बॉश’ इ. अवाढव्य अमेरिकन कंपन्यांनी मात्र वर सांगितल्याप्रमाणे स्वतःचे स्वतंत्र मोठे दालन थाटले होते. मात्र, अमेरिकन दूतावास कुठेच दिसला नाही. एकूणच, दूतावासांनी भारतात आपापल्या मोठ्या कंपन्यांना व छोट्या ‘स्टार्टअप्स’ना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे स्वतंत्रपणेदेखील आयोजन केले होते. भारतीय कंपन्यांशी सेतूबंध करून देणे, हा त्यांचा प्राथमिक उद्देश होता; त्यात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, यूके, फिनलंड, स्वीडन, जपान इ. देश आघाडीवर होते.
मुख्यतः शासनाने मात्र खांद्यावर घेतलेली ‘इंडिया एआय इम्पॅट समिट’ची धुरा यशस्वीपणे सांभाळली. शासकीय विभागांनी विविध उपक्रमांच्या द्वारे ‘कृत्रिम प्रज्ञा विकसना’त केलेले संशोधन किती मूलभूत आहे व लोकाभिमुख आहे, याचा यावेळी प्रत्यय आला. उदा. ‘ज्ञानभारतम्’सारखा उपक्रम जिथे ‘स्पीच टू स्पीच’, ‘टेस्ट टू स्पीच’, ‘फिजिकल स्क्रिप्ट टू डिजिटल’, वगैरे प्रयोग सादर केले गेले. ‘भारत-जीपीटी’ लक्षवेधी सरकारी उपक्रम ठरला. शेतकी क्षेत्रात सामान्य शेतकर्याला कसा या तंत्रज्ञानाचा फायदा होईल, त्याला स्वःतच्या बोलीभाषेत कशी हवामानासंबंधी विदा (डेटा) प्राप्त होईल, त्यासाठी विकसित केलेली मॉडेल्स भारतीय आणि जागतिक कंपन्यांनी प्रस्तुत केली, त्यांचा भर आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रावरही होता. ‘रोबोटिस’बद्दल आधीच भरपूर लिहिले गेले आहे अन् ‘रोबोट्स’ सगळीकडेच दिसले; पण त्यात ‘एड्व्हर्ब टेनोलॉजीज’सारख्या पूर्णतः भारतीय बनावटीचा ‘रोबोट’ बनवणार्या कंपनीबद्दल फारशी माहिती देण्यात आली नाही, खरेतर त्यांचे ‘रोबोट्स’ या परिषदेत चिनी ‘रोबोट्स’च्या तुलनेत अधिक वापरले गेले होते.
‘कृत्रिम प्रज्ञे’चे क्षेत्र लवकरच सर्वव्यापी होणार आहे. कृषी, सेवा, उद्योग या तिन्ही क्षेत्रांत बदल घडवून आणणार्या कित्येक कल्पना या परिषदेत विविध कंपन्यांकडून सादर केल्या गेल्या. या कल्पनांच्या गाभार्यात भारत एक देश म्हणून आपली जागा भक्कम करणार आहे का नाही, हा खरा प्रश्न आहे. याचे उत्तर सध्यातरी ‘हो’ असेच द्यावे लागेल. ज्या भारतीय कंपन्यांनी आपापली उत्पादने इथे मांडली, ती पाहिल्यावर आपण फार मागे राहणार नाही, असेच वाटून गेले. यासाठी सर्वात मोठा हातभार भारतीय तरुण इंजिनिअर्स लावतील, अशीच परिस्थिती सध्या दिसते आहे. ‘कृत्रिम प्रज्ञा’ काहींसाठी आव्हानात्मक आणि काहींसाठी संधी बहाल करणारी ठरणार आहे. भारताच्या दृष्टीने या दोन्ही बाबी विचारात घेण्यासारख्या आहेत, असा संदेश या परिषदेतून दिला गेला आहे. नवीन संधीचे सोने तेच करू शकतात, ज्यांच्याकडे प्रतिभा आहे किंवा भांडवल आहे; मग ती व्यक्ती असो की, संस्था. ज्यांच्याकडे यापैकी काहीच नाही, त्यांना मात्र हा काळ परीक्षेचा ठरणार आहे.
विविध मान्यवरांनी या मंचावरून दिलेले संदेश जगाने औत्सुयाने पाहिले, ऐकले आहेत. त्यात कित्येक राष्ट्रप्रमुख, तर कित्येक जागतिक उद्योगपती आहेत. भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जे म्हणाले, ते महत्त्वाचे आहे, "कृत्रिम प्रज्ञा भारतासाठी भय नव्हे; भाग्य घेऊन आली आहे.” तंत्रज्ञान क्षेत्राला मिळालेल्या या आव्हानाच्या काळातदेखील संधी शोधणारा सकारात्मक दृष्टिकोन कसा जोपासावा, याचे हे उत्तम उदाहरण ठरावे.
भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात जगभरातून या कार्यक्रमासाठी लोक आले, त्यातील काहींना गैरसोयीचा सामना करावा लागला हे खरे असले; तरी ते प्रमाण अतिशय कमी आहे आणि केवळ तेच खरे समजणार्यांना एक सांगावेसे वाटते, ही परिषद झाली नसती, तर काय झाले असते? आता ती झाली आहे, जगभर ‘एआय’ची चर्चा जोर धरू लागली आहे, भारताकडे निवेशाच्या दृष्टिकोनातून जागतिक कंपन्या पाहत आहेत, हा सकारात्मक गाभा आपण का पाहू नये? याउलट, ही किंवा तत्सम परिषदा आपण घेतल्याच नाहीत; तर जगाच्या दृष्टीने आपले पण महत्त्व उणावत राहील, हे आपण का लक्षात घेत नाही? भारत हा विकसनशील देश आहे, याची जाणीव सगळ्या जागतिक उद्योगपतींना आहे, म्हणूनच काही अडचणी येतील हे पण त्यांना ठाऊक असते, अडचणींतच संधी गवसते. अतिथींना झालेल्या अडचणींचा दोष कोणाचा असेल, तर तो आपल्या सगळ्यांचाच आहे. कारण, विचारी माणसाला लाभलेली दृष्टी कर्मचारी माणसाकडे नसली म्हणजे उणीव उद्भवते. त्यासाठी कर्मचार्याने विचारी असणे आवश्यक ठरते. जेव्हा ही वैचारिक दृष्टी सगळ्या स्तरांपर्यंत संप्रेषित होईल, तेव्हा अशा उणिवा राहणार नाहीत. त्यासाठीच तर असे वैचारिक मंच आवश्यक असतात.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी ‘अपोलो’ उपक्रमाची माहिती घेण्यासाठी ‘नासा’ला भेट दिली; तेव्हाची गोष्ट सांगतात, त्यांनी एका कर्मचार्याला (जॅनिटर) विचारले, "तुझे काम काय आहे?” तो म्हणाला, "चंद्रावर माणूस पाठवणे या उपक्रमात मी सहभागी आहे.” भारतातही कर्मचार्यांना वैचारिक दृष्टी प्रदान करणारा दिवस लवकरच येईल, या अपेक्षेसह; त्यासाठीच तर ‘कृत्रिम प्रज्ञे’चे लोकशाहीकरण आवश्यक ठरते.