एआयच्या मदतीने हॉटेल्स क्षेत्रातील घोटाळा उघडकीस!

22 Feb 2026 18:56:29
AI Exposes ₹70,000 Crore Tax Scam
 
मुंबई : (AI Exposes ₹70,000 Crore Tax Scam) हैद्राबादमधील बिर्याणीसाठी प्रसिद्ध असलेल्या साखळी हॉटेलवर टाकलेल्या छाप्यानंतर, ७० हजार कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. आयकर विभागाने एआयच्या मदतीने या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. आयकर विभागाने हैद्राबादमधील बिर्याणीसाठी प्रसिद्ध असलेल्या साखळी हॉटेलच्या विविध आऊटलेट्सवर छापे टाकले. त्यावेळी तपासादरम्यान कर चुकवण्यासाठी या हॉटेलकडून उत्पन्न कमी दाखवण्यात येत असल्याचे उघडकीस आले. २०१९-२० पासून या हॉटेल्सने जवळपास ७० हजार कोटी रुपयांची विक्री लपवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
या तपासामध्ये एआयने मोठी भुमिका बजावल्यचे समोर आले आहे. आयकर विभागाचे अधिकारी गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारामध्ये सर्रास वापरात असलेल्या एका बिलिंग सॉफ्टवेअरवर लक्ष ठेवून होते. या बिलिंग सॉफ्टवेअरमधील अनियमितता शोधण्यासाठी आयक अधिकार्‍यांनी बिग डेटा अ‍ॅनालिटिक्स आणि जनरेटिव्ह एआय सारख्या तांत्रिक उपकरणांचे सहाय्य घेतले. त्याच्या मदतीने आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी जवळपास १.७७ लाख हॉटेल्समधील ६० टेराबाईट डेटाचे विश्लेषण केले. या विश्लेषणामधून जवळपास १३ हजार ३१७ कोटी रुपयांचे व्यवहार डिलीट केल्याचे वास्तव उघडकीस आले. आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यामध्येच हा आकडा पाच हजार कोटीच्या आसपास असून, ४० हॉटेल्सच्या प्रत्यक्ष आणि डिजिटल तपासणीमध्येच त्यांनी ४०० कोटी रुपयांची विक्री लपवल्याचे समोर आले आहे.
 
यामध्ये रोखीने झालेल्या व्यवहारांच्या पावत्या डेटामधून हॉटेल्स मालकांनीच डिलीट मारल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी ठराविक तारीख, ठराविक महिन्यातील रोखीच्या व्यवहार डिलीट केल्याचे समोर आले आहे. ही बिले डिलीट करुनच करचोरी केली जात असल्याचे आयकर अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. अधिकार्‍यांनी तपासलेल्या डेटामध्ये गेल्या सहा वर्षातील २.४३ ट्रिलियन रुपयांच्या विक्रीचा समावेश होता. ही घटना अशाप्रकारच्या गुन्ह्याची सुरुवात असून, बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या अन्य सॉफ्टवेअरमध्येही अशीच अनियमितता आढळण्याची शक्यताही अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. भारतातील हॉटेल्स क्षेत्रातील हा एक मोठा घोटाळा मानला जात असून, आयकर विभागाचे अधिकारी सर्वांगाने या घटनेची चौकशी करत आहेत.
 
हेही वाचा : गाझाच्या मुद्द्यावरून असीम मुनीर विरोधात माजी पाकिस्तानी सैनिक मैदानात!
 
एकूण विक्रीच्या २७ टक्के विक्री लपवल्याचा अंदाज
 
तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगण, महाराष्ट्र आणि गुजरात या पाच राज्यांमध्ये करचोरीची प्रकरणे आढळली असून, यामध्ये कर्नाटकात सर्वाधिक म्हणजे अंदाजे दोन हजार कोटी रुपयांचे व्यवहार डिलीट करण्यात आले आहेत. त्याखालोखाल तेलंगणमध्ये १५०० कोटी तर तमिळनाडूमध्ये १२०० कोटी रुपयांचे व्यवहार नष्ट करण्यात आले. काही हॉटेल्सने व्यवहार तसेच ठेवून, आयकर परतावा भरताना कमी भरल्याचेही निर्दशनास आढळले आहे.एकूण विक्रीच्या २७ टक्के विक्री लपवल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0